शहरी शेतीची किंवा परसदारी लावता येणाऱ्या भाज्यांची ओळख करून घेताना मुळात हा सगळा खटाटोप आपण का करायचा याचा साकल्याने विचार करावा लागेल. हौस म्हणून ही लागवड करणे तर चांगलं आहेच, पण आज ती काळाची गरज झाली आहे. पाऊसकाळात हिरव्या पालेभाज्यांनी बाजार भरलेले असतात. साहजिकच आपल्याला त्या विकत घेण्याचा मोह होतो. पण यातील बऱ्याच भाज्या या अत्यंत अस्वच्छ जागी वाढवलेल्या, गढूळ पाण्यात धुतलेल्या असतात. पण दृष्टी आड सृष्टी तशी आपली गत झाली आहे. एवढा विचार करत बसलो तर मग बघायलाच नको नाही का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण मला तर वाटतं, एवढा विचार करावाच. भरभरून पडणारा पाऊस, पाऊस नसेल तेव्हा मुबलक ऊन अशा प्रदेशात रहाणारे आपण. मग या निसर्ग कृपेचा लाभ का बरं घेऊ नये. इमारतीच्या गच्चीवर, स्वयंपाकघराच्या खिडकीत, बाल्कनीत जिथे जमेल तिथे आवर्जून भाज्या लावाव्यात. पाऊसकाळात कोबी, फ्लॉवर, मेथी, पालक या बारा महिने बत्तीस काळ मिळणाऱ्या भाज्या लावण्यापेक्षा अनवट भाज्या ओळखायला शिकून लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सगळ्याच काही लावता येतील असं नाही, पण जास्तीत जास्त लावायच्या आणि उरलेल्यांची माहिती घेऊन खात्रीलायक ठिकाणांहून त्या मिळवायच्या. यामुळे रोजच्या जेवणात विविधता तर येतेच, पण वेगळ्या चवीही चाखायला मिळतात.

आणखी वाचा-Who is Kamala Harris : आफ्रिकन-अमेरिकन वंशाच्या कमला हॅरिस यांचा भारताशी काय आहे संबंध? भारतीय मूल्यांशी कशी झाली ओळख?

पालेभाज्या ओळखणं वाटतं तेवढं अवघड मुळीच नाही. थोडा प्रयत्न केला की सहज जमेल. नाही म्हणायला हळद आणि अळकुड्यांचे कंद यातील फरक न कळणारे महाभाग असतात म्हणा, पण असो.

तर आता आपण वेगळ्या चवीच्या अनवट भाज्यांची थोडी माहिती घेऊया. सर्रास ओवा म्हणून मिळणारी जी ओव्याची पानं असतात तो मुळी खरा ओवा नसतोच. हा असतो पानओवा. तुळशीच्या कुळातली ही सुगंधी वनस्पती असते. मात्र फार औषधी. ओव्याची छोटी फांदी जरी लावली तरी अगदी वर्षभर कुंडीत हिला वाढवता येते. पानांची भजी आणि भाजी दोन्ही चवीला उत्तम लागतात. कोशिंबीर, सलाड यावर पानं चिरून घातली की छान दरवळतात. सहज उपलब्ध होणारी आणि ओळखता येणारी अशी ही गुणकारी पालेभाजी आहे.

गुलबाक्षीची फुलं आणि तिच्या गोल मण्यांसारख्या सुरेख बिया आपल्या अगदी परिचयाच्या असतात. गुलबाक्षीच्या कोवळ्या पानांची छान भाजी होते. फुलांसाठी आपण ही वनस्पती आवर्जून लावतो. तिचा पालेभाजी म्हणूनही उपयोग करता येतो.

अशीच सगळीकडे तण म्हणून वाढणारी भाजी म्हणजे काटे माठ. जरासं निरखून पाहिलं तर आपल्या कुंडीत त्याचं एखादं चुकार रोपं हमखास उगवलेलं आढळेल. पावसाच्या पाण्यावर हा भरमसाठ वाढतो. याची पानं खुडावी तितकी बहरतात. मुबलक आणि आयत्यावेळी करता येईल अशी ही भाजी आहे. माठाच्या पानांची पातळ भाजीही चवदार होते.

आणखी वाचा-लग्नानंतर महिलांनी नाव बदलावं का? कायदा नेमकं काय सांगतो? वकिलांनी सांगितली नेमकी तरतूद!

श्रावणात जिवतीला माळ करण्यासाठी वापरला जाणारा आघाडा तर कोणीही सहज ओळखेल. त्याच्या लंबवर्तुळाकार सुरेख पानांना किंचित राखाडी किनार असते. पानाची मागची बाजू पांढरटसर राखाडी असते, त्यामुळे जंगलात किंवा मोकळ्या जागी वाढलेला आघाडा सहज ओळखू येतो. आघाडा ही बहुवर्षायू अशी वनस्पती, पण पावसाळ्यात तिची तजेलदार पांढरट झाक असलेली पानं खचितच मोहात पाडतात.आघाड्याची कोवळी पानं पालेभाजी म्हणून एकदा तरी अवश्य करून बघावीच.

सिंधी आणि गुजराती घरांत पावसाळ्यात आवर्जून खाल्ली जाणारी कमळकाकडी आपल्याला तितकीशी परिचयाची नसते. तळ्यातून किंवा तलावातून आणलेले कमळाचे कंद म्हणजे कमळकाकडी. लक्ष्मी कमळाचे हे कंद या दिवसांतच जास्त मिळतात. लांबलचक मुळ्यासारखे दिसणारे हे पांढरट पिवळसर कंद निवडून ते स्वच्छ धुऊन त्याची वरची साल काढून घ्यावी. मातीत पूर्णपणे बुडून असणाऱ्या या कंदांना स्वच्छ धुऊन घ्यावं. मग कुकरमध्ये उकडून पीठ पेरून सुकी भाजी झक्कास होते. याचे कुरकुरीत चिप्स तर मुलांनाही आवडतात. या दिवसांत कमळाला भरपूर फुले येतात. त्या फुलांच्या पाकळ्या पडून गेल्यावर आतील तबकडीत बिया धरू लागतात. या गोल हिरव्या कमळकोषातील बिया कच्च्या असताना सोलून खायच्या, त्या फारच सुरेख लागतात. जीवनसत्वांनी आणि पोषक द्रव्यांनी भरपूर असलेल्या या बिया खायला मजा येते.

माझ्या बागेतील कुंडात जून ते अक्टोबरपर्यंत मस्त कमळकाकड्या वाढीला लागतात. फुलंही भरपूर लागतात. मग भाजी करणं ठरलेलं. फुलं उमलून गेली की हिरव्यागार बियांनी गच्च भरलेले कोष सोलून त्यातील बिया खाणं हे ठरलेलं असतं.

या अशा वेगळ्या भाज्या जर पावसाळ्याच्या चार महिन्यांत मिळवून खाल्ल्या तर जेवणात खचितच रंगत येईल, नाही का?

mythreye.kjkelkar@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monsoon vegetables with great taste mrj
Show comments