डॉ. शारदा महांडुळे

स्वादपूर्ण, रुचकर, बाजरीची भाकरी अनेकांची आवडती आहे. बाजरीची भाकरी व मिरचीचा ठेचा हा गरिबांचा नेहमीचा आहार आहे. बाजरीची भाकरी, गूळ व तूप हा ग्रामीण भागातील जनतेचा तसेच शारीरिक कष्ट करणाऱ्या लोकांचा आवडता खाद्यपदार्थ आहे. स्वादिष्ट, रुचकर आणि अधिक उष्मांकाच्या बाजरीच्या भाकरीचा उपयोग प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये होत असतो. मराठीत ‘बाजरी’, हिंदीमध्ये ‘बाजरा’, संस्कृतमध्ये ‘इक्षुत्पत्र’, इंग्रजीत ‘पर्ल मिलेट’, तर शास्त्रीय भाषेत ‘पेनिसेटम ग्लॉसम ‘ (Pennisetum glaucum) या नावाने ओळखली जाणारी बाजरी ‘पोएसी’ कुळातील आहे. बाजरीचे रोप पाच ते सहा फूट उंच असून, त्याची पाने लांब असतात. या रोपाच्या टोकाला कणसे लागतात व त्यातच बाजरीचे दाणे असतात.

weight gain and exercise
झटपट वजन कमी करण्यासाठी उच्च तीव्रतेचा व्यायाम केल्यामुळेही वाढू शकतं वजन? तज्ज्ञ काय सांगतात…
Improve Gut Health
आतड्यांमधील जमलेली घाण झपाट्याने काढून टाकतील ‘हे’ ५ पदार्थ? सेवनाची ‘ही’ पद्धत जाणून घ्या
viagra tablet for dimensia
लैंगिक शक्ती वाढवणारी व्हायग्रा मेंदूसाठी ठरणार फायदेशीर? काय सांगतंय नवीन संशोधन?
Tips to keep scooters and electric bikes safe during monsoons
पावसाळ्यात स्कुटी आणि इलेक्ट्रिक बाईक सुरक्षित ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सात टिप्स
What is right to use curd lemon or vinegar to make paneer
पनीर बनवण्यासाठी दही, लिंबू की व्हिनेगर काय वापरणं योग्य? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
How much water do you need to drink to control blood sugar?
मधुमेह असलेल्यांसाठी निर्जलीकरण धोकादायक; रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी किती पाणी प्यावे?तज्ज्ञांनी दिले उत्तर
how to protect vehicle from rain
Monsoon car tips : पावसाळ्यात गाडीला गंज लागू नये, प्रवास सुरक्षित होण्यासाठी काय करावे? पाहा
How to use onion on hair
केसांमधील कोंड्याच्या समस्येमुळे वैतागला आहात का? अशा पद्धतीने केसांना लावा कांद्याचा रस, पाहा कमाल

भारतामध्ये उत्तर गुजरात, महाराष्ट्र, कच्छ व राजस्थानमध्ये बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. बाजरीच्या पांढरी, कंजरी, देशी अशा अनेक जाती आहेत. सध्याच्या काळात बाजरीच्या सुधारलेल्या हायब्रीड प्रकाराच्या अनेक जाती निघालेल्या आहेत. साधारणतः पावसाळ्यात भरपूर पाऊस पडल्यानंतर बाजरीची पेरणी रेताड जमिनीत केली जाते.

औषधी गुणधर्म :

आयुर्वेदानुसार : बाजरी मधुर, कषाय व उष्ण आहे. तसेच ती अग्निदीपक, पित्तप्रकोपक, पचण्यास जड, हृदयासाठी गुणकारी आहे. बाजरीमध्ये पिष्टमय पदार्थ (कार्बोहायड्रेट्स) जास्त प्रमाणात असतात.

आधुनिक शास्त्रानुसार : बाजरीमध्ये कॅल्शिअम, लोह, प्रथिने, स्निग्धता, तंतुमय पदार्थ व खनिजे ही सर्व पौष्टिक, आरोग्यास गुणकारी अशी घटकद्रव्ये असतात.

उपयोग :

१) शेतामध्ये बाजरीची हिरवी कणसे भाजून त्याचा हुरडा तयार करून गरमागरम असतानाच गुळासोबत व ठेच्यासोबत खावा. हा हुरडा अतिशय चविष्ट व उत्साहवर्धक असून आरोग्यास गुणकारी असतो.

२) बाजरीच्या दाण्याच्या लाह्या करून खाव्यात. ज्यांच्या तोंडाला रुची नाही, तसेच अपचन, भूक न लागणे अशा विकारांवर या लाह्या गुणकारी असतात.

३) पावसाळ्यात व हिवाळ्यात बाजरीची गरम भाकरी तूप किंवा लोणी लावून खावी. ही भाकरी लहान मुलांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी व त्यांची निकोप वाढ होण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

४) शारीरिक श्रम जास्त असणाऱ्या कष्टकरी लोकांनी, शरीर शक्तिशाली बनविण्यासाठी बाजरीची भाकरी गायीच्या / म्हशीच्या दुधात कुस्करून खावी.

५) बाजरीची भाकरी कुस्करून त्यात गूळ व साजूक तूप घालून त्याचे लाडू बनवून खाल्ले असता शरीरास बळ मिळते.

६) बाजरीची भाकरी ताकाबरोबर किंवा कढीबरोबर खाल्ल्यास अधिक रुचकर लागते व ती शरीरासाठी उत्साहवर्धक ठरते.

७) प्रसूतीनंतर बाळंतिणीने आहारामध्ये बाजरीची भाकरी खाल्ल्यास तिला भरपूर दूध येते व त्यासोबत गर्भाशयाचे आकुंचन होण्यास मदत होते.

८) बाजरीपासून भाकरीव्यतिरिक्त खिचडी, वडे, थालीपीठ, पापड्या, चकोल्या असे विविध स्वादिष्ट व रुचकर पदार्थ बनविता येतात.

९) बाळंतिणीला दूध भरपूर येण्यासाठी व गर्भाशयाचे आकुंचन होण्यासाठी बाजरीची पेज गायीचे तूप व गूळ घालून गरम गरम प्यायला द्यावी.

सावधानता :

बाजरी ही उष्ण वीर्यात्मक असल्यामुळे तिचे उन्हाळ्यात सेवन करू नये. तसेच पित्तप्रकृतीच्या व्यक्तींनी व उष्णतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी सेवन करू नये. त्याचबरोबर मूळव्याधीचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी व मलाष्टंभाचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी बाजरीची भाकरी सेवन करू नये. बाजरीची भाकरी फक्त पावसाळा व हिवाळ्यात गायीचे तूप / लोणी टाकून सेवन केल्यास ती आरोग्याला बाधत नाही.

dr.sharda.mahandule@gmail.com