डीआरडीओच्या म्हणजेच संरक्षण, संशोधन व विकास संस्थेच्या वैज्ञानिकांनी हाती घेतलेली दिव्यास्त्र मोहीम यशस्वी केली आहे. मल्टीपल इंडिपेंडन्टली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (एमआयआरव्ही) तंत्रज्ञानासह पूर्णत: स्वदेशी बनावटीच्या अग्नी-५ या क्षेपणास्राची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. या महत्त्वाच्या कामगिरीमध्ये MIRV तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या अग्नी-५ क्षेपणास्त्राच्या भारताच्या पहिल्या उड्डाण चाचणीसाठी जबाबदार असलेल्या डीआरडीओच्या पथकाचे क्षेपणास्त्र विशेषज्ञ शीना राणी यांनी नेतृत्व केले होते. तर आज आपण या लेखातून मिसाईल वूमन ‘शीना राणी’ यांच्या कामगिरीबद्दल जाणून घेणार आहोत.
भारताने आपल्या ‘मिशन दिव्यास्त्रा’चा एक भाग म्हणून स्वदेशी बनावटीच्या अग्नी-५ क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी घेतली. भारत सरकारने १९८३ मध्ये Integrated Guided Missile Development Programme (IGMDP) कार्यक्रम हाती घेण्यात आला. या माध्यमातून जमिनीवरून हवेत, हवेतून हवेत मारा करणारी विविध क्षमतेची क्षेपणास्त्रे ही विकसित करण्याचे निश्चित झाले. त्याचाच एक भाग म्हणून अग्नी नावाने लांब पल्ल्याची विविध क्षेपणास्रे विकसित करण्यात आली. अग्नी-५ हे त्याचे सर्वांत शक्तिशाली स्वरूप आहे; जे अनेक शस्त्रास्त्रे तैनात करण्यास सुसज्ज आहे. या यशामुळे भारत असे तंत्रज्ञान असलेल्या देशांच्या निवडक गटात सामील झाला आहे.
डिफेन्स रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (DRDO) विकसित केलेले आणि ओडिशातील एपीजी अब्दुल कलाम बेटावरून प्रक्षेपित केलेल्या या क्षेपणास्त्राने त्याच्या मल्टिपल इंडिपेंडन्टली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (MIRV) क्षमतांचे प्रदर्शन करून, यशस्वी पूर्तता केली, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
या प्रकल्पाचे नेतृत्व डीआरडीओच्या मिसाईल शीना राणी या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या एका महिला शास्त्रज्ञाने केले होते. त्यामध्ये इतर महिला शास्त्रज्ञांचाही सहभाग होता. शंकरी चंद्रशेखरन या प्रकल्पाच्या संचालक होत्या; तर शीना राणी अग्नी-५ च्या कार्यक्रम संचालक होत्या. तसेच डीआरडीओच्या प्रगत प्रणाली प्रयोगशाळेत शीना राणीने MIRV तंत्रज्ञानाने सुसज्ज अग्नी-५ क्षेपणास्त्राच्या विकासाचे नेतृत्व केले.
हे क्षेपणास्त्, थ्री स्टेज सॉलिड इंधन इंजिनाद्वारे समर्थित पाच हजार किमीपेक्षा जास्त पल्ला गाठते. डीआरडीओ (DRDO)ने अग्नी क्षेपणास्त्र मालिकेचे इतर प्रकारदेखील विकसित केले आहेत. त्यात ७०० किमीच्या रेंजसह अग्नी-१, अग्नी-२ (२,००० किलोमीटर), अग्नी-३ (३,००० किलोमीटर) व अग्नी-४ (४,००० किलोमीटर) यांचा समावेश आहे.
हेही वाचा…लग्नात Moye Moye गाणं ते बायकोच्या ताटाखालचं मांजर बनणं? Wife jokes खरंच विनोदी आहेत का?
… तर कोण आहेत DRDO ची शीना राणी?
१. क्षेपणास्त्र विशेषज्ञ शीना राणी यांनी MIRV तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या अग्नी-५ क्षेपणास्त्राच्या भारताच्या पहिल्या उड्डाण चाचणीसाठी DRDO च्या पथकाचे नेतृत्व केले. डीआरडीओच्या हैदराबाद येथील प्रगत प्रयोगशाळा प्रणालीच्या (DRDO Advanced Systems Laboratory, ASL) शीना राणी या कार्यक्रम संचालक म्हणून कार्यरत आहेत. ५७ वर्षीय शीना राणी यांनी क्षेपणास्त्र प्रकल्पात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
२. शीना राणी यांचा जन्म तिरुवनंतपुरममध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे त्या दहावीत असताना निधन झाले. शीना राणी यांना त्यांच्या आईने वाढवले. त्यामुळे आई व बहीण या त्यांच्या जीवनाचा खरा आधारस्तंभ आहेत, असे शीना राणी म्हणतात.
३. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, शीना राणीने इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स इंजिनियरिंगची पदवी आणि कॉम्प्युटर सायन्समध्ये विशेष ज्ञान प्राप्त केले आहे. विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC), भारतातील प्रमुख नागरी रॉकेट प्रयोगशाळा येथे आठ वर्षांचा अनुभव मिळविण्यापूर्वी तिने तिरुवनंतपुरममधील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतले.
४. १९९८ मध्ये पोखरण-२ च्या अणुचाचण्यांनंतर शीना राणी लगेचच १९९९ मध्ये त्या डीआरडीओमध्ये रुजू झाल्या. तेव्हापासून त्या अग्नी क्षेपणास्त्र कार्यक्रमात सक्रियरीत्या सहभागी झाल्या आहेत.
५. प्रख्यात ‘मिसाईल मॅन’, डीआरडीओचे माजी प्रमुख व भारताचे अध्यक्ष एपीजे अब्दुल कलाम यांच्यापासून प्रेरित झालेल्या शीना राणी यांनी ‘डीआरडीओ’मधील त्यांच्या कार्यकाळात २०१६ मध्ये प्रतिष्ठित ‘सायंटिस्ट ऑफ द इयर’ पुरस्कारासह अनेक पुरस्कारही प्राप्त केले आहेत.
६. शीना राणी यांचे पती पीएसआरएस शास्त्री हेदेखील ‘डीआरडीओ’शी संबंधित आहेत आणि त्यांनी क्षेपणास्त्र प्रकल्पांमध्ये योगदान दिले आहे. २०१९ मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने प्रक्षेपित केलेल्या कौटिल्य उपग्रहामध्ये त्यांचा सहभाग होता. तर, आज आपण या लेखातून भारताच्या मिसाईल वूमन शीना राणी यांच्याबद्दलची माहिती जाणून घेतली.