शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असणारे सर्व घटक दुधामध्ये असतात. म्हणूनच दुधाला पूर्णान्न असे संबोधले जाते. अगदी तान्ह्या बाळापासून वयोवृद्धापर्यंत सर्वांनाच उपयोगी, तसेच अनेक आजारांमध्ये पथ्यकर पेय म्हणून दुधाची गणना केली जाते. फार प्राचीन काळापासून विविध प्राण्यांच्या दुधाचा उपयोग आहारामध्ये केला जातो. प्रामुख्याने गाय, म्हैस, शेळी यांचे दूध आहारात पेय म्हणून वापरले जाते. याशिवाय मेंढी, गाढवीण, उंटीण, हत्तीण, घोडी यांच्याही दुधाचा वापर काही ठिकाणी त्यांच्यात असणाऱ्या औषधी गुणधर्मामुळे केला जातो. स्त्रीचे दूधही तिच्या बालकाच्या शारीरिक व मानसिक वाढीसाठी वापरले जाते. काही वेळेला बालकाची आई आजारी असेल व ती बाळाला दूध पाजण्यास असमर्थ असेल, तर अशा वेळी पर्याय म्हणून दुसऱ्या स्त्रीचे (दाईचे) दूध बालकासाठी वापरले जाते. मराठीमध्ये ‘दूध’, संस्कृतमध्ये ‘दुग्ध’, तर इंग्रजीमध्ये ‘मिल्क’ (Milk) या नावाने दूध ओळखले जाते.
आणखी वाचा : आहारवेद : कॉफी घ्या, पण क्वचितच!
औषधी गुणधर्म
बल्यं वृष्यं वाजीकरणम् रसायनम् मेध्यं संधानम् आस्थापनं वयस्थापनमायुष्यं जीवनं बृंहणं वमनविरेचनास्थापनं तुल्यगुणत्वाच्चौजसः वर्धनम् ।
सुश्रुत सूत्रस्थान ४५/४९
आयुर्वेदानुसार दूध हे रसायन कार्य करणारे असून, आयुष्य वाढविणारे आहे.
आधुनिक शास्त्रानुसार : दुधामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, सर्व जीवनसत्त्वे, आर्द्रता, प्रथिने, स्निग्धता, खनिजे व पिष्टमय पदार्थ असतात. दुधामध्ये प्रथिनांचे प्रमाण विपुल असून, शरीरबांधणीसाठी आवश्यक असणारी सर्व ॲमिनो ॲसिड्स भरपूर प्रमाणात असतात. या सर्व घटकांमुळे शरीराच्या झीज झालेल्या पेशींची पुनर्निर्मिती होते व स्नायूंची घडण मजबूत होते.
आणखी वाचा : आहारवेद :फक्त अर्धा कप चहा
गाय, म्हैस इत्यादी प्राणी वेगवेगळ्या वनस्पती खातात व त्यांचे सार त्यांच्या दुधामध्ये एकत्रित झाल्याने असे दूध चवीला मधुर, किंचित ओशट, शीत, स्निग्ध, सारक, मृदू अशा गुणांनी युक्त असते. दूध शरीराला बळ देणारे, मैथुन शक्ती वाढविणारे, सर्व धातूंची वृद्धी करून रसायन कार्य करणारे, आयुष्य वाढविणारे, शरीरांवर झालेल्या जखमा भरून आणणारे, नवीन पेशींची निर्मिती करणारे, पुष्टिदायक, स्फूर्तिदायक असे आहे.
आणखी वाचा : आहारवेद:घातक वनस्पती तूप
उपयोग
१) रोज सकाळी १ ग्लास दूध प्याल्याने शरीर शक्तियुक्त होते. बुद्धी वाढून स्मरण सुधारते. शारीरिक व मानसिक थकवा जातो. स्नायू कार्यक्षम होतात व एकूणच आरोग्य सुधारून आयुष्यमान वाढते.
२) अशक्त व्यक्ती, गर्भवती व बाळंतिणी स्त्रिया, लहान बालके, तरुण आणि अत्यंत गुणकारी, आरोग्यदायी आहे. वृद्ध लोकांसाठी दूध पिणे अत्यंत गुणकारी आणि आरोग्यदायी आहे.
३) आहार आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून दुधापासून तयार झालेले दही, लोणी, तूप व ताक हे सर्वच पदार्थ आरोग्य टिकविण्यासाठी उपयुक्त असून, दुधाचे स्थान हे उच्च प्रतीचे आहे.
४) आरोग्याच्या दृष्टिकोनातून म्हशीच्या दुधापेक्षा गायीचे दूध श्रेष्ठ आहे. गायीच्या दुधाच्या सेवनाने वातप्रकोप होत नाही. तसेच ते बुद्धिवर्धक, अग्निप्रदीपक, रेचक गुणधर्माचे असल्याने मलावरोध न होता शौचास साफ होते. गायीचे दूध सात्त्विक गुणधर्माचे असते, तर म्हशीच्या दुधामध्ये चरबीचे प्रमाण जास्त असल्याने ते पचण्यास जड असते व कफप्रकोप करणारे असते.
५) गायीचे दूध गरम करून त्यात खडीसाखर व चिमूटभर मिरेपूड घालून ते प्याल्यास सर्दी दूर होते.
आणखी वाचा : आहारवेद: पचनासाठी त्रासदायक साबुदाणा
६) वारंवार उचकी येत असेल, तर गायीचे दूध गरम करून त्यात थोडी खडीसाखर व सुंठ घालून गरम असतानाच प्यावे.
७) गायीच्या गरम दुधात तूप आणि खडीसाखर घालून ते सेवन केल्यास शरीराचा थकवा नाहीसा होऊन उत्साह निर्माण होतो. गरम दूध पिणे हे शारीरिक कष्ट करणाऱ्या लोकांसाठी अमृतासमान कार्य करते.
८) गायीच्या दुधात सुंठ घालून त्याचा लेप करून कपाळावर कापसाबरोबर लावावा, असे केल्याने तीव्र डोकेदुखीपासून त्वरित आराम मिळतो.
९) रात्री जागरण केल्याने जर डोळ्यांची व तळपायांची आग होत असेल, तर गायीच्या दुधात कापूस भिजवून त्याच्या पट्ट्या डोळ्यांवर व तळपायांवर ठेवल्यास डोळे दुखण्याचे त्वरित थांबून डोळ्यांना आराम मिळतो.
१०) चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी दुधावरील साय दहा मिनिटे चेहऱ्यावर हलक्या हाताने चोळून पुन्हा दहा मिनिटे तशीच ठेवावी व त्यानंतर हरभराडाळीच्या पिठाने चेहरा स्वच्छ धुवावा. यामुळे चेहऱ्याचे रक्ताभिसरण वाढून चेहरा तेजस्वी होतो. हा प्रयोग पंधरा दिवसांतून किंवा महिन्यातून एकदा केल्यास फेशिअल करण्याची गरज पडत नाही.
११) आम्लपित्ताचा त्रास असणाऱ्यांसाठी दूध हे अमृतासमान आहे. दुधात अल्कली बनविणारे घटक जास्त प्रमाणात असल्याने पचनसंस्थेतील आम्ल दूधसेवनाने कमी होते. कारण दूध पचण्यासाठी बरेच आम्ल खर्ची पडते.
१२) ज्यांना मानसिक ताणतणाव होऊन अति चिंता, निद्रानाशाचा त्रास होत असेल अशांनी रात्री झोपताना पेलाभर दूध त्यात २ बदामांची पेस्ट व मध घालून रोज रात्री प्यावे. हे पेय पौष्टिक असून, त्वरित निद्रा आणणारे आहे.
१३) सर्दी, खोकला, घसा बसणे या विकारांवर पेलाभर उकळलेल्या दुधात चिमूटभर हळदी, चिमूटभर ओवा, चिमूटभर विलायची व चिमूटभर काळी मिरीची पूड टाकून सलग चार ते पाच दिवस रात्री झोपताना घेतल्यास सर्दी-खोकल्यापासून त्वरित आराम मिळतो. असे दूध घेतल्यानंतर काही तास पाणी पिऊ नये.
१४) अर्धी वाटी दुधात, अर्धे लिंबू पिळून कापसाने हे मिश्रण चेहरा, मान, त्वचा यावर लावल्यास त्वचेवरील घाण निघून जाऊन त्वचा स्वच्छ व सुंदर होते.
सावधानता :
दूध काढल्यानंतर काही वेळात सेवन केले, तर ते अमृताप्रमाणे कार्य करते. परंतु आजच्या काळात दुधामध्ये भेसळ करण्याचे प्रमाण वाढले आहे. असे भेसळयुक्त दूध शरीरावर दुष्परिणाम करते. म्हणून दूध सहसा ओळखीच्या व्यक्तीकडूनच विकत घ्यावे. किंवा मान्यताप्राप्त नामांकित कंपनीचेच दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ विकत घ्यावेत. दुधामध्ये बऱ्याच वेळा पाणी, खाद्यतेल, पीठ मिसळणे, त्याची मलई काढून घेणे अथवा साखर मिसळणे अशी अनेक प्रकारची भेसळ होत असते. असे दूध हे नक्कीच आरोग्यास हानिकारक असते. या सर्व गोष्टींचा विचार करूनच दूध सेवन करावे.
अन्नमूल्य – दूध
आर्द्रता – ८७.५%
प्रथिने – ३.२%
मेद – ४.१%
खनिजे – ०.६%
पिष्टमय पदार्थ – ४.४%
खनिजे व जीवनसत्त्वे
कॅल्शिअम – १२० मि.ग्रॅ.
फॉस्फरस – ९० मि.ग्रॅ.
लोह – ०.२ मि.ग्रॅ.
बी कॉम्प्लेक्स तसेच ‘क’ व ‘प’ ही जीवनसत्त्वे किंचित प्रमाणात
१०० ग्रॅम खाद्य भागातील मूल्ये – कॅलरी मूल्य ६७
dr.sharda.mahandule@gmail.com