मी स्वतःच्या नृत्यकलेच्या प्रवासाकडे वळून पाहते, तेव्हा मला एकाच वेळी अनेक मेन्टॉर्स दिसतात. खरंच! माझ्या नृत्यकलेची सुरुवात शाळेपासून झाली. आमचं टिपिकल मध्यमवर्गीय कुटुंब. वडील पोलीस खात्यात. त्यामुळे लहानपणीच आमच्या शिस्तबद्ध वर्तनाच्या सीमारेषा अधोरेखित झाल्या होत्या, पण त्या सीमारेषांनी माझं आयुष्य काचलं गेलं नाही कधीच! मला आज नवल वाटतं, परळसारख्या कामगार वस्तीत राहणाऱ्या, कलेची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबाने ३५ वर्षांपूर्वी मला नृत्याच्या क्लासला घालणं, तुटपुंज्या पगारातूनसुद्धा नृत्याच्या क्लासची अडीचशे रुपये फी वर्षांनुवर्ष भरणं आणि परळहून शिवाजी पार्कला त्या शाळकरी वयांत पाठवणं, हे सगळंच आता आक्रीत वाटतं. बाबा बिझी होते. पण आई मात्र प्रत्येक नृत्य स्पर्धेसाठी माझ्यासोबत येई. किती मोठा सपोर्ट होता हा!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : बाळंतपण नैसर्गिक की सिझरीयन; त्याचा बालकांच्या लसीकरणावर काय परिणाम होतो?

‘शिरोडकर हायस्कूल’मधील माझे संगीत शिक्षक तळाशीलकरसर आणि कदम सर यांनी सर्वात प्रथम मला स्टेजवर उभं केलं. त्यांचा लोककलेचा अभ्यास असल्याने त्यांनी माझी नृत्याची चांगली तयारी करून घेतली. शाळेतल्या एका कार्यक्रमात ‘आई मला नेसव शालू नवा’या लावणीवर मी पहिल्यांदा नृत्य केलं. त्याचं मला पाच रुपये बक्षीस मिळालं त्याकाळी! त्याचं आमच्या फडतरेबाईंनी आणि घरच्यांनी एवढं कौतुक केलं. खरंच लहान वयात असं प्रोत्साहन मिळालं की उत्साह येतो. उमेद वाढते. पण त्याच वेळी डोक्यात हवासुद्धा जाते बरं का! पण मग कॉलेजमध्ये चेतन दातारांसारखे गुरू लाभतात. ते आपल्याला बरोबर जमिनीवर आणतात. ‘रूपारेल कॉलेज’मध्ये अकरावीत असताना त्यांनी मला एका नाटकात घेतलं ते चक्क मॉब सीनमध्ये. माझ्या तोंडी जेमतेम अर्ध वाक्य! असा राग आला होता मला तेव्हा! अरे शाळेतल्या बालनाट्यात आणि नृत्यात अनेक बक्षीस मिळवलेली मी कलाकार! आणि इथे चेतन दातार मात्र तालमीच्या वेळी सतत ओरडतात. कचकच करतात. समजतात कोण स्वतःला हे? आज कळतं, त्यांना समजण्यात चूक मीच करत होते. चेतन दातार हे अभिनय क्षेत्रातलं चालतं-बोलतं विद्यापीठच होते जणू! त्यांनी हळूहळू माझ्यातला कलाकार घडवला, फुलवला!

आणखी वाचा : विवाहपूर्व मार्गदर्शन : लग्नाच्या बाजारात कुंडलीचे मोल?

कॉलेजच्या तिसऱ्या वर्षाला असताना ‘उन्मेष’च उत्कृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिकसुद्धा मला मिळालं. आज मी अभिनय क्षेत्रांत नसले, तरी त्यांनी त्या काळात जे धडे गिरवून घेतले, ते नृत्यांगना म्हणून अभिनय करण्यासाठी खूप पोषक ठरले. कथ्थक नृत्यात भावांग सादर करताना व नृत्यापूर्वी ब्रिज भाषेंतील कविता सादर करताना अभिनयाला खूप महत्त्व असतं. तो अभिनय मला जमतो तो केवळ चेतन दातारांमुळे! गुरू-शिष्याची बांधिलकी कशी असते बघा! एकदा एक एकांकिका स्पर्धा होती. कॉलेजमध्ये रिअर्सल आटोपून थिएटरवर जायचं होतं. नेमकं त्याच दिवशी माझ्या आजीचं श्राद्ध होतं. मी सकाळी चेतन दातारांना विचारलं, की मी घरी जाऊन आजीच्या फोटोला नमस्कार करून येऊ का? ते म्हणाले, “आधी तालीम कर. मग बघू.” तालीम आटोपली. त्यांनी इतरांना थिएटरवर पाठवलं. मला टॅक्सीने परळला माझ्या घरी घेऊन गेले. मी आजीच्या फोटोला नमस्कार केला. आम्ही दोघे जेवलो आणि नंतर मी शांत मनाने स्पर्धेला गेले. आपल्या कलाकाराने रंगमंचावर पाय टाकताना त्याचं चित्त ठिकाणावर असलं पाहिजे, याची किती नकळत काळजी घेतली होती त्यांनी! खरंच सलाम त्यांना!

आणखी वाचा : नातेसंबंध : नात्यातच होतंय लैंगिक शोषण?

आशा जोगळेकर

आज कोचीन, मुंबई ते अगदी कॅलिफोर्निया, अशा जगभरात माझ्या नृत्यशाळा आहेत. कोरिओग्राफर म्हणून माझं फिल्म इंडस्ट्रीत नाव आहे. त्याचं श्रेय माझ्या कथ्थक नृत्य गुरू आशा जोगळेकर यांचं! मी सातवीत असताना पहिल्यांदा त्यांच्या क्लासमध्ये पाऊल ठेवलं आणि जागच्या जागी खिळले. वाटलं, देवी सरस्वती अथवा शारदा देवी पृथ्वीवर अवतरल्या तर अगदी अश्शाच दिसतील. तेजस्वी. शांत. सोज्वळ! पाहताक्षणी मी अक्षरशः शरण गेले त्यांना! त्या अत्यंत मृदू भाषी. त्यांचं सादरीकरण उत्तम. आज मी जे काही प्रयोग नृत्यात करते, ते त्यांच्या वेगळ्या पद्धतीच्या शिकवणुकीतूनच. मी लहान होते. द्वाड होते. मला रियाझ करायचा कंटाळा येई. एखादा कठीण तोडा त्या शिकवत असतील, तर मी मुद्दाम घुंगरू बांध, ओढणी आवर असा टाइमपास करी. पण त्या रागवत नसत. शांतपणे म्हणत, “झालं ना तुझं ?आता ये इकडे! मी शिकवलेला तोडा दाखव करून मला आता!” मी मनात म्हणे, अरे इथे तर कोणत्याच ट्रिक्स चालत नाहीत. सगळंच कळतं की यांना. क्लास संपला की मला हळुवारपणे जवळ घेऊन समजावत, “अगं देव खूप कमी लोकांना उपजत कलागुण देतो. तुला देवाने ते दिलेत. तुला कधी त्याची किंमत कळणार?” आता मला वाटतं, देवाने जे दान माझ्या पदरात टाकलं ते माझ्या आधी माझ्या गुरूंना कळलं होतं. मग मी त्याला रियाझाची, मेहनतीची जोड नाही दिली तर त्यांच्या जीवाची किती काहिली होत असेल बरं!

आणखी वाचा : ‘किल द बिल’ची ओपोकू आहे तरी कोण ?

पंडित बिरजू महाराज नेहरू सेंटरला वर्कशॉप घेत असत. ते लखनऊ घराण्याचे. आशामावशी जयपूर- बनारस घराण्याच्या. पंडित गोपीकृष्ण, पंडिता रोहिणी भाटे यांच्या त्या शिष्य. सहसा गुरू शिष्यांना दुसऱ्या घराण्यातील कलाकारांकडे जायला प्रोत्साहन देत नाहीत. पण मावशी म्हणत, “बिरजू महाराज फार मोठे नृत्य कलाकार आहेत. त्यांची अदाकारी आणि नजाकत वेगळी आहे. ती समजून घ्या. त्याचा तुम्हाला फायदा होईल.” किती विशाल दृष्टिकोन हा! मी आशा मावशींची आज्ञाधारक विद्यार्थिनी! मी जवळ जवळ बारा वर्ष बिरजू महाराजांच्या वर्कशॉप्सना हजेरी लावली. खूप शिकले त्यांच्याकडून.

आणखी वाचा : इन्सुलिनची शंभरी : रोमांचक शोधाची कहाणी

गुरूंच्या परवानगीने मी ‘सचिन शंकर बॅले युनिट’मध्येही जायची. तिथे मी पहिल्यांदा पाश्चात्त्य व भारतीय बॅलेस्टाइलमधील उत्तम आविष्कार एकत्र बांधून निर्माण झालेली ‘क्रिएटिव्ह डान्सिंग’ ची एक खास स्टाइल असते ती शिकले. गुरूंनी शिकवलेल्या स्टाइलपेक्षा ती वेगळी आहे. युनिक आहे. लोकनृत्य, कथ्थक, क्रिएटिव्ह डान्सिंग या सगळ्या नृत्य प्रकारांतून मी असं थोडं थोडं शिकत गेले व या सगळ्या शैली आत्मसात करत गेले. त्यातूनच नकळत माझी स्वतंत्र वेगळी नृत्याची शैली विकसित झाली. त्याचा फायदा मला फिल्म्ससाठी कोरिओग्राफी करताना खूप झाला.

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे – लैंगिक दुर्बलतेचा मधुमेहाशी संबंध आहे ?

‘ढगाला लागली कळ’ या रीमिक्सची कोरिओग्राफी मी पहिल्यांदा केली ती वीरेंद्र प्रधान यांच्यामुळे. कोरिओग्राफीचं टेक्निक पुढे मला शिकवलं ते रमेश पुरव यांनी. फिल्म साठीच्या कोरिओग्राफीसाठी मला पहिली संधी दिली अजय फणसेकरांनी. खरंतर तेव्हा माझं या क्षेत्रात काहीच नाव नव्हतं. पण त्यांनी माझ्या नृत्य कलेवर विश्वास ठेवला. इतकंच नव्हे तर फिल्म्सच्या शूटिंगचं तंत्रही त्यांनीच मला शिकवलं. ज्यामुळे पुढे अनेक चित्रपटांसाठी मी कोरिओग्राफी केली. त्यानंतर त्या उमेदवारीच्या काळात प्रभात वाहिनीवर शाहिरांवरील मालिका सुरू झाली. त्यात प्रत्येक शाहिराची चार ते पाच गाण्यांवरील नृत्यांची कोरिओग्राफी मला करायला मिळाली. त्याचे डीओपी होते चारू दुखंडे. त्यांच्याकडून मी जे जे शिकले ती पुंजी आजवर पुरून उरलेय. पुढे मी व्यग्र झाल्याने त्यांच्याकडे काम करू शकत नव्हते. पण तरीही त्यांनी कधीही खंत व्यक्त केली नाही. उलट मी मोठ्या प्रोजेक्टसाठी काम करते याचा त्यांना आनंद वाटे. मनाचा हा उमदेपणा मी त्यांच्याकडून नकळत टिपला. इतकंच नव्हे तर या क्षेत्रात राहूनही चुकीच्या रस्त्याने कसं जायचं नाही, आपल्या सहकलाकारांना कसं सांभाळायचं आणि तयार करायचं हे सगळं मी त्यांच्याकडूनच शिकले.

आणखी वाचा : मधुमेह : लक्षणे, चाचण्या व उपचार

तसं पाहायला गेलं तर या खूप छोट्या आणि तरल गोष्टी असतात. पण आपलं संवेदनशील मन त्या नेमक्या टिपत जातं.
मात्र कलाकारा इतकंच माणूस म्हणून मला तयार करण्याचं कामही माझ्या आयुष्यात अनेकांनी केलं. माझं करिअर लग्नानंतर भरास आलं. पण मोठ्या मनाच्या सासुबाई आणि पतीसह सर्व सासरच्या मंडळींनी ते सांभाळून घेतलं. करियरच्या जोडीने आदर्श संसार कसा करायचा ते मी आशा मावशींकडून शिकले. त्या कमालीच्या स्वच्छ, टापटीप आणि शिस्तप्रिय. शिकवणीसाठी आम्ही त्यांच्या घरी जात असू तेव्हा त्या नखशिखांत तयार असत. आमचा नाश्तासुद्धा डायनिंग टेबलवर तयार असे. ‘तुम्ही हा नृत्याचा तोडा करून पहा. तोवर मी भाजी फोडणीला टाकून येते.’ असा प्रकार त्यांनी कधीही केला नाही. पूर्णपणे व्यावसायिक. कायद्याचा अभ्यास करताना मी श्रीपाद मूर्ती वकिलांकडे ज्युनिअर म्हणून काम करत होते. मी पाहायची, की ते आपल्या सहाय्यकांनाच नव्हे तर सर्वांनाच आपुलकीने सल्ला देत. दिल खोलके! आपली स्पर्धा नेहमी स्वतःशी असते. असावी. हा धडा मी त्यांच्याकडून गिरवला.

आणखी वाचा : सानिया मिर्झा घटस्फोट घेतेय ऐकलं.. मला का नाही जमलं?

एक छोटा प्रसंग. माझ्या पहिल्या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असताना मी गरोदर होते. कलाकारांना नृत्य शिकवताना माझा तोल गेला. मी पडले. एकाने मला पकडलं व खाली बसवलं. दूरवरून हे पाहून शिवाजी साटमसर धावत माझ्या जवळ आले. चक्क जमिनीवर बसून स्वतःच्या नॅपकिननं माझी जखम पुसली. औषधपाणी केलं. स्वतःचा मोठेपणा, नावलौकिक विसरून माणूसपण कसं जपायचं हे त्यांच्या एका कृतीतून मी शिकले. खरंच ही सगळी माणसं माझ्या आयुष्यात नसती, तर कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून मी आज जे आयुष्य जगते, जे यश मिळवते, ते मिळवूच शकले नसते.
madhuri.m.tamhane@gmail.com