मुंबईतील एका २४ वर्षीय तरुणीला हॉटेलमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बहारीनला पाठवण्यात आले होते. तिथे दोन-तीन महिने तिला व्यवस्थित काम दिल्यानंतर तिचा मोबाइल व पारपत्र काढून घेऊन तिला वेश्या व्यवसायात ढकलण्यात आले. अचानक मुलीचा संपर्क तुटल्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर तिला परदेशात पाठवणाऱ्या टोळक्याने तिच्या सुटकेसाठी दोन लाख रुपयांची रक्कम मागितली. पैसे देऊन कुटुंबीयांनी मुलीची सुटका केल्यानंतर या टोळक्याने नेपाळ व भारतातून ६०० मुलींना अशा प्रकारे बहारीनला वेश्या व्यवसायासाठी पाठवल्याचे उघड झाले होते. २०१८ मध्ये घडलेल्या या घटनेमुळे मानवी तस्करीने देशातही पाळेमुळे किती घट्ट रोवली आहेत ते स्पष्ट झाले होते.
२०१९ ते २०२१ या तीन वर्षांत देशात १३.१३ लाखांहून अधिक मुली व स्त्रिया बेपत्ता झाल्याची आकडेवारी नुकतीच केंद्रीय गृह मंत्रालयाने संसदेत सादर केली होती. हे आकडे अत्यंत भीतीदायक आहेत. देशात सर्वांत जास्त मुली या मध्य प्रदेशातील असून, त्याखालोखाल पश्चिम बंगाल व महाराष्ट्राचा क्रमांक आहे. देशभरात अठरा वर्षांहून अधिक वयाच्या १०,६१,६४८ स्त्रिया आणि त्याहून कमी वयाच्या २,५१,४३० मुली २०१९ ते २०२१ या काळात बेपत्ता झाल्या आहेत. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (एनसीआरबी) तयार केलेल्या या अहवालानुसार, मध्य प्रदेशातून १,६०,१८० स्त्रिया आणि ३८,२३४ मुली वरील कालावधीत बेपत्ता झाल्या. पश्चिम बंगालमध्ये हीच संख्या १,५६,९०५ स्त्रिया आणि ३६,६०६ मुली अशी आहे. याच कालावधीत महाराष्ट्रातून १,७८,४०० स्त्रिया आणि १३,०३३ मुली बेपत्ता झाल्या. ओडिशात ७०,२२२ स्त्रिया व १६,६४९ मुली तीन वर्षांत बेपत्ता झाल्या, तर छत्तीसगडमध्ये त्यांची संख्या ४९,११६ स्त्रिया व १०,८१७ मुली अशी होती, असे संसदेला सादर करण्यात आलेल्या आकडेवारीत म्हटले आहे. केंद्रशासित प्रदेशांपैकी दिल्लीत बेपत्ता मुली व स्त्रियांची सर्वाधिक संख्या नोंदवली गेली.
हेही वाचा… अगदी सगळंच..
देशाच्या राजधानीत २०१९ ते २०२१ या कालावधीत ६१,०५४ महिला व २२,९१९ मुली बेपत्ता झाल्या. बेपत्ता स्त्रिया व मुलींची ही संख्या तर डोळ्यात अंजन घालणारी आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी २५ जुलैला अधिवेशनात याबाबत मुद्दा उपस्थित केला होता. त्या वेळी जानेवारी २०२३ ते जुलै २०२३ या पाच महिन्यांत राज्यातून १९ हजार ५५३ स्त्रिया व तरुणी बेपत्ता झाल्याचा दावा केला होता. अल्पवयीन मुलींचे हरवण्याचे व पळून जाण्याचे प्रमाण वाढत आहे. पालकांशी वाद, शिक्षणाची भीती, मायानगरीचे आकर्षण, नोकरीचे आमिष, अशा अनेक कारणांना भुलून ही मुले घराबाहेर पडतात. अनेक मुलींच्या बाबतीत बदनामीच्या भीतीने सुरुवातीला पोलीस तक्रारही केली जात नाही. त्यातील अनेक मुली परतल्याही असतील, पण ज्या अद्याप बेपत्ता आहेत, त्यांचे काय? मानवी तस्करीला तर त्या बळी पडल्या नसतील ना, असा प्रश्न उपस्थित होतो. त्या मानवी तस्करीलाही बळी पडण्याची शक्यता आहे.
मानवी तस्करी करणारी टोळकी स्त्रियांना, मुलींना परराज्यांत, परदेशात नेऊन त्यांना वेश्या व्यवसाय करायला लावतात, त्यांना भीक मागायला लावतात. किडनीच नाही तर सगळेच महत्त्वाचे मानवी अवयव विकणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. अनेक तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून परदेशात पाठवले जाते, पण तेथे गेल्यावर त्यांच्या वाट्याला नरकयातना येतात. त्यामुळे बेपत्ता स्त्रियांची, तरुणीची प्रकरणे संवेदनशीलरीत्या हाताळणे आवश्यक आहे. त्यासाठी यापूर्वी ‘ऑपरेशन स्माइल’सारखे उपक्रम राबवण्यात आले होते. मुंबई पोलीसही सध्या २५ वर्षांखालील बेपत्ता व्यक्तींची विशेष नोंद करत असून त्यांच्या शोधाला प्राधान्य दिले जात आहे.
हेही वाचा… मोदीजी, आम्ही राखी बांधूही, पण तुम्ही रक्षण कराल?
गेल्या वर्षी मुंबई पोलिसांनी ‘ऑपरेशन री-युनाइट’ या जवळपास दीड महिना चाललेल्या मोहिमेत ४८७ मुलांचा शोध लावला होता. शोधलेल्या मुलांमध्ये २३० मुलगे आणि २५७ मुलींचा समावेश होता. नागपूर पोलिसांनीही गेल्या वर्षी बेपत्ता नागरिकांच्या शोधासाठी विशेष पथकाची स्थापना केली होती. त्याद्वारे बेपत्ता असलेल्या ८४ टक्के नागरिकांचा शोध घेण्यात यश आले होते असे उपक्रम देशभरात राबवण्याची आवश्यकता आहे.