Mother’s Day 2024 : ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’, असे म्हणतात ते अगदी खरे असल्याचे प्रत्यंतर आपल्याला वारंवार येत असते. देवकीने कृष्णाला जन्म दिला; पण कृष्णाचे पालन-पोषण यशोदेने केले. जशी जन्म देणारी ही आई असते, तसे पालन-पोषण करणारीसुद्धा आईच असते. देव जसा कोणत्याही माणसामध्ये दिसू शकतो, तशी आईसु्द्धा कोणत्याही व्यक्तीमध्ये तुम्हाला दिसू शकते. तुम्ही तुमच्या शिक्षिकेमध्ये आईला बघू शकता, तुम्ही तुमच्या आजी किंवा बहिणीमध्येसुद्धा आईला बघू शकता. एवढंच काय, तर तुमच्या घरी घरकाम करणाऱ्या मावशीमध्येही तुम्हाला आई दिसू शकते.
आज खूप मोठ्या संख्येने महिला नोकरी करतात, तेव्हा नोकरीबरोबर कुटुंब सांभाळताना घरकाम करणाऱ्या मावशीचा त्यांना घरात हातभार लाभला, तर महिलांना नोकरी करताना घरकामाचा तणाव येत नाही. अशा वेळी घरकाम करणाऱ्या मावशी इतरांच्या घरी घरकाम करताना मातृत्वसुद्धा आवडीने स्वीकारतात. सध्या ‘नाच गं घुमा’ हा मराठी चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. (nach g ghuma marathi movie) या चित्रपटामधून नोकरी करणाऱ्या महिलांच्या आयुष्यात कामवालीबाई किती महत्त्वाची आहे, याची जाणीव करून देण्यात आली आहे. स्वत: आई असताना इतरांकडे घरकाम करताना किंवा त्यांच्या मुलांबरोबर वावरताना मातृत्वाची जाणीव होते का, याविषयी लोकसत्ताने मातृत्व दिनाचे औचित्य साधून घरकाम करणाऱ्या महिलांशी संवाद साधला.

“मालकांच्या मुलांना स्वत:च्या मुलांप्रमाणे जीव लावते”

जसं मी स्वत:चं घर सांभाळते, तसंच मी इतरांचंही घर सांभाळते. त्या लोकांचीसुद्धा मी घरच्या माणसांसारखी काळजी घेते. अनेक वर्षांपासून घरकाम करत असल्यामुळे आता तेसुद्धा आपलंच घर आहे, असं वाटतं. मी जिथे काम करते, तिथे माझ्या मुलांच्याच वयाची मुलं आहेत जे मला काकू, मावशी म्हणून हाक मारतात. जशी मी माझ्या मुलांची काळजी घेते, तशीच काळजी, प्रेम घेत मी त्यांनाही जीव लावते.
अनेकदा नवीन ठिकाणी काम करताना घाबरल्यासारखं वाटतं. कारण- प्रत्येकाचा स्वभाव खूप वेगळा असतो. पण, आपलं काम नीट असेल, तर कोणी काही बोलत नाही आणि सर्व जीव लावतात. त्यानंतर आपणसुद्धा हळूहळू नवीन ठिकाणी रूळू लागतो. मी जिथे काम करते, तिथे मुलांचे आई-वडील कामात व्यग्र असतात. मुलांबरोबर बोलायलासुद्धा कोणी नसतं. ते मावशी वा काकू म्हणत माझ्याकडे येतात, मला विचारतात. मी त्यांना चांगल्या गोष्टी समजावून सांगते. मुलं मनापासून खूप आदर करतात. त्यांची आई नोकरीवर गेल्यावर मुलं आईप्रमाणे माझ्या मागे-पुढे राहतात. मीही माझ्या मुलांप्रमाणेच त्यांचं सर्व काही करते. त्यामुळे कामाच्या ठिकाणीसुद्धा मी आई म्हणूनच वावरते.

uma badve s swalekhan App
‘स्वलेखन’ ॲपद्वारे दृष्टीहिनांना डिजिटल युगाचे दार खुले करणाऱ्या उमा बडवे
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
ajit pawar nitin gadkari ladki bahin yojana statement
“…तर आम्ही लाडकी बहीण योजना सुरुच केली नसती”; नितीन गडकरींच्या ‘त्या’ विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया
Murder of husband who is obstructing in immoral relationship
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा खून; पत्नीसह प्रियकर गजाआड, आरोपींकडून आत्महत्येचा बनाव
arvind sawant replied to chandrasekhar bawankule
“उद्धव ठाकरेंना मविआतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे” म्हणणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळेंना ठाकरे गटाचे प्रत्युत्तर; म्हणाले…
Atishi Singh Corruption Mass movement politician Assembly Elections
आतिशी सिंग स्वतःचा ठसा उमटवतील की वरिष्ठांच्या चौकटीत राहतील?
gibbon monkey dance marathi news
विश्लेषण: गिबन माकड जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी चक्क नृत्य करते? काय सांगते नवे संशोधन?
Prajwal Revanna Rape Victime
Prajwal Revanna Chargesheet: ‘बलात्कार करताना पीडितेला हसायला सांगायचा’, प्रज्ज्वल रेवण्णाच्या विकृतीचा कळस

– शीतल जगताप, पुणे</strong>

“आमच्या नशिबी जे काम आलंय, ते मुलांच्या नशिबी येऊ नये”

मी माझ्या मुलांसाठी घरकाम करते. त्यांच्यासाठी कष्ट करतेय. त्यांनीसुद्धा त्यांच्या पायावर उभं राहावं. आमच्या नशिबी जे काम आलं आहे, ते मुलांच्या नशिबी येऊ नये. त्यांचं चांगलं व्हायला हवं. आमच्यासारखे काबाडकष्ट, कुठे धुणी-भांडी, असं काही त्यांच्या नशिबी नको. आजकाल मुलं तशी कामं करीत नाही. त्यांना चांगलं वळण लागायला हवं. मुलांना वाटतं की, आपल्या आईनं घरी बसावं. आपण कमवावं आणि आईला सुखाचे दिवस दाखवावेत. मुलं विचारतात, किती दिवस असं काम करशील? तू कधी घरी आराम करणार. मुलांना माझ्या कामाची जाणीव आहे. नवऱ्याचा आधार नाही; पण मुलांसाठी मी काम करते.

– रंगाबाई गोडबोले, पुणे

“आम्ही वेळ देतो म्हणून मुलं आमच्याकडे येतात.”

माझ्या आईनं ३० वर्ष काम केलं, तिथे मी आजही काम करते. पूर्वी आईबरोबर जायची, तिथे लहानाची मोठी झाली आणि त्यामुळे ते आपलंच घर वाटतं. मी एक आई आहे आणि तिथेसुद्धा आईची जबाबदारी पार पाडते. लहान मुलांना सांभाळते. मी जिथे काम करते, तेथील ताई प्रसूतीनंतर माहेरून सासरी आल्या होत्या. त्यानंतर तीन वर्षांपर्यंत मी त्यांच्या मुलीला अंघोळ घातली. सर्व लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच मला तिथे ताई म्हणतात. मालकांची मुलं माझ्याबरोबर खूप खेळतात. उलट त्यांची आई मला म्हणते, “माधवीताई, आमची मुलं तुमच्याबरोबर जेवढं खेळतात, तेवढं आमच्याबरोबर खेळत नाहीत.” तेव्हा मी त्यांना म्हणते, “तुम्ही त्यांना वेळ देत नाही. आम्ही वेळ देतो म्हणून मुलं आमच्याकडे येतात.” मी ज्यांच्याकडे काम करते, ते खूप मोठे लोक आहेत. एकदा वहिनीची ओटीभरण होती, तेव्हा त्यांच्या सासू, आई आणि पतीनं हात धरून मला वर नेलं आणि मला म्हणाले, “आधी ओटी तू भर; मग बाकीचे लोक भरतील.” सर्व लोक बघत होते. गरीब असताना मला इतका मोठा मान दिला; खूप छान वाटलं.
एवढ्या वर्षांमध्ये अनेक ठिकाणी घरकाम करताना चांगले-वाईट अनुभव आले; पण आर्थिक समस्या असल्यामुळे या गोष्टींकडे मी फार लक्ष देत नाही. मिळालेल्या पैशात भागत नाही. त्यामुळे कितीही वाईट वाटले तरी माझ्यासाठी काम करणं गरजेचं आहे.

– माधवी गायकवाड, पुणे

हेही वाचा : कॅन्सरशी लढत; ६२ वर्षीय महिलेने कर्करोगाच्या अभ्यासासाठी पोहण्यातून उभारला फंड! पाहा…

एक दिवस माझा मुलगा म्हणाला, “मीपण तुझ्याबरोबर भांडी घासायला येतो”

मी दहावी-बारावीत असल्यापासून मी काम करते. काही ठिकाणी १० वर्षांपासून काम करते. हे लोक माझ्या विश्वासावर घर सोडून नोकरीवर जातात. ते म्हणतात की, आम्ही दुसऱ्या बाईला ठेवू शकत नाही. कारण- आम्ही दुसऱ्या कोणावर विश्वास ठेवू शकत नाही. विश्वास खूप महत्त्वाचा असतो. जिथे मी वर्षानुवर्ष काम करते, ते घर मला आपल्या घरासारखं वाटते. तिथे मला आदर मिळतो.

एका घरी काम करते, तिथे त्यांच्या एका नऊ वर्षांच्या मुलाचा अपघात झाला होता, तेव्हा माझे डोळे भरून आले होते. आपला मुलगा अन् त्यांचा मुलगा, असा भेदभाव मी कधीच केला नाही. मालकाची मुलं त्यांच्या लहान-मोठ्या गोष्टी माझ्याबरोबर शेअर करतात. अनेकदा मुलं काही गोष्टी त्यांच्या आई-वडिलांबरोबर शेअर करीत नाहीत, त्या माझ्याबरोबर शेअर करतात. त्यांना चांगलं वळण लागावं, हाच माझा हेतू असतो.

मी घरकाम करते, याविषयी माझ्या मुलांना वाईट वाटतं. पण, मी त्यांना सांगते की, तुम्हाला अशी कामं करायची नाहीत. एक दिवस माझा मुलगा म्हणाला, “मीपण तुझ्याबरोबर भांडी घासायला येतो.” तेव्हा मी त्याला एकच म्हणाली की, तुला मी भांडी घासण्यासाठी शिकवत नाही. तुला शिकून मोठं व्हायचंय. मला वाटतं जे काम मी करते, ते माझ्या मुलांनी करू नये. त्यांच्यासाठीच मी काम करते. त्यांना माझ्याविषयी आदर आहे. मी जिथे काम करते, त्यांच्या मुलानं उन्हाळ्यात चित्रकलेचा क्लास लावला होता, ते पाहून मीही माझ्या मुलाला क्लास लावून दिला. चांगल्या लोकांबरोबर राहिल्यानं माझ्या मुलालाही चांगली शिकवण मिळते.
मी सर्व घरकाम करणाऱ्या महिलांना हेच सांगेन की, आपण जिथे काम करतो, तिथे प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. जे लोक आपल्यावर खूप विश्वास ठेवतात, त्यांचा कधीही विश्वासघात करू नये. कारण- तेच लोक आपल्याला ऐन अडचणीच्या वेळी मदत करतात. त्याची जाणीव आपल्याला असायला हवी.

– सविता मोटघरे, नागपूर</strong>

“या २७ वर्षांमध्ये मी कित्येक मुलांची नकळत आई झाली.”

मी २७ वर्षांपासून घरकाम करते. मला या कामाची अजिबात लाज वाटत नाही. काम हे काम आहे, ते लहान किंवा मोठं नसतं. मी स्वाभिमानानं अन् प्रामाणिकपणे काम करते याचा मला अभिमान आहे. आम्ही जे काम करतो, तिथे विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो आणि विश्वासावर आमचं काम चालतं. त्यामुळे मला आनंद वाटतो की, मी लोकांचा विश्वास जिंकू शकते. या २२ वर्षांमध्ये मी अनेक ठिकाणी काम केलं. चांगले-वाईट अनुभव आले. काही लोक नोकरीच्या ठिकाणी बदली झाल्यामुळे शहर सोडून गेले; पण आजही ते फोन करतात. कार्यक्रमाला बोलावतात. खूप छान वाटतं की, आपण चांगली माणसं कमावली आहेत.
मी दोन लेकरांची आई आहे; पण या २७ वर्षांमध्ये मी कित्येक मुलांची नकळत आई झाले. त्यांना लहानांच मोठं होताना बघितलं. काही मुलांची लग्न झाली, त्यांना लेकरं झाली. त्यांच्या मुलांनासुद्धा मी सांभाळते. त्यामुळे मला आईबरोबर आजीसुद्धा होता आलं. अनेकदा आम्ही जे काम करतो, ते खालच्या दर्जाचं समजलं जातं; पण खरं सांगायचं, तर आम्ही विश्वासाच्या जोरावर नातं निभावतो आणि माणसं कमावतो. मी बारावी शिकलेली आहे. सुरुवातीला परिस्थितीनुसार हे काम स्वीकारलं. नंतर मी दुसरं काम करू शकत होते; पण मला घरकाम करायला आवडतं. लोकांना मदत करायला आवडतं. त्यामुळे मी हे काम सुरू ठेवलं आणि पुढेही जमेल तेवढं करेन.”

– शीला बावणे, नागपूर