महिलांनी एखादी गोष्ट करायची ठरवली, तर त्या ते काम पूर्ण केल्याशिवाय हार मानत नाहीत. सर्वच क्षेत्रांत महिलांनी आपल्या कर्तृत्वाने आपले नाव कमावले आहे. जगात अशा अनेक महिला आहेत; ज्यांनी स्वत:च्या हिमतीवर मोठे होऊन दाखविले आहे. जगभरातील महिलांना प्रेरणा देणारी एक क्रांतिकारी घटना जपानमधून समोर आली आहे. या वर्षी जानेवारीमध्ये मित्सुको टोटोरी यांची जपान एअरलाइन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली. हे पद भूषविणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. टोटोरी यांच्या नियुक्तीमुळे जपान एअरलाइन्स जपानच्या शीर्ष कंपन्यांपैकी फक्त एक टक्का महिलांच्या नेतृत्वाखाली सामील झाली.
जपान एअरलाइन्सची ही मोठी घोषणा महिला सशक्तीकरणासाठी मैलाचा दगड मानली जात होती; परंतु त्यामुळे जपानच्या कॉर्पोरेट वर्गाला मोठा धक्का बसला आहे. कारण- मित्सुको टोटोरी यांनी केबिन क्रू मेंबर म्हणून त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती. टोटोरी यांच्यासाठी फ्लाइट अटेंडंटपासून एअरलाइन्सच्या बॉस पदापर्यंत जाणे ही एक मोठी उपलब्धी असल्याचे म्हटले जात आहे.
१९८५ मध्ये फ्लाइट अटेंडंट म्हणून करिअरला सुरुवात
रिपोर्टनुसार, मित्सुको टोटोरी यांनी १९८५ मध्ये फ्लाइट अटेंडंट म्हणून त्यांच्या करिअरला सुरुवात केली. तीन दशकांनंतर २०१५ मध्ये, त्यांना केबिन अटेंडंटचे वरिष्ठ संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले. आता २०२४ मध्ये त्यांना जपान एअरलाइन्सचे अध्यक्ष व सीईओ बनवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये जपानमधील या दुर्मीळ घटनेसाठी ‘क्रांती’ आणि मित्सुको टोटोरी यांच्यासाठी ‘एलियन’ अशी विशेषणे वापरली जात आहेत.
५९ वर्षीय मित्सुको टोटोरी म्हणाल्या, “जपान अजूनही महिला व्यवस्थापकांची संख्या वाढविण्याचे आपले प्रारंभिक उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. मला आशा आहे की, जपान लवकरच एक असे स्थान बनेल; जिथे एखादी महिला राष्ट्रपती झाली तरी स्वागत होईल.”
एक मनोरंजक वस्तुस्थिती अशी आहे की, मित्सुको टोटोरी या जपान एअरलाइन्सने त्यांच्या सर्वोच्च पदावर नियुक्त केलेल्या विशेष गटातील नाहीत. टोटोरी यांची पार्श्वभूमी मागील सीईओंपेक्षा खूपच वेगळी आहे. हे पद भूषविणाऱ्या शेवटच्या १० व्यक्तिमत्त्वांपैकी सात जणांनी जपानच्या सर्वोच्च विद्यापीठांमधून पदव्या मिळविल्या होत्या. दुसरीकडे, मित्सुको टोटोरी या महिला पदवीधर आहेत. त्यांनी नागासाकी येथील क्वासुई महिला कनिष्ठ महाविद्यालयात दोन वर्षे शिक्षण घेतले होते.