डोनाल्ड ट्रम्प यांनी २० जानेवारीला दुसऱ्यांदा अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतल्यापासून त्यांच्या उक्ती आणि कृती जगाला काळजीत टाकणाऱ्या असल्याचे दिसत आहे. विशेषतः मेक्सिको आणि कॅनडा हे शेजारी देश; भारत, युक्रेन हे मित्रयादीतील देश, प्रमुख प्रतिस्पर्धी चीन, युरोपसारखी दीर्घकालीन सहकारी आघाडी या सर्वांबद्दल त्यांनी उलटसुलट वक्तव्ये केली, त्यांच्याबरोबर आर्थिक आणि राजकीय संबंध पणाला लावले. अशा वेळी या सर्व देश आणि आघाड्यांच्या प्रमुखांनी त्यांना कसा प्रतिसाद दिला याकडे सर्वांचे लक्ष होते. अशावेळी मेक्सिकोच्या अध्यक्ष क्लॉडिया शिनबाऊम यांनी दाखवलेला खमकेपणा सर्वांच्याच डोळ्यात भरला.

मेक्सिकोवर मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून २५ टक्के परस्परशुल्क लादण्याच्या घोषणेला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा स्थगिती दिली. आता नवीन वेळापत्रकानुसार २ एप्रिलपासून मेक्सिकोवर नवीन दराने आयातशुल्क लागू केले जाईल असे त्यांनी ६ मार्चला जाहीर केले. त्याचवेळी, एकाचवेळी ट्रम्प व अमेरिकेवर टीका करताना त्यांच्याशी वाटाघाटी करत आपल्या देशासाठी फायदेशीर मार्ग शोधण्याचे शिनबाऊम यांचे कौशल्यही लक्षात घेतले जात आहे.

शिनबाऊम जून २०२४मध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या तेव्हा त्यांनी १९८२नंतर सर्वाधिक मते मिळवण्याचा विक्रम केला होता. मेक्सिकोच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून त्यांनी १ ऑक्टोबर २०२४ रोजी अध्यक्षपद स्वीकारले, तेव्हापासून त्यांची लोकप्रियता कायम आहे. आतापर्यंत घेण्यात आलेल्या बहुसंख्य सर्वेक्षणांमध्ये त्यांना जवळपास ७५ टक्के नागरिकांनी आपली पसंती दर्शवली आहे.

मेक्सिकोच्या काँग्रेस या सर्वोच्च कायदेमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये त्यांच्याकडे बहुमत आहे. त्याचा फायदा घेऊन त्यांनी आपल्या मोरेना पक्षाच्या अजेंड्यावर असलेल्या अनेक योजना आणि धोरणे राबवायला सुरुवात केली. त्यांनी राज्यघटनेत अनेक सुधारणा करवून घेतल्या. त्यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील न्यायाधीशांच्या निवडणुकांचा समावेश आहे. मेक्सिकोच्या इतिहासातील ही अभूतपूर्व बाब आहे. त्याशिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी सहा वर्षांची औद्योगिक योजनेची घोषणा केली आहे.

ट्रम्प यांनी पहिल्यांदा मेक्सिकोवर २५ टक्के आयातशुल्क लावण्याची घोषणा केली तेव्हा शिनबाऊन यांनी त्यांना उत्तर दिले. हे उत्तर जगभरात चर्चेचा विषय ठरले. त्या भाषणाचा सारांश असा की, ‘‘अमेरिकी बांधवांनो, तुम्ही भिंत बांधण्यासाठी मतदान केले आहे. तुम्हाला भूगोल फारसा कळत नसला तरी तुम्हाला हे समजले पाहिजे की, अमेरिका स्वतंत्र खंड नाही तर तो केवळ एक देश आहे. तुम्ही जी भिंत बांधणार आहात त्या विटांच्या पलिकडे आणखी सात अब्ज लोक राहतात. पण तुम्हाला ‘लोक’ म्हणजे काय ते माहीत नाही म्हणून आम्ही तुम्हाला कळेल असा ‘ग्राहक’ हा शब्द वापरतो. तर हे सात लाख ग्राहक ४२ तासांच्या आत आयफोन वापरणे सोडून सॅमसंग किंवा हुवाय वापरायला तयार आहेत. ते लेविसऐवजी झारा किंवा मास्सिमो ड्युटी वापरतील. सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत आम्ही फोर्ड किंवा शेवरलेट कार विकत घेण्याचे थांबवू आणि त्याऐवजी टोयोटा, केआयए, माझदा, होंडा, ह्युंदाई, व्होल्वो, सुबारू, रेनॉल्ट किंवा बीएमडब्ल्यू या तांत्रिकदृष्ट्या सरस गाड्या वापरायला लागू. आम्ही हॉलिवूडचे चित्रपट पाहणे थांबवू आणि अधिक आशयसंपन्न असलेले लॅटिन अमेरिका किंवा युरोपचे चित्रपट पाहू. आमच्यासमोर डिस्नेऐवजी इतर कितीतरी पर्याय उपलब्ध आहेत. आणि तुमचा विश्वास नसेल तर तुम्हाला हेही सांगते की, मॅकडोनल्ड्सपेक्षा चांगले आणि सकस हॅम्बर्गर मेक्सिकोत मिळतात.’’

केवळ ग्राहकोपयोगी वस्तूंचा उल्लेख करून शिनबाऊम थांबल्या नाहीत तर इजिप्त, मेक्सिको, पेरू, ग्वाटेमाला, सुदान आणि अन्य देशांप्रमाणे अमेरिकेकडे वैभवशाली ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा नाही याचीही त्यांनी पिरॅमिडचे उदाहरण देऊन जाणीव करून दिली. अमेरिकेत असा काही ठेवा असता तर ट्रम्प यांनी तो खरेदी करायला आणि विकायला कमी केले नसते अशी बोचऱ्या शब्दांमध्ये त्यांनी अमेरिकी मतदार व ट्रम्प समर्थकांना सुनावले.

मेक्सिकोवर आयातशुल्क लादण्याच्या निर्णयाला दुसऱ्यांदा मुदतवाढ देताना, हा निर्णय आपण शिनबाऊम यांच्याबद्दल वाटणाऱ्या आदरापोटी घेतल्याचे ट्रम्प यांनी जाहीरपणे सांगितले होते. ट्रम्प खरे बोलण्यासाठी प्रसिद्ध नाहीत. त्यामुळे त्यांना मेक्सिकोच्या अध्यक्षांविषयी खरोखर किती आदर वाटतो हे त्यांनाच माहीत. पण कठीण परिस्थितीत न डगमगता ठाम भूमिका घेण्याच्या वृत्तीमुळे शिनबाऊम यांच्याविषयी जगात इतरत्र आदर वाढला असेल असे म्हणायला जागा आहे.

nima.patil@expressindia.com

Story img Loader