केतकी जोशी
खरंतर आईच्या प्रेमाचं ऋण न फिटणारं असतं. कितीही, काहीही केलं तरी आईच्या ऋणातून आपल्याला उतराई होता येत नाही. पण तरीही थोडासा प्रयत्न करायला हरकत नाही. त्यासाठी ‘मदर्स डे’ सारखा दुसरा उत्तम दिवस नाही. आई आपल्यासाठी सतत काही ना काही करत असते. पण हाच दिवस आहे जेव्हा, आपण तिच्यासाठी काहीतरी करु शकतो. आपली प्रत्येक आवडनिवड जपणाऱ्या आपल्या आईला नेमकं काय आवडतं हेही अनेकदा आपल्याला माहिती नसतं. किंवा तिला जे आवडतं ते करण्याची एरवी आपल्याला संधीच मिळत नसते. पण ‘मदर्स डे’ च्या निमित्ताने तुम्ही तुमच्या आईसाठी तिच्या आवडीचं काहीतरी नक्की करु शकता. मे महिन्यातला दुसरा रविवार हा जगभरात ‘मदर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. यावेळचा ‘मदर्स डे’ आज रविवारी साजरा होत आहे, त्यासाठी या काही टीप्स
१.आईसोबत वेळ घालवा-
आई आपल्यावर निरपेक्ष प्रेम करते. मुलांनी आपल्यासाठी काही करावं अशी तिची अपेक्षाही नसते. पण एक गोष्ट मात्र नक्की हवी असते, ती म्हणजे तुमचा थोडासा वेळ. ‘मदर्स डे’ ला आईला तुम्ही एक अनमोल गोष्ट देऊ शकता, तो म्हणजे तिच्यासाठी थोडासा वेळ काढा आणि तिच्यासोबत वेळ घालवा. या दिवशी काही खूप मोठं प्लानिंग केलं नाही तरी चालेल. पण तिच्यासोबत राहा. हा वेळ तुम्हाला निखळ आनंद मिळवून देईल. पूर्ण दिवस तिच्यासोबत घालवणार आहात हे जेव्हा तिला कळेल, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय असेल हे नक्की. एरवी अभ्यास, नोकरी, करियर आणि सासरची, मुलाबाळांची जबाबदारी यामध्ये आईकडे तसं दुर्लक्षच होतं. पण यावेळेस ही सगळी भरपाई करा. तिला शॉपिंगला घेऊन जा, जेवायला तिच्या आवडीच्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जा किंवा लाँग ड्राईव्हवर जा. आईला सरप्राईज देऊन तुम्ही अचानक हा प्लान सांगितला तर तिला प्रचंड आनंद होईल आणि तुम्हालाही आईसाठी थोडंसं काहीतरी केल्याचं समाधान मिळेल.
आणखी वाचा- विश्लेषण : भारतीय संस्कृतीतील मातृसत्ताक कुटुंबपद्धती !
२.आईच्या आवडीचा स्वयंपाक करा-
तुम्ही ‘मदर्स डे’ला आईसोबत असाल आणि तिच्यासाठी काही खास करायचं असेल तर तुम्ही स्वत:च्या हातानं तिच्यासाठी तिच्या आवडीचे पदार्थ बनवा. बघा, तुमच्या आईला हे गिफ्ट नक्की आवडेल. आईच्या हातच्या जेवणाची सर कशालाच येत नाही. जगातलं कितीही भारी, महागडे, विविध प्रकारचे पदार्थ आपण खाल्ले तरी आईच्या हातच्या साध्या वरणभातानं जी तृप्ती मिळते त्याला तोड नाही. आईला तुमची प्रत्येक आवडनिवड माहिती असते. त्यामुळे तुम्ही न सांगताही तुमच्या आवडीचे पदार्थ तुम्हाला मिळतात. तसंच एक दिवस तुमच्या हातानं तुम्ही घरी खास फक्त आईसाठी स्वयंपाक करा. बघा, त्यातून तुम्हालाही खूप आनंद मिळेल.
३.वायरलेस ईयर बड्स गिफ्ट करा-
आता प्रत्येकालाच आईबरोबर वेळ घालवायला जमेल असं नाही. नोकरीनिमित्त, शिक्षणानिमित्त दुसऱ्या शहरात किंवा परदेशात असलेल्यांना तर कदाचित प्रत्यक्ष जाणं शक्यच होणार नाही. पण ‘मदर्स डे’ ला आईसाठी तुम्ही स्पेशल गिफ्ट नक्की देऊ शकता. तुमच्या आईला संगीताची आवड असेल तर वायरलेस ईयर बड्स हा उत्तम पर्याय आहे. आई सतत कामात असते. त्यातून वेळ काढून तिला कदाचित तिच्या आवडीची गाणी ऐकायला वेळही मिळत नाही. त्यामुळेच वायरलेस ईयर बड्स हे गिफ्ट आईसाठी परफेक्ट असेल. त्यामुळे आई काम करता करता तिच्या आवडीची गाणीही ऐकू शकेल आणि फोनवर गप्पाही मारु शकेल.
आणखी वाचा-बाई गं, तू इतका ताण घेऊ नकोस!
४. स्किन केअर प्रॉडक्टस पाठवा-
सगळ्यांचं करण्याच्या नादात आपली आई स्वत:कडे लक्षच देत नाही. पण ‘मदर्स डे’च्या निमित्ताने तुम्ही तिला ही संधी नक्कीच देऊ शकता. तिच्या वयानुसार तिच्यासाठी योग्य अशी चांगली स्कीन केअर किंवा ब्युटी प्रॉडक्टस तिला गिफ्ट केलीत तर तिला ही भेट नक्कीच आवडेल. तुमच्या आईला काही खास ब्रॅण्ड्सची ब्युटी प्रॉडक्ट्स आवडत असतील तर ती गिफ्ट करा. नोकरी किंवा घर सगळीकडे आत्मविश्वासाने वावरणाऱ्या आईला भेटीचा हा एक उत्तम पर्याय आहे.
५.सिल्कची साडी-
तुमच्या आईला जर वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आवडत असतील, तर तिला सिल्कची साडी गिफ्ट करा. बघा, ती नक्की खूश होईल. सिल्कची साडी ही कधीही आऊट ऑफ फॅशन होत नाही. त्यामुळे चांगल्या प्रकारची सिल्कची साडी खरेदी करा किंवा तिला ऑनलाईन पाठवा. तिला आवडत असल्यास त्यावर मॅचिंग ज्वेलरीही, अक्सेसरीजही भेट देऊ शकता.
६.फोटोफ्रेम-
आपण आईबरोबर घालवलेले क्षण हे आपल्या आयुष्यातले सगळ्यांत सुंदर क्षण असतात. ते कायमच आपल्या चेहऱ्यावर हसू आणतात. असे सुंदर क्षण फोटोंच्या रुपात एकत्र करुन त्याचा एक छानसा कोलाज बनवून त्याची फोटोफ्रेम तुम्ही आईला भेट देऊ शकता. ही भेट आईला नक्कीच आवडेल.
आणखी वाचा-भारतातील शहरी महिला अडकल्या घरकामात: दिवसभरात एकदाही घराबाहेर न पडणाऱ्या महिलांचं प्रमाण ५३ टक्के
७.अँटीक गिफ्ट्स-
आईला जुन्या, अँटीक गोष्टींची आवड असेल तर त्यामध्येही भरपूर पर्याय आहेत. जुन्या डिझाईनची लाकडाची एखादी छानशी वस्तू किंवा जुन्या स्टाईलची शाल आईला देऊ शकता. किंवा लाकडाचा छानसा ज्वेलरी बॉक्सही भेट देऊ शकता. या बॉक्समध्ये आईसाठी एखादा छानसा मेसेज किंवा एखादं छोटंसं पत्र लिहा. बॉक्स घडल्यावर आई जेव्हा ते पाहिल तेव्हा तिला ते नक्कीच आवडेल.
८.फुलांचा गुच्छ भेट द्या
आईला ‘मदर्स डे’ला सुंदर फुलं भेट द्या. तुम्हाला तुमच्या आईला प्रत्यक्ष भेटणं शक्य नसेल तर तिला छानसा बुके भेट म्हणून पाठवून द्या. सुवासिक फुलं किंवा सुंदर रंगसंगतीची ही फुलं तुमच्या तिच्याबद्दलच्या भावना नक्की तिच्यापर्यंत पोचवतील.
शेवटी आईला कोणत्याही आणि कितीही महागड्या भेटी दिल्या तरी तिच्या प्रेमाचे उतराई आपण होऊ शकत नाही. पण आईबद्दल तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी ‘मदर्स डे’ ची संधी दवडू नका.