मृणाल कुलकर्णी
दैनंदिन आयुष्यात आपल्याला जी माणसं भेटतात, त्या प्रत्येकाकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या असतात. माणसाने डोळे आणि कान सतत उघडे ठेवले पाहिजेत आणि तोंड बंद ठेवलं पाहिजे. अशी असंख्य माणसं सभोवती असतात ज्यांच्या वागण्या- बोलण्यातून आपल्यावर त्यांचा प्रभाव टाकून घेऊ शकतो या गोष्टीवर माझा खूप विश्वास आहे. साधी गोष्ट! माझ्याकडे घर साफ करणारी मुलगी येते, नीता तिचं नाव! ती ज्या पद्धतीने आडवा झाडू घेऊन झाडते, ते पाहून मला एकदम गाडगेमहाराजांचीच आठवण येते. ते असंच म्हणत. एका वेळी भरपूर कचरा निघायला हवा असेल, तर झाडू आडवा धरायला हवा. किती साधी गोष्ट आहे, पण तिची ती छोटीशी कृतीसुद्धा किती शिकवून जाते. अर्थात त्यासाठी आजूबाजूच्या माणसांना, गोष्टींना, त्यांच्या सवयींना टिपण्याचा मी प्रयत्न करते सतत. माणूस म्हणून कळत-नकळत अशा छोट्या छोट्या गोष्टी टिपण्याची सवय एकदा लागली, की ती अभिनयासाठीसुद्धा खूप उपयोगी पडते.
आणखी वाचा : गेमिंगः तरुणींची संख्या वाढतेय; करीअरचा नवा पर्याय!
मात्र अभिनय कोणाकडून शिकता येत नाही. कारण असं शिकायला गेलो तर तो अभ्यासक्रम होईल. पाठ्यपुस्तकातला! असे अनेक कलावंत व दिग्दर्शक आहेत, की ज्यांना पाहात आपण स्वतःची अभिनयशैली विकसित करत जातो. अशा थोर दिग्गजांची आपण नक्कल न करता, त्यांना स्पंजासारखं टिपत जायचं असतं. तरच आपल्याला आपली स्वतंत्र ओळख निर्माण करता येते. मात्र मला दिग्दर्शकाची ‘नजर’ ज्यांनी दिली, त्यांचं नाव मी इथे आवर्जून घेईन – गजानन जहागीरदार! खूप लहान वयांत त्यांनी मला हे शिकवलं, की कॅमेरासमोर नुसता अभिनय नको करूस. कॅमेरासमोर आपण जे करतो, ते नेमकं कसं दिसतं, त्यातलं नेमकं काय घ्यायचं, हे तुझा शॉट झाला, की मॉनिटरमध्ये येऊन बघत जा. या पहिल्या संस्कारामुळे माझं कायमच कॅमेऱ्याच्या मागे लक्ष असायचं. त्यामुळे मी खूप लवकर दिग्दर्शनाकडे वळले. लोकांना आश्चर्य वाटतं, अभिनयात छान अवॉर्ड्स मिळत़ाहेत. कौतुक होतंय, असं असताना दिग्दर्शन कशाला? पण दिग्दर्शनाच्या या पहिल्या संस्कारामुळे चित्रपटाचे अनेक विभाग सांभाळण्यातल्या चॅलेंजने मला मोहात टाकलं आणि आज सिनेक्षेत्रात अभावाने आढळणारे ‘अभिनेत्री -दिग्दर्शिका’ हे स्थान मी निर्माण करू शकले.
आणखी वाचा : आई-वडिलांच्या निधनानंतर पोरकी झाले, २२व्या वर्षात लग्न केलं पण वर्षभरातच…
केवळ व्यक्तीच नव्हे, कधी कधी चित्रपट आणि त्यांतील व्यक्तिरेखासुद्धा आपल्याला चिरंतन जीवनमूल्य शिकवून जातात. ‘गोष्ट एका पैठणीची’ या नुकत्याच राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या चित्रपटात माझी भूमिका आहे. त्यांतील व्यक्तिरेखेने मला हे शिकवलं, की गरीब श्रीमंत, लहान थोर, जात-पात या सगळ्याच्या पलीकडे माणसाने माणसाशी माणसासारखं आणि खरं वागलं पाहिजे. सहृदयतेचा हा सुंदर संदेश मी या चित्रपटातून नकळत टिपला आणि माझ्या माध्यमातून हा मोलाचा संदेश मी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकले याचा मला आनंद वाटतो.
अनेकदा आपल्या आचारविचारांना वेगळी दिशा देणारे प्रसंग अथवा माणसं आपल्याला अचानक भेटतात. अगदी वेगळ्याच संस्कारांची रुजवण ते आपल्यात करतात. यात मी एका दिग्गज कलाकाराचे नाव घेईन. विक्रम गोखले! त्यांच्या अभिनयाबद्दल काय बोलावं? माझं पहिलं काम – ‘ती निष्पाप आहे का?’ या नाटकात मी त्यांच्याबरोबर केलं होतं. कलाकाराइतकेच माणूस म्हणून मला ते खूप जवळचे वाटतात, भावतात. मला आज वृषालीकाकूंकडे बघताना ते जे नेहमी म्हणत ते सारखं आठवतंय. ते म्हणायचे, “तुमच्या जोडीदारावर तुमचं प्रेम असतंच. तर ते रोज त्याच्याजवळ व्यक्त करायला काय हरकत आहे? मी वृषालीला रोज सांगतो, की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आपल्या सहवासात येणाऱ्या व ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम करतो, त्याला ते सांगायला काय हरकत आहे?” किती साधी गोष्ट! पण ती कृतीत आणण्यासाठी अत्यंत उमदं, तरल व संवेदनशील मन लागतं.
असं तरल मन असेल, तर ते प्रत्येकाविषयी कृतज्ञ नोंद करत जातं. उदा. माझे आई बाबा! त्यांनी आम्हा बहिणींना कायम हे शिकवलं, की घर हे एकाचं नसतं. तर घर हे सगळ्यांचं मिळून असतं. त्यामुळे आमच्या घरांत ही आईची कामं, ही वडिलांची कामं असं कधीच नव्हतं. घर म्हणजे फक्त जबाबदाऱ्या आणि घरातली कामं एवढंच नाही. तर आपण सगळ्यांनी एकमेकांना मदत करत, स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व जपत एकत्र वाढायचं आहे. किती मोठा संस्कार आहे हा!
आणखी वाचा : चॉइस तर आपलाच: कुत्र्यांची भीती वाटते?
माझे सासूसासरे तर जीवनाचा आदर्श वस्तूपाठ आहेत. मी सून म्हणून घरात आले तेव्हाच त्यांनी मला स्पष्टपणे सांगून टाकलं. “आपलं अतिशय आवडतं काम हाच आपला देव! ते काम प्रामाणिकपणे करणं हीच देवपूजा! तू सणवार, देवधर्म यांत अडकू नकोस. तू निर्धास्तपणे स्वतःला स्वतःच्या कामांत झोकून दे!” हे सांगताना त्यांनी मला भक्कम पाठबळ दिलंच, पण त्याचबरोबर विरक्तीचा एक दुर्मीळ संस्कारही दिला. आज माझी सून आलीय, तेव्हा मला त्यांच्या शिकवणुकीचं मोल प्रकर्षाने जाणवतं. कलाकार म्हणून आपण संवेदनशील असतो. ही संवेदनशीलता जिवंत ठेवणं आवश्यकच आहे. पण त्यांत प्रमाणापेक्षा जास्त गुंतायचं ही नाही. स्वतःचं काम झोकून देऊन करण्याच्या नादात, आपण पुढच्या पिढीला आधार न देण्याची चूक तर करत नाही ना, हे भान ठेवायलाच हवं. वेळेला आपण चार पावलं मागे येऊन, त्यांना बहरण्याची संधी देणं, आतून स्वतःला आपल्या कामापासून अलिप्त करत जाणं हा धडा मी माझ्या सासू-सासऱ्यांच्या प्रगल्भ आचरणातून नकळत टिपला.
आणि आमच्या घरांत एक असा माणूस होता, ज्याने मलाच नव्हे, तर अनेकांना प्रेरणा दिली. मार्ग दाखवला. माझे आजोबा गो. नी. दांडेकर! मी भाग्यवान आहे, की मला थेट त्यांच्या घरात जन्म मिळाला. त्यांचा सहवास लाभला. त्यांच्याकडून काय काय घ्यावं आम्ही? त्यांना ५२ बोलीभाषा अवगत होत्या. तो माणूस तेराव्या वर्षी घरांतून पळाला. मग गाडगे महाराज, आळंदी देवस्थान, नर्मदा परिक्रमा. ‘कुणा एकाची भ्रमणगाथा’ या पुस्तकातून हे अनुभव विश्व उलगडत जातच. केवढं समृद्ध साहित्य विश्व! कमालच माणूस होते ते! मला नेहमी वाटतं, लहान मुलाला उंचावरची एखादी गोष्ट हवी असते, तेव्हा ते मूल उड्या मारमारून त्याला हात लावायचा प्रयत्न करतं. तशाच उड्या आमच्या चालू आहेत, आजही!
आप्पांचं शिवरायांवर अफाट प्रेम! अनेक गड किल्ले अनेक वेळा त्यांनी पालथे घातले. मला या योगायोगाची गंमत वाटते. आज दिक्पाल लांजेकर या तरुण दिग्दर्शकासोबत आम्ही शिवरायांवर आठ चित्रपट करत आहोत. खरोखर निष्ठा, प्रेम, अभ्यास आणि प्रामाणिकपणा हे गुण दिक्पालकडून शिकावे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराय’ हे चित्रपट त्यामुळेच प्रेक्षकांच्या काळजाला हात घालत आहेत.
पण मला इथे एक वेगळाच हृदयस्पर्शी प्रसंग सांगायचा आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या माझ्यावरील संस्कारांविषयी! आम्ही ‘राजा शिवछत्रपती’चं शूटिंग करत होतो. अमोल कोल्हे शिवछत्रपती! मी वृद्ध जिजाबाई! मुहूर्ताचा शॉट. नितीन देसाई यांचा भव्य सेट! हत्ती, घोडे, नगारे, हजारो माणसं! माझी आणि अमोलची मनांतल्या मनांत शॉटची जुळवाजुळव चालू होती. अमोल वेगळ्या रूटवर. मी वेगळ्या रूटवर. आप्पांच्या ‘हे तो श्रींची इच्छा!’ या कादंबरीतला राज्याभिषेकाचा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा होता. जिजाबाई म्हणतात, “आमचं एवढंसं लेकरू राजा होतंय. छत्रपती होतंय. या सगळ्या प्रवासामध्ये आपण एवढी माणसं गमावलीत. तीही माझी लेकरं होती. आज त्यांचं स्मरण होतंय.”
एका क्षणी जिजामाता थांबतात. महाराजांना मुजरा करतात. “आज तुम्ही राजे झालात. मी प्रजा आहे!” माझ्या डोळ्यांसमोर आप्पांनी रंगवलेला हा प्रसंग! दिग्दर्शकाने आम्हा दोघांना कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. शिवराय अर्थात अमोल कोल्हे, जिजाबाईंना अर्थात मला, नगारखान्याकडून सिंहासनाकडे हात धरून घेऊन येत आहेत असा शॉट चित्रित होतोय, त्या एका क्षणी हे सगळं आपल्याच बाबतीत कधीतरी घडून गेलंय, तो अंश कुठेतरी आपल्यात आहे, असं ग्रेट फीलिंग एकाच वेळी मला आणि अमोलला आलं. त्याने माझ्याकडे त्याच वेळी पाहिलं. माझ्या डोळ्यांतून घळा घळा अश्रू वाहात होते. शॉट संपला. व्यासपीठावर बसलेले बाबासाहेब पुरंदरे तिथून पायउतार झाले आणि त्यांनी आम्हा दोघांना मुजरा केला. पाणावलेल्या डोळ्यांनी! भारावलेल्या मनाने! माझ्या आयुष्यातला तो सुवर्णक्षण होता. आम्हा दोघांना ज्या दिव्य अनुभूतीचा स्पर्श झाला होता, तो त्या शिवशाहिरांनी अचूक टिपला होता आणि ते उत्स्फूर्तपणे म्हणाले, “आज या क्षणी आप्पा हवे होते!” त्या क्षणी एका अनोख्या भावनेने, अज्ञात संस्काराने माझ्या मनाला स्पर्श केला.
बाबासाहेब पुरंदरे शिवशाहीर होते. आप्पा शिवभक्त लेखक होते. त्या दोघांचंही योगदान वेगवेगळं. आम्हीही चित्रपटांतून प्रेक्षकांपर्यंत शिवकर्तृत्व पोहोचवत आहोत. माध्यमं वेगवेगळी आहेत. पण आमच्यातील शिवप्रेम तेच आहे. तीच तळमळ, तीच ऊर्जा, त्या ऊर्जेचा चैतन्यस्पर्श समान आहे. जणू तीन पिढ्यांमध्ये एक वर्तुळ पूर्ण झालं आहे. हे आत्मभूतीचे अनुभव, कळत-नकळत शिकवून जाणारे, मेन्टॉर ठरणारे…
madhuri.m.tamhane@gmail.com