स्टेशनवरच्या त्या प्रचंड गदारोळात सुद्धा तिला तिच्या ह्रृदयाचे वाढत जाणारे ठोके स्पष्टपणे ऐकू येत होते. हाताच्या पंज्याना सुटणारा घाम काही केल्या कमी होत नव्हता. समोरुन येणाऱ्या गाडीचा भोंगा वाजला तसं तिने स्वतःला सावरायचा प्रयत्न केला. ‘नको जाऊया ट्रेनने. उगाच आले मी या गर्दीच्या वेळी.’ लॉकडाऊन संपून आता तसा काळ उलटून गेला होता. प्रत्येक जण ‘बॅक टू नॉर्मल’ होण्याचा प्रयत्न करत होता. पण तेच. फक्त प्रयत्नच करत होता. त्यांच्यातलीच ही एक. तब्बल दोन वर्षांनी लोकल ट्रेनचा प्रवास करणार होती. या प्रवासाच्या पूर्वतयारीची सुद्धा तयारी तिने मनातच करुन ठेवली होती. पण आयत्या वेळी आपण कच खाणार हे तिला स्पष्ट जाणवत होतं. ट्रेन आता प्लॅटफॉर्म च्या दिशेने येत होती. ती मान उंच करुन पाहण्याचा प्रयत्न करत होती. हातातलं सामान तिनं छातीशी घट्ट धरलं. पंज्यांचा घाम कपड्यांनाच पुसला आणि घामाने भिजलेल्या चेहऱ्यावरुन हात फिरवून तो सगळा घाम पुसण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केला. गाडी आता जवळ येत होती. चढणारे आणि उतरणारे एकमेकांना तितक्याच कुतूहलाने पाहत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्याक्षणी का कोण जाणे पण तिला तो दिवस आठवला. नव्या शहरातील नव्या शाळेचा तिचा पहिला दिवस. नव्या वर्गाच्या बाहेर बावरुन घुटमळत असलेली ती वर्गात हळूच डोकावत पाहत होती. मधेच तिच्या नजरा वर्गातल्या कोणा अनोळखी नजरांवर आपटत होत्या. दोघांच्या नजरांतील कुतूहल मात्र सारखंच. दोघंही एकमेकांसाठी नवख्या. तिच्या हातांच्या पंज्याना घाम फुटला होता, घसा तर केव्हाच कोरडा पडला होता. डोळे मात्र पाण्याने गच्च भरले होते. धास्ती, अस्वस्थता, नवखेपणा, नव्या शाळेचा राग आणि सगळ्यात जास्त – भीती असा सगळा ऐवज बाळगत ती दप्तराच्या बाह्यांना घट्ट पकडून दरवाज्याच्या आडोश्याशी उभी होती. “याच वर्गात आहेस ना तू? मग बाहेर काय उभी आहेस. चल, आत चल.” समोर उभ्या असणाऱ्या बाई तिचा हात पकडून तिला आत घेऊन गेल्या. आता वर्गातल्या सगळ्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या हे तिची मान खाली असूनसुद्धा तिला जाणवत होतं.

“ए बाजूला हो ना, चढायचं नाय तर मधे कशाला थांबते, आम्हांला तरी जाऊदे.” तिच्या मागे उभे असणारी बाई तिला अक्षरशः धक्का मारतच पुढे निघून गेली. त्या धक्क्याने का काय, माहीत नाही, पण ती ट्रेनच्या दरवाज्यापाशी पोहोचली आणि दुसऱ्या क्षणाला ती ट्रेनमध्ये होती. हे सगळं अगदी काही सेकंदांच्या अवधीत झालं होतं. ज्या गोष्टीची तिने इतकी धास्ती घेतली होती ती गोष्ट तिने केली हे जाणवायला सुद्धा तिला वेळ लागला. आतमध्ये बसायच्या जागा आधीच भरल्या होत्या. दोन सीट्सच्या मध्ये कशीबशी उभी राहायला मात्र जागा होती. तिने आजूबाजूला पाहिलं, उभ्या असलेल्या बायका बसलेल्या बायकांना त्यांचं उतरायचं ठिकाण विचारुन पटापट जागा स्वतःसाठी ‘आरक्षित’ करत होत्या. काहीजणी तर चार रांगा सोडून असलेल्या पलीकडच्या रांगांमध्ये बसलेल्या बायकांनासुद्धा ओरडून विचारत जागा पकडण्याचा प्रयत्न करत होत्या.

तिलाही वाटलं असं करावंसं. लांबचा दौरा होता. मध्ये कोणी उतरणार असेल तर आपल्याला किमान उरलेलं अंतर तरी बसायला मिळेल. कसं विचारायचं, ही बाई तर फोनवर बोलतेय, अन् ती तर चक्क झोपलीये. त्या खेकसल्या माझ्यावर तर? मगाशी ती बाई कशी दुसऱ्या बाईवर खेकसली झोपमोड झाली म्हणून.

कॉलेज ला गेल्यावर एका भीतीने कायम तिचा पिच्च्छा पुरवला होता, भाषेच्या. मराठी माध्यमातून शिकून आल्याने तिचं इंग्रजी तसं यथातथाच होतं. कॉलेज मध्ये मात्र झाडून सर्वजण इंग्रजीमधूनच बोलायचे. प्राध्यापक ताससुद्धा इंग्रजीमधूनच घ्यायचे. त्यांच्या शिकवणीत काही कळलं नाही तरी ते विचारायची हिम्मत तिने कधीच केली नाही. ‘माझ्या तोडक्यामोडक्या इंग्रजीमध्ये मी काही विचारलं आणि संपूर्ण वर्ग माझ्यावर हसला तर..’ तिच्याबरोबर तिच्या या भीतीने सुद्धा हात वर न करता कॉलेज पास केलं.

“ए, नीट उभी रहा ना. धक्का काय देतेस..कुठून या बायका येतात काय माहीत..” तिची खरंतर काही चूक नसताना पुढे उभी असलेल्या बाईने तिला फटकारलं. तिने यावर काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, पण ती नुसतंच मुसमुसत राहिली. तिच्या कार्यालयातील सहकाऱ्याने तिच्या कामाचं सारं श्रेय लाटल्यावर जशी मुसमुसली होती अगदी तशीच. तेव्हाही तिला खूप सांगायचं होतं पण असं सगळ्यांसमोर सांगायला काय माहीत का तिला भिती वाटली, तिची चूक नसतानाही. ‘मला पटवता नाही आलं लोकांना, तर काय करायचं मी..’ तोच सहकारी आता तिचा बॉस झाला होता, अधिकृतपणे तिच्या कामाचं श्रेय घ्यायला मोकळा.

ट्रेनने कचकन ब्रेक दाबला आणि तिला लक्षात आलं आपल्याला उतरायचंय. ती गर्दीतून कसाबसा मार्ग काढत दारापाशी पोहोचली, व्यवस्थित उतरण्याची तयारी पुन्हा मनाशी घोकायला लागली. पुढे उभ्या असणा-या बायकांना हळूहळू विचारत ती स्टेशनवर उतरणाऱ्या बायकांच्या निमुळत्या रांगेत उभी राहिली. आता तिला चढताना वाटत होती तितकी भिती वाटत नव्हती. स्टेशन आलं आणि एकच हलकल्लोळ झाला, ती अक्षरशः तरंगत उतरली, गर्दीनेच उतरवलं म्हणा. तिच्याबरोबर तिची भीती सुद्धा उतरली, अर्धवटशी. उतरल्या उतरल्या तिने निघणाऱ्या गाडीकडे पाहिलं. उरलेली भीती त्या गाडीतून तिच्यासमोरच मार्गस्थ होत होती!