प्रेम टिकण्यासाठी, ते ताजंतवानं राहण्यासाठी कोणती गोष्ट महत्त्वाची आहे? प्रेमात विश्वास तर असावाच लागतो. पण रोमान्स असल्याशिवाय प्रेमाचं नातं फुलत नाही, बहरत नाही. आपल्याकडे तर हिंदी सिनेमे आणि आता टीव्ही मालिकांमधून दाखवल्या जाणाऱ्या रोमान्सनं अनेकांच्या अपेक्षा वाढवल्या आहेत. पण मोठमोठे बुके, महागड्या डिनर डेट, व्हेकेशन्सऐवजी महिलांना अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून व्यक्त केलेलं प्रेम आवडतं. बम्बल २०२५ डेटिंग ट्रेंड्स (Bumble २०२५ Dating Trends) या डेटिंग वेबसाईच्या वतीने हे सर्वेक्षण करण्यात आलं. रोमान्स कालबाह्य झालेला नाही तर तो आता छोट्या छोट्या गोष्टींमधून सामावला आहे, असा निष्कर्ष या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे. भारतातील जवळपास निम्म्या म्हणजेच ५७% महिला स्वत:ला रोमँटिक समजतात, त्यांना प्रेम करायला आवडतं, असं या सर्वेक्षणात म्हटलं आहे. पण त्यांच्या रोमान्सबद्दलच्या अपेक्षा फार मोठ्या नाहीत. तर छोट्या छोट्या, पण सातत्यपूर्ण गोष्टी भारतीय महिलांना जास्त भावतात. म्हणजेच अगदी भलेमोठे बुके, गुलाबाची फुलं देणं किंवा कँडल लाईट डिनर वगैरे करण्यापेक्षा या साध्या छोट्या गोष्टी महिलांना जास्त रोमँटिक वाटतात. यालाच ‘मायक्रोमॅन्स’ (Micromance) असं म्हणतात. उदाहरणच द्यायचं झालं तर सकाळी धावपळीच्या वेळेस जोडीदाराने केलेली मदत किंवा आपणहून तिला दिलेला चहा हा जास्त रोमँटिक वाटतो. विशेष म्हणजे जवळपास ६१% महिलांना सकाळच्या वेळेस जोडीदारानं दिलेला चहा/ कॉफी मनापासून आवडतो असं या सर्वेक्षणामध्ये म्हटलं आहे.
यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे महिला पुरुषांपेक्षा जास्त भावनाशील असतात. त्या कल्पनाविलासात जास्त रमतात असंही म्हटलं जातं. त्यामुळेच रोमँटिक कादंबऱ्या वाचण्याचं, रोमँटिक सिनेमे पाहण्याचं महिलांचं प्रमाणही पुरूषांपेक्षा जास्त आहे. रोमान्सची कमतरता असणं हे नात्यातलं मोठं आव्हान असल्याचं मत ३४.८% सिंगल महिलांनी या सर्वेक्षणातून व्यक्त केलं आहे. जवळपास ५०.४% सिंगल महिलांना त्यांच्या डेटिंग आयुष्यात थोडा जास्त रोमान्स असावा असं वाटतं असं सर्वेक्षणात म्हटलं आहे.
आता मायोक्रोमॅन्स म्हणजे काय? तर यासाठी काही खूप खर्च करावा लागत नाही. तुमच्या छोट्या गोष्टींमधून तुम्ही जोडीदाराबद्दल प्रेम व्यक्त करणं. आवडीची प्लेलिस्ट म्हणजेच गाणी लावणं, व्हॉट्सअपवर प्रेमाची खूण असलेल्या इमोजी पाठवणं, सहज एखादा फोन करणं, रोमँटिक मेसेज पाठवणं हे तर यामध्ये येतंच. पण बायको किंवा जोडीदार कामात असताना तिला मदत करणं, प्रेमानं संवाद साधणं अशा गोष्टींमुळे महिला आपल्या जोडीदाराच्या जास्त जवळ येतात. हे काही क्षण फक्त दोघांचेच असतात. त्यामुळे ते अगदी खास असतात. त्यासाठी सोशल मीडियावर हॅशटॅग तयार करून जगाला दाखवण्याचीही गरज नसते. अशा रोजच्या क्षणांमधून फुलत असलेलं प्रेम जास्त टिकतं असं म्हटलं जातं. हे प्रेम जास्त काळ टिकतं असा दावा केला जातो. याचं कारण म्हणजे या प्रेमात दिखावा नसतो. एकमेकांना समजून घेऊन जोडीदाराच्या आवडीच्या गोष्टी मनापासून केल्या जातात, त्यामुळे अशा नात्यात ब्रेकअपची शक्यताही कमी असते.
हल्ली प्रत्येकाचंच आयुष्य तणावपूर्ण झालं आहे. नोकरीच्या ठिकाणी धावपळ, प्रचंड स्पर्धा, ट्रॅफिकमध्ये जाणारा वेळ, कौटुंबिक जबाबदाऱ्या अशा चक्रामध्ये सगळेजण अडकलेत. नातं तर फुलवण्यासाठी वेळ मिळत नाही. सुट्टीअभावी, जबाबदाऱ्या, आर्थिक परिस्थिती अशा कारणांमुळे इच्छा असूनही जोडीदाराबरोबर रोमान्स करता येत नाही. पण मायक्रोमान्ससाठी तुम्हाला वेगळा वेळ काढावा लागत नाही, पैसेही खर्च करावे लागत नाही. एखाद्या वेळेस ऑफिसमधून सुटल्यावर एखाद्या टपरीवर घेतलेला चहाही या नात्याची रंगत वाढवतो. कामाचा कितीही ताण असू दे जोडीदाराच्या आवडीचं गाणं लावलंत, एक कप गरमागरम कॉफी/चहा किंवा आवडीचं खाणं समोर ठेवलंत तर तिच्या / त्याच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद तो थकवा दूर करतो. Micromance मध्ये आपला जोडीदार आपल्याकडे आवर्जून लक्ष देत आहे असा विश्वास निर्माण होतो. त्यामुळे एकमेकांबरोबर प्रत्येक गोष्ट शेअर केली जाते. अशा नात्यांमध्ये लपवाछपवी नसते, त्यामुळे ही नाती जास्त टिकतात.
या सर्वेक्षणातून जेन Z बद्दल एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. नात्यांमध्ये हास्यविनोद महत्त्वाची भूमिका बजावतो असं जेन Z मधील ५१.३% सिंगल भारतीयांना वाटतं. त्यामुळे एखादं परफेक्ट मीम किंवा ‘देसी पॅरेंट’वर लिहिलेला जोक हा एखाद्या प्रेमपत्राइतकीच महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे तुम्ही सिंगल असाल किंवा तुमचं लग्न झालेलं असेल तरीही ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. डायमंड रिंग, कँडल लाईट डिनर, एखाद्या छानशा ठिकाणी घालवलेली सुट्टी या गोष्टी कदाचित तुमच्या जोडीदाराला अपेक्षित नसतीलही. शेवटी प्रेम म्हणजे एकमेकांच्या आनंदाच्या/आवडीच्या गोष्टी करणं. तो आनंद जर अशा साध्या सोप्या गोष्टींमध्ये सामावला असेल तर रोजच्या जगण्यातले चार क्षण फक्त तुमच्या जोडीदारासाठी जगा, मग बघा… तुमच्या नात्यातला रोजचा दिवस व्हॅलेंटाईन डे होऊन जाईल!