‘महिला व बालविकास’ मंत्रालयाच्या ध्येयधोरणांचा परिचय व्हावा तसेच त्यांच्या नियोजन प्रक्रियेत आणि त्यांच्या सुक्ष्म- तौलनिक अभ्यासात सहभागी होण्याची संधी देणारा दोन महिन्यांचा इंटर्नशिप कार्यक्रम उपलब्ध झाला आहे. देशभरातील विद्यार्थिनी/ स्त्रिया यात सहभागी होऊ शकतात तसेच त्यासाठी त्यांना २० हजार रुपये महिना भत्ता दिला जातो.
देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्त्रिया, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्या, शिक्षक यांना शासन प्रक्रियेत सामील होऊन देश उभारणीच्या तसेच स्वावलंबी भारताच्या निर्मितीमध्ये सहभागी होण्याची उत्तम संधी ‘महिला व बाल विकास’ मंत्रालयाने उपलब्ध करून दिली आहे ती इंटर्नशिप कार्यक्रमाद्वारे.
या कार्यक्रमासाठी अर्जकर्त्यांची कोणत्याही विद्यापीठात, शैक्षणिक, गैर शैक्षणिक संस्थेत नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. वर केलेल्या क्षेत्रातील २१ ते ४० वयोगटातील कोणतीही स्त्री या कार्यक्रमात सहभागी होऊन ‘इंटर्न’ होण्यास पात्र ठरते. अर्ज भरताना ज्या कार्यक्षेत्रात काम करावयाचे आहे त्या बॅचची निवड करण्याची मुभा इंटर्नना आहे. अर्ज http://www.wcd.intern.nic.in या वेबपोर्टलवर ऑनलाइन भरायचे असतात. प्रत्येक महिन्याच्या १ ते १० तारखेच्या दरम्यान अर्ज भरता येतात.
हेही वाचा : युलिया नवाल्नाया असण्याचे आव्हान
महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्या https://wcd.nic.in/schemes/internship- scheme या संकेतस्थळावर यासंबंधीची विस्ताराने माहिती दिलेली आहे. सध्याही या संकेतस्थळावर मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांसाठी इंटर्नशिपसाठी अर्ज मागवण्यात आल्याचे दिसून येते. यासोबतच भरावयाचा अर्जही संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंदर्भात कोणतीही चौकशी करावयाची असल्यास mwcd-research@gov.in या मेलवर पत्रव्यवहार करता येतो. वर्षभर दर दोन महिन्यांनी असे इंटर्नशिपसाठीचे अर्ज ऑनलाइन मागवले जातात.
ही इंटर्नशिप दोन महिन्याची असते. कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर त्यांना ‘इंटर्न’ असे संबोधले जाते. यामुळे ‘महिला व बालविकास’ मंत्रालयाच्या ध्येयधोरणांचा परिचय होण्याबरोबरच त्याच्या नियोजन प्रक्रियेत, सुक्ष्म आणि तौलनिक अभ्यासात सहभागी होण्याची संधीही या निमित्ताने मिळते. कामातील सातत्य आणि आवाका लक्षात घेऊन पुढे काही पथदर्शी प्रकल्पांवर देखील या इंटनर्सना काम करता येऊ शकेल. एवढेच नाही तर ‘महिला व बाल विकास’ मंत्रालयाच्या काही कार्यक्रमासंदर्भात, योजना आणि कायदयाची माहिती त्यांना अवगत करून देण्यात येणार आहे. यामुळे त्यांना भविष्यात विविध व्यासपीठांवरून काम करण्याची, मार्गदर्शन करण्याची संधी आणि सक्षमता निर्माण होईल. हा यामागचा उद्देश आहे.
हेही वाचा : UPSC: लेक असावी तर अशी! वडील रस्त्यावर पकोडे विकायचे, लेकीनं यूपीएससीत मारली बाजी
दर दोन महिन्यांसाठी असलेल्या या इंटर्नशिप कार्यक्रमात इंटर्नस् ना दरमहा २० हजार रुपयांचा एक रकमी स्टायपॅंड दिला जातो. यासाठी स्थापित करण्यात आलेल्या समितीकडून इंटर्नची निवड होते. इंटर्न म्हणून निवड होणाऱ्या व्यक्तींची नावे संकेतस्थळावर जाहीर केली जातात. इंटर्न म्हणून निवड झाल्यानंतर निश्चित करून दिलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सामील झाल्यापासून तो कार्यक्रम संपून परतेपर्यंतचा प्रवासखर्च दिला जातो. महागाई भत्ताही केंद्रसरकारच्या नियमांमधील तरतूदीनुसार दिला जातो. इंटर्नना दिलेले काम योग्य रितीने व्हावे आणि त्यात सुसूत्रता राहावी, यासाठी इंटर्नशिप समन्वयकही नेमला जातो.
दिल्लीतील कार्यक्रमात सहभागी इंटर्नना तिघांमध्ये एक याप्रमाणे सहभागी तत्वावर हॉस्टेलची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. यात बेड, खुर्च्या, टेबल, कपाट अशा मुलभूत सुविधा दिल्या जातात. यात मेस किंवा भोजनाचा समावेश नाही. जेवणाचा खर्च इंटर्नना स्वत:ला करावा लागतो. ही वसतिगृहाची सुविधा इंटर्नशिप सुरु होण्यापूर्वी २ दिवस व कार्यक्रम संपल्यानंतर दोन दिवस उपलब्ध होऊ शकते. म्हणजे जर १ मार्च २०२४ पासून इंटर्न कार्यक्रमात सहभागी होणार असेल तर त्याला २८ फेब्रुवारी २०२४ रोजी या वसतिगृहात प्रवेश मिळतो आणि दोन महिन्याची इंटर्नशिप संपल्यानंतर म्हणजे २ मे २०२४ ला त्यांना वसतिगृह सोडावे लागते. इंटर्न म्हणून दोन महिने यशस्वीरित्या काम केल्यानंतर इंटर्न म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र मिळते. इंटर्नशिपसाठी एकदाच निवड होते. एकदा निवड झालेल्या व्यक्तीस दुसऱ्यांदा यासाठी अर्ज करता येत नाही किंवा तो त्यासाठी पात्र ठरत नाही.
निवड झालेल्या इंटर्नला शपथपत्राद्वारे हा दोन महिन्याचा इंटर्नशिप कार्यक्रम असून ती कुठल्याही नोकरीसाठीची/ भविष्यातील रोजगारासाठीची कटिबद्धता नाही हे माहीत असल्याचे जाहीर करावे लागते. निवड झालेल्या इंटर्नच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन करून त्याला इंटर्नशिपमध्ये ठेवण्याचे किंवा काढण्याचे अधिकार मंत्रालयाने राखून ठेवण्यात आलेले आहेत.
अधिक माहितीसाठी
सहायक संचालक (इंटर्नशिप प्रोग्राम), महिला व बाल विकास मंत्रालय, तळ मजळा, जीवनतारा बिल्डिंग,अशोक रोड, नवी दिल्ली- ११०००१ यांच्याकडे संपर्क करता येईल.
उपसंचालक (माहिती)लातूर
drsurekha.mulay@gmail