वर्तमानपत्रात ‘आईनं मुलाला घरी न नेल्यानं अनाथालयातील आठ वर्षाच्या चिमुकल्याची आत्महत्या…’ ही बातमी वाचली आणि माझं मन सुन्न झालं… कारण तो चिमुकला दुसरा-तिसरा कोणीही नसून माझा लाडका सलमान होतास… मान्य, मी तुला भेटायला आले की तुला सोबत आणलेला खाऊ, कपडे असं काही नको असायचं. तुला हवा होता फक्त माझा सहवास… माझं प्रेम… कोणी रागवलंच तर लपायला माझा मायेचा पदर हवा होता तुला. पण मी यातलं फार काही नाही देऊ शकले तुला… तुझ्या वाट्याला आलं ते अनाथालय… त्यात तुझी काहीही चूक नसताना! चूक मी आणि तुझ्या अब्बूचीच होती रे… पण तुझ्या मृत्यूने आई म्हणून मी किती स्वार्थी आहे यावरच शिक्कामोर्तब झालंय… तुझा अब्बू मात्र सहीसलामत या आरोपांमधून सुटला… कारण तो पुरुष आहे ना!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तू हे जग सोडून गेलास हे जेव्हा आश्रमातून कळलं तेव्हा माझ्या जीवाची काय घालमेल झाली हे माझं मलाच माहीत. ज्या घरी राहते त्यांनी तर ‘पनौती गयी’ म्हटलं…बाकीच्या नातेवाईकांनी ‘मुलगा सांभाळायचा नव्हता तर जन्माला का घातलं?’ पासून ‘मजा मारता आली पण मुलगा नको, शेवटी तुला तुझा नवा शोहर महत्त्वाचा’ असं बरंच काही ऐकवलं… का? तर नवा संसार आणि तू यामध्ये मी नव्या घराची निवड केली. मी स्वार्थी ठरले. बाळा, एका प्रश्नाचं उत्तर देशील? तुझा अब्बू जसा तुझी सगळी जबाबदारी सोडून निघून गेला तशी मी गेले का? नव्या ठिकाणी मी गेले, पण तुझ्याशी असलेली नाळ तुटली का रे? नव्या घरातील माणसांना सोडून, कधी त्यांना न सांगता तर कधी लपून छपून मी तुला भेटत होतेच ना… तुझ्यासाठी जमेल तसा खाऊ आणत होतेच ना… खरंच की तुला हवा असलेला तुझा हक्काचा सहवास नाही देऊ शकले… काही बंधन होती… काही अडचणी होत्या… त्या लोकांनी मनाचा मोठेपणा दाखवला नाही. त्यांच्या दुमजली घरात तुझ्यासाठी दोन फूट जागा, खायला भाकरीही नव्हती रे… तुझ्याकडे पाहण्याची नजर तिरस्काराची होती… घरात तुला हक्काचा कोपरा मिळणार नव्हता- जिथे तुझ्या गरजा पूर्ण होणार नव्हत्या, तुझी अम्मी केवळ कोणाची तरी बिबी म्हणून राहणार होती… त्या ठिकाणी तुला कसं नेणार? आश्रमात किमान तुला हक्काने रागवणारे.. जेवू घालणारे काही वेळा तू ऐकत नाही पाहून मारणारे, पण तुझी काळजी घेणारे लोक होते रे… तुझ्या डोक्यावर हक्काचं छप्पर होतं… आई म्हणून मला त्या माझ्या पदराऐवजी आश्रमाच्या चार भिंती सुरक्षित वाटल्या रे… जे शब्दात व्यक्त करता येणार नाही असं होत जे मी आजवर लपवलं… ते नव्हतं तुझ्यासमोर मांडायचं. त्यामुळेच मी तुझा हट्ट ऐकून न ऐकल्यासारखं केलं… मी स्वार्थी होते तुझ्या बाबतीत…

हेही वाचा – स्त्री आरोग्य: गर्भवतीची काळजी घेताना…

हेही वाचा – दिव्यांगांना हक्काचं काम मिळवून देणारी अलीना…

पण तुझं जाणं… जे मी कधीही विसरू शकत नाही.. पण त्यापेक्षा समोरच्यांनी दिलेले घाव विसरण्यासारखे नाहीत. पेटते अंगारे मी झेलते आहे. लोकांच्या लेखी मी खुशामदीन आहे. कारण समाज आजही बायकांना त्यागाची मूर्ती समजतो. घर… संसार… आधी. त्यानंतर जबाबदाऱ्या, मग तिचं सुख… स्वार्थ हा समाजाने ठरवलेला प्राधान्यक्रम. खरं सांगू, मी नात्याचं ओझं नाही पेलू शकले… स्वत:च्या क्षणिक सुखाचा विचार केला आणि हातात असलेलं सगळं गमावून बसले… यातील कुठलाच टप्पा नाही ओलांडू शकले… पण हे सारं तुला सांगायचं राहुन गेलं… आता तर तू खूप दूर निघून गेलास…

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mother expressed grief over not taking her child leaving in orphanage to home ssb