मोनिका गजेंद्रगडकर
खरं सांगू? आज तीस वर्षांनंतर मागे वळून बघताना आठवतं. मी त्यावेळी पुणेरी सदाशिव पेठेतल्या उबदार घरांत वाढलेली ‘बावळट्ट’ मुलगी होते! त्यांत ते घरही एका लेखकाचं! विद्याधर पुंडलिकांचं! पण लग्नानंतर आई-वडिलांनी मुंबईत जणू मला फेकूनच दिलंय असं मला तेव्हा वाटायचं! अक्षरशः अंगावर यायचं हे शहर तेव्हा! त्या ट्रेन्स… त्यातली जीवघेणी गर्दी… त्या बायका… ते फेरीवाले… मला या कशाकशाची संवयच नव्हती. एमए, एमफिलपर्यंत शिक्षण झालेलं. तेव्हा मराठीची प्राध्यापक होणं एवढं छोटसं स्वप्न घेऊन या भल्या मोठ्या शहरांत आले. पण तेही पूर्ण होईना. घरात नुसतं बसायचं नव्हतं. मी सतार शिकले होते. म्हणून सतारीच्या ट्युशन्स घ्यायला सुरुवात केली. त्या ट्युशन्स होत्या चर्चगेटला! सायन ते चर्चगेट या प्रवासात हळूहळू मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे कळायला लागली. अनेक वेळा ठरलेली गाडी चुकणं, पुढच्या स्टेशनला जाणं किंवा आधीच्या स्टेशनवर उतरणं अशा बऱ्याच गंमतीजंमती व्हायच्या.

आणखी वाचा : International Day of the Girl Child: एका दिवसासाठी ‘ती’ झाली भारतातील ब्रिटिश उपउच्चायुक्त

Opinion of artists in The Mumbai Literature Live Festival about Jaywant Dalvi Mumbai news
सूक्ष्म निरीक्षणातून मानवी भावभावनांचा वेध घेणारे लेखक म्हणजे जयवंत दळवी; ‘द मुंबई लिटरेचर लाईव्ह फेस्टिव्हल’मध्ये कलाकारांचे मत
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Nayanthara News
“फक्त तीन सेकंदांच्या व्हिडीओसाठी…”, धनुषने कायदेशीर नोटीस पाठविल्याने नयनतारा भडकली; म्हणाली, “तुम्ही कशा प्रकारची व्यक्ती…”
Reshma Shinde
‘रंग माझा वेगळा’मध्ये सावळ्या मुलीला का घेतलं नाही? ‘अशी’ झालेली रेश्मा शिंदेची निवड; मालिकेच्या लेखकानं सांगितलं कारण
yek number actor vishal sudarshanwar plays raj thackeray role
“तेव्हा समोर स्वत: राजसाहेब बसले होते…”, ‘येक नंबर’मध्ये मनसे अध्यक्षांची भूमिका कोणी साकारलीये? अभिनेता म्हणाला…
raj Rajshekhar emotional letter written to grandfather Rajshekhar
“प्रिय आजोबा…”, मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक राजशेखर यांच्या नातवाने लिहिलं भावुक पत्र, म्हणाला…
Loksatta editorial on Donald Trump unique campaign in us presidential election
अग्रलेख: ‘तो’ आणि ‘त्या’!
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…

मला आठवतं, एकदा वीज पुरवठा खंडित झाला. मुंबई ठप्प झाली. सगळ्या ट्रेन्स बंद झाल्या. मी अतिशय नवखी या शहरात. माझं असं इथे कोणी कोणी नाही. मी हताशपणे चर्चगेट स्टेशनच्या पायऱ्यांवर बसकण मारली. गर्दीत कोणी कोणाला बघत नव्हतं. मी एकटी. मला घराची वाट दाखवणारं कोणीही नव्हतं. त्या ओसंडून वाहणाऱ्या गर्दीत जणू हरवूनच गेले मी! त्या क्षणी जाणीव झाली की इथे आपलं आपल्याला उभं राहायचं आहे. खरंच मुंबई बाहेरच्या माणसाला सगळं इतकं चकवणारं असतं! सुदैवाने त्यावेळी मला चुलत नणंद भेटली. मी सुखरूप तिच्या घरी गेले. पण या ठप्प झालेल्या मुंबईने मला शहाणं केलं. चांगलं उभं केलं. इतकं की या शहराचा अनोळखी चेहरा माझ्या अंगावर येईल या भीतीने पुढे गरोदरपणातसुद्धा अगदी शेवटच्या दिवसापर्यंत मी रेल्वेने कामानिमित्त प्रवास करत राहिले.

आणखी वाचा : सुंदर मी होणार : निगा हात आणि पायांची

या शहराने पुढे मला अनेक संधी मिळवून दिल्या. खूप खूप आत्मविश्वास दिला. आज मी अगदी पक्की मुंबईकर झालेय! सर्वार्थाने! इतके धडे या शहराने मला शिकवले. पुढे मी काय करावं हा प्रश्न मनांत घेऊन, मी सरोजिनी वैद्यांना जाऊन भेटले. त्यांनी एक छान कानमंत्र दिला. त्या म्हणाल्या, “सध्या करिअर, नोकरी सगळे प्रश्न बाजूला ठेव. तू रोज सकाळी डबा घे आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात जाऊन बस. तिथे तू जे वाचशील ते आयुष्यभर तुझी साथ करेल.” मी त्यांचा सल्ला शब्दशः मानला. पुढे त्यांनी मला अरुण टिकेकर यांना भेटण्यास सांगितलं. मी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात गेले. अरुण टिकेकरांनी माझं चांगलं स्वागत केलं. मी त्यांना म्हटलं, “मला साहित्यात काहीतरी करायचंय.” त्यांनी चक्क पुस्तकांचा एक गठ्ठा माझ्या हातांत ठेवला. म्हणाले, “यांतली तुम्हाला हवी ती पुस्तकं निवडा आणि पुस्तक परीक्षण लिहायला सुरुवात करा!” मी लोकसत्तात पुस्तक परीक्षण लिहू लागले.

आणखी वाचा : यशस्विनी : दुबईमध्ये योग लोकप्रिय करणारी ‘ती’ आहे तरी कोण?

त्यानंतर त्यांनी मला एक छोटसं सदर दिलं नाटकाच्या संदर्भात. म्हणजे नवीन नाटक आलं की त्याच्या लेखकाशी बोलायचं. त्याचे विचार, त्याच्या प्रेरणा जाणून घ्यायच्या. त्या लेखातून मांडायच्या. एखादा चांगला नट त्या नाटकात असेल तर त्याच्याशीही बोलायचं. अरुण टिकेकर यांनी या सदरातून मला अनेक माणसं भेटवली. मोहन वाघांशी माझे छान सूर जुळले. चंदू कुलकर्णी सारख्या अनेक दिग्गजांशी माझ्या ओळखी झाल्या. एरव्ही वर्तमानपत्रातील सदर हे तात्कालिक लेखन असतं. पण मला या सदराने काय मिळवून दिलं? तर माणसांचे स्वभाव कळायला लागले. आज लेखिका म्हणून एखादी व्यक्तिरेखा रंगवताना हे मला खूप उपयोगी पडतं. हे खूप मोठं देणं आहे मला अरुण टिकेकरांच! मला लेखनाची वाट त्यांनी पहिल्यांदा दाखवली. मग आपोआप अनेक वाटा खुल्या होत गेल्या. ‘लोकसत्ता’मधून मी ‘लोकप्रभा’कडे वळले. प्रदीप वर्मांनी मला अनेक लेखकांशी बोलून एक सदर लिहायला लावलं. त्यानिमित्ताने दुर्गाबाई भागवत, ज्योत्स्ना देवधर, मालतीबाई बेडेकर अशा खूप साहित्यिकांशी मी बोलत गेले. त्यातून माझ्या स्वतः मधली लेखिका कणाकणाने फुलत गेली.

आणखी वाचा : विवाहपूर्व मार्गदर्शन – लग्नाआधी आणि बदलत्या पार्टनर्सबरोबर सेक्स नकोच

एकदा टिकेकर मला सहज म्हणाले,“मौज’ ही साहित्यातली संपादन करणारी एकमेव संस्था आहे. क्रिएटिव्ह काम तुम्हाला करता येईल. बघा प्रयत्न करून.” गंमत म्हणजे, टिकेकरांनी जणू श्री.पु. भागवतांच्या कानांत सांगावं तसे एकदा अचानक श्री.पु. भागवत माझ्या घरी आले. म्हणाले, “मी तुझी परीक्षणं वाचतो. चांगलं लिहितेस तू. ‘मौज’च्या संपादनात मला मदत करशील का?” त्यांनी मला असं विचारावं हा केवढा मोठा सन्मान होता माझा! त्यांच्यासारखा विचक्षक संपादक आणि मी पूर्ण नवखी तरुण मुलगी. मी काय मदत करणार त्यांना? ते हसले. म्हणाले, “मी असं समजतो की, तू मातीचा गोळा आहेस. बघू मला आकार देता येतो का तुला?” मी रोज चार तास श्री.पु. भागवतांच्या घरी जायला लागले. कसं असतं बघा! नेमकं त्याचवेळी पुष्पा भावे यांनी मला सांगितलं, “रुईयात एक पोस्ट आहे. तुला प्रोफेसर व्हायचंय ना? तू ती पोस्ट घे.” पण मी ती संधी नाही घेतली. मी मौजच्या संपादनाची जबाबदारी स्वीकारली.

आणखी वाचा : यशोगाथा : ‘ती’ने केली पोलिओवर मात अन् झाली डॉक्टर!

हा निर्णय खरंच अचूक ठरला. माझ्या भविष्याच्या दृष्टीने! श्री.पु. भागवतांनी माझ्यातला संपादक घडवला. थेट काहीही न शिकवता. मी त्यांना पाहायची काम करताना. ते लेखकांची हस्तलिखितं कशी वाचतात, लेखकाची सर्जनशीलता, निर्मितीक्षमता कशी अजमावतात! ते ‘मौज’ कडे येणारी हस्तलिखितं मला वाचायला देत. मला म्हणत, “यातून लेखकाला नेमकं काय म्हणायचंय ते शोध. त्याच्या नोट्स काढ.” मी एक गोष्ट टिपली की, श्री.पु. प्रत्येक लेखकाकडे तटस्थपणे बघत. त्याचवेळी त्यात ते गुंतूनही जात. आपलीच कलाकृती आहे इतकं ते त्यात गुंतत. ते त्यांचं स्वतःचं लेखन नसताना सुद्धा! त्या गुंतण्याचेही माझ्यावर संस्कार झाले. संपादक म्हणून आणि लेखिका म्हणूनही! माझी स्वतःच्या लेखनाकडे आणि इतर साहित्यिकांच्या लेखनाकडे बघण्याची विचक्षक मर्मग्राही दृष्टी तयार झाली ती केवळ श्री.पुं.च्या संस्कारांमुळे!

आणखी वाचा : World Mental Health Day 2022: जास्त त्रास कोण भोगतं ? घर सांभाळणारी महिला की कामावर जाणारी?

श्री.पु. मला अनेक लेखकांची हस्तलिखित वाचायला देत. म्हणत की तू ही सानियाची कादंबरी वाच. तुला त्यातलं काय आवडलं आणि काय नाही आवडलं ते मला कळू दे. लिखाणात बिटविन द लाइन्स जो अर्थ असतो तो तुला किती कळतोय, त्या लिखाणातली सूचकता, आशयघनता तुला किती कळते, ते मला कळू दे. ते माझ्याकडून प्रत्येक हस्तलिखितावर असा अभ्यास करून घेत. जो मला आजही खूप उपयोगी पडतो.

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे – परस्त्रीचं आकर्षण ?

असं अनेक लेखकांनी त्यांच्या साहित्यातून मला नकळत घडवलं. प्रत्येक लेखकाच्या लिखाणावर अभ्यास करताना व व्यक्त होत असताना मला माझाच आत्मशोध लागत गेला. आशा बगे, मिलिंद बोकील, सानिया, गौरी देशपांडे यांचे साहित्य वाचत असताना मला माझ्यातल्या लेखिकेचा स्वर सापडत गेला. जाणिवांच्या कक्षा रुंदावत गेल्या आणि मी लिहिती झाले. माझ्यातला संपादक माझ्यातल्या लेखिकेला असा घडवत गेला. मी पहिली कथा लिहिली. श्री.पु. यांना वाचायला दिली. त्यांनी वाचली. मला म्हणाले, “तुझी ही कथा म्हणजे कथा कशी नसावी याचे उत्तम उदाहरण आहे.” त्यांना ती कथा बिलकुल आवडली नाही. तिथे संपादनाचं काम करत असूनही त्यांनी माझ्या अनेक कथा नापसंत केल्या. त्यांच्या दृष्टीने पहिली कथा मला जमली, तेव्हा त्यांनी मला सावध केलं की, प्रत्येक कथा तुला हुलकावणी देईल. चकवा असतो तो! लेखकाला ती हातावर घेणं, घेता येणं फार कठीण! जेवढं तू अनुभवांचं उत्खनन करत जाशील तेवढी तुला कथा सापडत जाईल. कोणतीही निर्मिती परिपूर्ण असेलच असं नाही. पण त्यासाठी सतत प्रयत्न करत राहायला हवं. त्यासाठी तुला माणसं ओळखता आली पाहिजेत. माणसं वाचता आली पाहिजेत. तरच तुझ्या व्यक्तिरेखा तुला सापडत जातील!”

आणखी वाचा : कोण आहे ही शी- हल्क?

माणसं कशी ओळखायची त्याचा हा एक किस्सा! मी त्यावेळी संपादनात नवखी होते. कमल पाध्ये यांचं ‘बंध अनुबंध’हे पुस्तक मौजने काढलं होतं. त्याचा प्रकाशन समारंभ एक संस्था करणार होती. मला कमल पाध्येंची मुलाखत घ्यायला सांगितलं होतं. मी पूर्ण तयारी केली. मात्र आयत्यावेळी मला वगळण्यात आलं. ते पाहून रडूच फुटलं मला. मला त्याचा खूप मानसिक त्रास झाला. पण श्री.पु.यांनी मला सावरलं. ते म्हणाले, “असे अनेक प्रसंग पुढे सुद्धा तुझ्या आयुष्यात येतील. पण त्याचे आपल्या व्यक्तिमत्त्वावर चरे पडून द्यायचे नाहीत. आपलं मन, आपले विचार व व्यक्तिमत्व अशा प्रसंगांनी गढूळ होऊ द्यायचं नाही.” श्री. पु. भागवत यांनी मोजक्या शब्दांत मला आयुष्याचं सार सांगितलं.

आणखी वाचा : पोन्नीयिन सेल्व्हन: इथे स्त्रिया राज्य करतात…

लोक म्हणतात की लेखनाचा वारसा मला माझ्या वडिलांकडून मिळालाय. ते खरं असेलही! मी एक पाहिलं होतं. बाबा भान हरपून लिहीत असत. नेहमीच. छापून आलेली कथा सुद्धा ते पुन्हा पुन्हा वाचत आणि दुरुस्त करत. ते आपल्या लिखाणावर कधीही संतुष्ट नसत. माझ्यावर त्यांचा तोच संस्कार झालाय. मी कमी लिहीन. पण जे लिहीन, ते हे मोनिकाचं लिखाण आहे आणि ते वाईट नसणार एवढं तरी लोकांनी म्हटलं पाहिजे, या महत्त्वाकांक्षेचा स्पर्श माझ्या मनाला झालाय तो वडिलांचाच संस्कार आहे. म्हणूनच बाबांप्रमाणे आपणसुद्धा जे लिहितोय, ते गुणवत्ता पूर्ण आणि परिपूर्णच असावं यावर माझा कटाक्ष असतो!
शब्दांकन- माधुरी ताम्हणे
madhuri.m.tamhane@gmail.com