सोशल मीडियातील आघाडीची कंपनी ‘मेटा’नं संध्या देवनाथन यांची ‘इंडिया हेड’ म्हणून नियुक्ती केली आहे. अजित मोहन यांच्या राजीनाम्यानंतर ‘मेटा’च्या भारतातील व्यवसायाची जबाबदारी १ जानेवारी २०२३ पासून आता देवनाथन सांभाळणार आहेत. ‘इन्स्टाग्राम’, ‘फेसबुक’ आणि ‘व्हॉट्सअॅप’ची मालकी असणाऱ्या ‘मेटा’नं देवनाथन यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे.
मेन्टॉरशिप : कोरिओग्राफर दीपाली विचारे- लाभली चालती बोलती विद्यापीठं !
देवनाथन यांच्या नियुक्तीवर ‘मेटा’चे मुख्य व्यवसाय अधिकारी मार्ने लेविन यांनी आनंद व्यक्त केला आहे. “भारतातील आमचं नवं नेतृत्व संध्या देवनाथन यांचं स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. संध्या यांनी नाविण्यपूर्ण उत्पादनांच्या विकासाला चालना दिली असून स्केलिंग व्यवसायासह ग्राहकांमध्ये मजबूत भागीदारी निर्माण करण्यात मोठी कामगिरी बजावली आहे”, असं लेविन यांनी म्हटलं आहे.
कोण आहेत संध्या देवनाथन?
संध्या देवनाथन २०१६ पासून ‘मेटा’मध्ये कार्यरत आहेत. सिंगापूर आणि व्हिएतनाममध्ये कंपनीच्या स्थापनेसह टीम तयार करण्यात देवनाथन यांचा मोठा वाटा आहे. ‘मेटा’च्या दक्षिण-पूर्व आशियातील ई-कॉमर्स व्यवसायाला त्यांच्या प्रयत्नांनी उभारी मिळाली आहे.
बाळंतपण नैसर्गिक की सिझरीयन; त्याचा बालकांच्या लसीकरणावर काय परिणाम होतो?
देवनाथन यांना बँकिंग, पेमेंट्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये २२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. देवनाथन यांनी २०२० मध्ये APAC (Asia-Pacific region)च्या गेमिंग विभागाचे नेतृत्व केले होते. याशिवाय व्यवसायात महिलांचं योगदान वाढवण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले आहेत. मेटाच्या ‘APAC’ चं त्यांनी कार्यकारी प्रायोजक म्हणून काम पाहिलं आहे.
आंध्रप्रदेशातून पदवीचं शिक्षण
संध्या देवनाथन यांनी आंध्र विद्यापीठातून १९९८ मध्ये केमिकल शाखेत ‘बी.टेक’ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी २००० साली दिल्ली विद्यापीठाच्या ‘फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज’मधून एमबीए केलं. भारतातील शिक्षणानंतर ऑक्सफॉर्ड विद्यापीठात त्यांनी ‘लीडरशीप’चा कोर्स पूर्ण केला.
नातेसंबंध : नात्यातच होतंय लैंगिक शोषण?
उच्चशिक्षणानंतर ‘सिटी बँक’ आणि ‘स्टँडर्ड चार्टर्ड’ या बँकांसाठी त्यांनी काम पाहिलं. मे २००० ते डिसेंबर २००९ या कालावधीत त्यांनी सिटी बँकेत विविध पदांवर काम केलं. त्यानंतर सहा वर्ष ‘स्टँडर्ड चार्टर्ड’मध्ये काम केल्यानंतर त्यांनी ‘मेटा’मध्ये प्रवेश केला. देवनाथन यांनी विविध संस्थांच्या संचालक मंडळावरदेखील काम केलं आहे. ‘वुमन्स फोरम फॉर द इकॉनॉमी अँड सोसायटी’, ‘नॅशनल लायब्ररी बोर्ड ऑफ सिंगापूर’, ‘पेपर फायनान्शिअल सर्व्हिसेस ग्रुप’, ‘सिंगापूर मॅनेजमेंट युनिव्हर्सिटी’ आणि ‘माहिती आणि दळणवळण मंत्रालय’मध्ये (सिंगापूर) देवनाथन कार्यरत होत्या.
देवनाथन यांची नवी भूमिका काय आहे?
भारतातील मोठे ब्रँण्ड्स, निर्माते, जाहिरातदार आणि भागिदारांशी धोरणात्मक संबंध दृढ करण्यावर देवनाथन यांचा भर असेल. भारतातील ‘मेटा’च्या महसुलात वाढ करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर असणार आहे. देवनाथन यांनी कंपनीच्या कठिण काळात भारतातील व्यवसायाचे नेतृत्व स्वीकारले आहे. मेटानं काही दिवसांपूर्वीच कंपनीतून जवळपास ११ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. अशात ‘मेटा’च्या भारतातील व्यवसायाचा विस्तार करण्याचं मोठं आव्हान संध्या देवनाथन यांच्यासमोर असणार आहे.