फॅशनच्या बाजारात दररोज काही ना काही उटपटांग वस्तू येत असतात. मग तत्काळ ‘फॅशन इनफ्लूएन्सर्स’च्या ‘कंटेंट’मध्ये या वस्तूंचा सुकाळ दिसू लागतो. अर्थातच सामान्य व्यक्तींनाही सारख्या सारख्या या वस्तू पाहून त्याविषयी कुतुहल निर्माण होतं आणि त्या वापरून बघायलाच हव्यात याचा निर्णय पुष्कळदा त्या वस्तूंच्या व्यवहार्य उपयोगाचा विचार न करताच पक्का केला जातो. सध्या दिसणारी अशी एक वस्तू म्हणजे ‘मायक्रोवेव्हेबल जेल कर्लर’!
कर्लर या शब्दावरून हे केस कुरळे करण्याचं उत्पादन असणार, हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल. मग मायक्रोवेव्हचा त्यात काय संबंध आहे?… इन्फ्लूएन्सर्सनी उचलून धरलेली ही फॅशन बाजारातली वस्तू आहे तरी काय, ते पाहू या-
मायक्रोवेव्हेबल जेल कर्लरमध्ये मधोमध हेअरबँडसारखी एक सपाट पट्टी असते आणि त्याच्या दोन्ही बाजूला केस गुंडाळण्यासाठी दोन पुंगळ्या जोडलेल्या असतात. हे लहानसं उपकरण एका लहान पिशवीत येतं आणि त्या पिशवीसकट ते मायक्रोवेव्हमध्ये गरम करायचं असतं. ते किती वेळ गरम करावं, हा कालावधी ब्रँडनुसार बदलू शकतो. (उदा. ३० सेकंदांसाठी.) मायक्रोवेव्हमधून ते काढल्यावर आधी केसांचे कंगव्यानं दोन भाग करून केस विंचरून घेतात, त्यानंतर कर्लरचा हेअरबँडसारखा सपाट भाग केसांच्या मधोमध हेअरबँडसारखा लावतात आणि तो टिकटॉक (खटक्याच्या) पिनांनी केसांवर पक्का बसवतात. मग कर्लरच्या पुंगळ्यांवर केस गोल गोल वेढे देत गुंडाळत नेतात आणि सर्वांत शेवटी या पुंगळ्यांच्या टोकांशी रबरं लावून टाकतात. या कर्लरच्या पुंगळ्यांमध्ये ‘जेल बीडस्’ वापरलेले असतात. ते मायक्रोवेव्हमध्ये गरम होतात आणि त्यावर केस गुंडाळून ठेवल्यानं केस कुरळे होतात, असा दावा उत्पादक करतात.
हेही वाचा… ग्राहकराणी: जाहिरातींना भुलताय?
यात लक्षात घेण्यासारखी आणखी एक गोष्ट अशी, की केस या कर्लरवर नुसतेच गुंडाळायचे नाहीयेत. ते गुंडाळण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. आपण केसांची वेणी घालताना जसे केसांचे पेड करतो, तसे करून प्रत्येक वेळी गुंडाळताना आणखी थोडे केस त्या पेडात घ्यायचे असतात. ही पद्धत दाखवणारे ढीगभर व्हिडीओ तुम्हाला समाजमाध्यमांवर दिसतील. या मायक्रोवेव्हेबल कर्लरच्या वापरात ऊर्जेची आणि वेळाचीही बचत होते असा दावा केला जातो. या जेल कर्लरवर केस गुंडाळून ते किती वेळ ठेवायचे, हा वेळही ब्रँडनुसार वेगवेगळा असतो. मात्र साधारण १ तासात यात केस कुरळे होतात, असं सांगितलं जातं.
काही इन्फ्लूएन्सर्सच्या मते हा मायक्रोवेव्हेबल कर्लर काम करतो आणि कर्लरवर केस गुंडाळून मध्ये पाऊण ते एक तास ते कुरळे होण्यासाठी जे थांबावं लागतं, तेवढ्या वेळात व्यक्ती इतर मेकअप करून घेऊ शकते, तयार होऊ शकते. तसंच दुसऱ्या बाजूस हे कर्लर अजिबात उपयोगाचे नाहीत, असंही सांगणारे इन्फ्लूएन्सर्स आहेतच! मग केस कुरळे करू इच्छिणाऱ्या फॅशनप्रेमींनी निर्णय कसा घ्यावा असा प्रश्न निर्माण होऊ शकतो! शेवटी उपाय एकच! तर याचा प्रत्यक्ष उपयोग करून दाखवणारे काही व्हिडीओ चिकित्सकपणे पहायचे आणि उत्पादनाचं वर्णन नीट वाचून मगच आपल्या विचारानं निर्णय घ्यायचा. नाहीतर अशा विविध उत्पादनांवर पैसे वाया जाण्याचीच शक्यता अधिक असते!