काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने मिझोराम विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर केले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मिझोराममध्ये झोरम पीपल्स मूव्हमेंटने (झेडपीएम) मोठा विजय संपादन करत ४० पैकी २७ जागांवर विजय मिळवला आहे. मात्र, यामध्ये सगळ्यांच्या आर्कषणाचा केंद्र ठरल्या त्या म्हणजे मिझोरामच्या नवनिर्वाचित आमदार बेरिल व्हॅॅनीहसांगी. बेरिल या मिझोरामच्या सर्वात तरुण महिला आमदार ठरल्या आहेत.
३२ वर्षीय बेरिल मिझोरामच्या आयझॉल दक्षिण-III मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी उभ्या होत्या. झेडपीएम पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना ९,३७० मते प्राप्त झाली होती, तर त्यांच्या विरोधी उमेदवार लालराम माविया यांना ७,९५६ मते मिळाली होती. बेरिल १,४१४ मतांनी विजयी झाल्या आहेत. या विजयानंतर त्या मिझोराम विधानसभेत निवडून आलेल्या सर्वात तरुण महिला आमदार ठरल्या आहेत.
बेरिल व्हॅनीहसांगी यांचे शिक्षण किती झालं आहे?
बेरिल यांनी शिलाँगमधील नॉर्थ इस्टर्न हिल युनिव्हर्सिटीमधून कला विषयात पदवी पूर्ण केली. रेडिओ जॉकी म्हणून त्यांनी करिअरची सुरुवात केली. त्यानंतर काही दिवस त्यांनी टीव्ही अँकर म्हणूनही काम केलं. आयझॉल महानगरपालिकेच्या (एएमसी) नगरसेवक पदावरही त्या कार्यरत होत्या. व्हॅॅनीहसांगी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. इन्स्टाग्रामवर २५२के पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
व्हॅॅनीहसांगी यांनी नेहमीच स्त्री-पुरुष समानता विषयाला पाठिंबा दिला आहे. आपल्या भाषणाच्या माध्यमातून त्यांनी स्त्री-पुरुष समानतेबाबत समाजात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. नुकतीच त्यांनी वृत्तसंस्था एएनआयला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी सरकारी कार्यालयांमधील महिलांच्या संख्येवर आपलं मत व्यक्त केलं. व्हॅॅनीहसांगी म्हणाल्या, “कोणत्याही महिलेला आपल्या आवडीचे काम करण्यासाठी तिच्या स्त्रीत्वाचा आडथळा येता कामा नये. तुम्ही महिला आहात म्हणून तुम्हाला आवडीचं काम करण्यापासून आणि पुढे जाण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. माझा प्रत्येक स्त्रीला संदेश आहे की, त्या कोणत्याही समाजाच्या किंवा सामाजिक वर्गातील असो, त्यांना जे काही करायचे असेल, तर त्यांनी ते केले पाहिजे.”
हेही वाचा- Animal: कोण अल्फा मेल? फेमिनिस्ट मत तर राहूद्या पुरुषांवरही अन्याय करणारा अॅनिमल, नव्हे ‘राक्षस’!
निवडणूक आयोगाने ४ डिसेंबरला मिझोराम विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर केले. यावेळी मिझोराम विधानसभा निवडणुकीत केवळ तीन महिला उमेदवार विजयी झाल्या. या निवडणुकीत उभ्या असलेल्या १७४ उमेदवारांमध्ये महिला उमेदवारांची संख्या केवळ १६ होती.