माध्यम कोणतंही असो, व्यक्त होणं हा फार मोठा गुण आहे. तो उपजत असतो. माझ्या मनातले भाव माझ्या हृदयापासून तुमच्या हृदयापर्यंत पोहोचतात. तुमच्या हृदयाला ते भिडतात. हे भाव व्यक्त करणं, दुसऱ्यांपर्यंत ते अचूक पोहोचवणं ही कला आहे. त्या कलेसाठी निवडलेलं माझं माध्यम आहे स्वर! माध्यमाचा शोध घेऊन योग्य गुरूंकडे मला नेणारे माझे मार्गदर्शक होते माझे वडील मोहन अंकलीकर आणि आई सरला अंकलीकर. स्वरांच्या या माध्यमावर हुकूमत कशी आणायची ते शिकवलं माझ्या गुरु किशोरीताई आमोणकर यांनी!
मला अजून आठवतं, किशोरीताईंकडे आम्ही गाणं शिकायला जात असू, तेव्हा आम्ही आमच्या म्युझिक रूममध्ये तानपुरे मिळवून, स्वरमंडल जुळवून बसलेले असू. बाजूच्या देवघरातून घंटानाद ऐकू आला की आम्ही सावरुन बसत असू. आता ताई येणार म्युझिक रूम मध्ये! खरं सांगू? पहाटे पहाटे देवघराचं द्वार उघडतं आपल्या देवदर्शनासाठी आणि मग देवाचं दर्शन झाल्यावर जसं वाटतं ना, अगदी तस्संच वाटायचं आम्हाला! प्रसन्न, पवित्र. मग तानपुरे जुळवून ताई स्वरमंडल हाती घेऊन यमन राग आळवायला सुरुवात करत. आता यमनचे कुठले स्वर चाललेले आहेत, ताई आवर्तनं कशी भरतायत, ही बंदिश कशी आहे, या तांत्रिक गोष्टींकडे माझं अवघं लक्ष लागलेलं असे. पण ते काही क्षणच! त्यानंतर थोड्याच वेळात या सगळ्यावरचं लक्ष उडून जाई. त्यांच्या स्वरांनी असे काही पछाडून जात असू आम्ही, की वाटे, ‘अरे! असा यमन राग आम्ही कधी ऐकलाच नाही. जी बंदिश आम्ही हजारो जणांकडून ऐकलीय तीच बंदिश या अशी कशी गातायत? हे यमनचे केवळ स्वर नाहीत, शब्द नाहीत, बंदिश नाही… ताई स्वतः साक्षात यमन झाल्यात. अशी काय जादू करतात या, की त्यांच्या स्वरांनी आम्हा सगळ्यांनाच त्यांनी यमन करून टाकलंय… आम्ही सगळे यमनमध्ये तरंगतोय. जणू अवघं जग यमन झालंय.’ हा अद्भुत अनुभव घेतल्यावर वाटायचं, या स्वरांचा मागोवा मला घ्यायलाच हवा! ताईंसारखंच मी यमन गाताना मलाही साक्षात यमन व्हायचंय. तो दिव्य अनुभव घ्यायचाय. मी या विचारानं झपाटून जायची. हा मला झपाटणारा विचारसुद्धा माझा तेव्हा ‘मेंटॉर’च असायचा आणि अर्थात तो विचार माझ्या मनात प्रस्फुटित करणाऱ्या किशोरीताईसुद्धा!
आणखी वाचा : कुकरमध्ये अन्न शिजवा… शिट्ट्या न करता!
आरंभ काळात योग्य गुरूंकडे नेणारे माझे खरेखुरे मेंटॉर होते माझे आई-वडील!
योग्य गुरूंच्या हाती त्यांनी मला नुसतं सोपवलं नाही, तर ते माझ्या संगीत शिक्षणाचे साक्षीदारही होते. ते रोज माझ्याबरोबर क्लासमध्ये बसत आणि घरी आल्यानंतर काटेकोरपणे तो सगळा रियाझ माझ्याकडून करून घेत. विजया जोगळेकर माझ्या पहिल्या गुरु. गाणं, स्वरांचे लगाव, शब्द, शब्दांचं महत्त्व हे त्यांनी शिकवलं. त्यानंतरचे माझे गुरु पं. वसंतराव कुलकर्णी. अत्यंत शिस्तप्रिय. त्यांनी माझ्याकडून आग्रा-ग्वाल्हेर घराण्याची उत्तम तालीम करून घेतली. तर किशोरीताईंनी शब्द, स्वर आणि लयीच्या पलीकडे जो भाव आहे, त्याचा मागोवा घ्यायला शिकवलं.
मुळात आई-बाबांच्या गळ्यातल्या सुरांमध्ये उत्कृष्ट ‘एक्सप्रेशन्स’ होते. गाण्याची दोघांना चांगली समज. घरातलं वातावरण आध्यात्मिक. त्यामुळे त्यांच्या गळ्यांतून ते भाव अचूक प्रकट होत. पुढे तोच त्यांचा गुण माझ्यात उतरला. जोडीला होती कडक शिस्त! रोजचा रियाझ.
रियाझ झाला नाही, तर जेवण नाही. आमच्याकडे छडी होती एक. तिचा मार नाही कधी मिळाला, पण धपाटे खूप खाल्लेत मी! बाबांकडे एक डबा होता. त्यात दोनएकशे हिरव्या रंगाचे मणी होते. बाबा मला मोठीशी पेचदार तान देत. एका तानेनंतर एक मणी एका डब्यातून दुसऱ्या डब्यात टाकत. मणी संपेपर्यंत ते मला ताना घ्यायला लावत. कोणतीही स्पर्धा असो. मला ते अतिशय अवघड गाणी म्हणायला लावत. ‘भेटी लागी जीवा’ वगैरेंसारखी! माझं वय अवघं अकरा-बारा वर्षांचं! पण प्रत्येक गाणं कमीत कमी दीडशे वेळा म्हणून घेत. नोटेशन्स काढून प्रत्येक गाण्यातल्या जागा, त्यांचा अभ्यास, गाण्यातला भाव, सगळं सगळं ते माझ्याकडून करून घेत. माझ्या गाण्यासाठी बाबा तबला शिकले. ते माझ्याबरोबर ठेका लावून बसत असत, विलंबित, छान.
आणखी वाचा : प्लास्टिकमधील साठवणूक, तंबाखू व मद्य पीसीओएससाठी कारणीभूत
माझा थोरला भाऊ विशेष मूल. त्याचा सांभाळ करून आई आणि बाबा दोघंही माझ्यासाठी तेवढाच वेळ देत. २४ तासांचे ४८ तास करणं कसं जमत होतं त्यांना? मृत्यूशयेवर असतानाही बाबा मला म्हणत, ‘कार्यक्रम खूप मिळतील गं तुला! पण रियाझ सुरू ठेवलायस ना रोजचा?’
माझ्यातल्या ‘परफॉर्मर’चा शोध आईला सर्वप्रथम लागला. पाच वर्षांची असताना शाळेतून आल्याबरोबर, झोपाळ्यावर बसून हावभावासह तासभर बडबडगीतं गायची मी. तेव्हाच आईनं ओळखलं, की हिला गाण्यात गती आहे. गाणं शिकायला लागले. बक्षीसं मिळवायला लागले. पण म्हणून अभ्यासाकडे दुर्लक्ष?… छे छे! अजिबात नाही. आई पहाटे चार वाजता उठून मला अभ्यासाला बसवे आणि ती समोर बसून वाचन अथवा विणकाम करी. तिनं मला एम. कॉम. करायला लावलं. पण ‘सी.ए.’ करायला मात्र बिलकुल परवानगी दिली नाही. मी तैलबुद्धीची असूनही! आई-बाबांनी मला ‘तू गाण्यातच करिअर करायचं’ असा अत्यंत योग्य सल्ला तेव्हा दिला होता. आई स्वतः टेबल टेनिस चॅम्पियन. रोज पुस्तकं उभी लावून संध्याकाळी आमच्या डायनिंग टेबलाचं ‘टेबल टेनिस टेबल’ बनून जाई. आम्ही सगळे मिळून तास-दीड तास त्यावर टेबल टेनिस खेळत असू. त्यानंतर तीच पुस्तकं टेबलावरून माझ्या हातात येत. अभ्यास झाला की रियाझ. मला कधी मित्र-मैत्रिणींबरोबर हुंदाडायला मिळालंच नाही. तेव्हा मला खूप राग यायचा. पण आज नाव मिळतं, कलेचा आनंद आणि आस्वाद घेते, तेव्हा या शिस्तीचं खरं मोल उमगतं.
आई-वडिलांप्रमाणेच समकालीन गायकांकडूनही मी नकळत खूप शिकले. सगळ्यात महत्त्वाचे मार्गदर्शक माझे साक्षेपी व जाणकार श्रोते! माझं गाणं निरंतर चालू ठेवण्यात त्यांचं योगदान खूप मोठं आहे. मला आठवतं, गोव्यातल्या एका मोकळ्या मैदानावरील कार्यक्रमात रिमझिम पाऊस सुरू झाला. मी भिजत नव्हते, पण श्रोते त्या श्रावणसरींत आणि माझ्या स्वरांत चिंब भिजले… आनंदानं! केवढी मोठी ऊर्जा लाभते अशा प्रसंगांतून!
स्वरांची तलवार अखंड तळपत राहावी यासाठी व्यासंग, मेहनत आणि बुद्धीची धार रोज लावावी लागते गायकाला. मग रोजची स्वरसाधना हेच आमच्या जीवनाचं साध्य बनतं. व्यक्त होण्याचं माध्यम बनतं. म्हणूनच शेवटच्या श्वासापर्यंत स्वर साधना करत राहाणं हेच गुरुतत्त्व! हीच गुरु चरणी वंदना!
शब्दांकन- माधुरी ताम्हणे
madhuri.m.tamhane@gmail.com