सकाळी साडेपाचची वेळ. मुंबई मॅरेथॉनचा स्टार्टिंग पॉईंट. आज खूप म्हणजे, खूपच वर्दळ होती. सगळे उत्सुक चेहेरे. कधी एकदा मॅरेथॉन सुरु होतेय आणि आपण धावतोय अशा आविर्भावात. अनुला मजाच वाटली. आपला चेहेराही तसाच दिसत असणार. तिने हसून एक खोल श्वास घेतला आणि एक सेल्फी काढला. मॅरेथॉन सुरु झाली. १८ वी मुंबई मॅरेथॉन. कोरोनानंतर पहिलीच मॅरेथॉन असल्यामुळे सगळेच चार्ज्ड अप होते. १४ डिग्रीच्या थंडीत तोंडातून वाफ निघायला लागल्यावर अनुला एक्साईटिंग वाटले खरे पण त्याबरोबर श्वासही लागायला लागला पण तिने धावणं सुरूच ठेवलं. थोड्याच वेळात तिची पावलं एका लयीत पडायला लागली. आता तिने आजूबाजूला पाहिलं. जेवढी गर्दी धावायला आली होती, तेवढीच बघायलाही होती. कोणी शिट्ट्या ,टाळ्या, झांजा ,पिपाणी काय हवं ते वाजवत होते तर कोणी कमॉन कमॉन म्हणून चिअर करत होते. धावणाऱ्यांचा उत्साह अधिक की बघणाऱ्यांचा हा प्रश्न तिला पडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : United Nations भारतीय महिला लष्करी अधिकाऱ्यांची ‘ब्लू हेल्मेट’ सूदानमध्ये तैनात!

…काही कार्यकर्ते ग्लुकोज, पाणी, चॉकलेट्स घेऊन उभे होते. ओबी व्हॅन्स, कॅमेरामन, अँकर असा सगळा लवाजमा घेऊन हा इव्हेंट कव्हर करणारे पत्रकारही जमले होते. डीजेच्या तालावर धावायला अनुला मस्त वाटत होतं. काही लोक अवतार झाले होते, कोणी कंतारा.. कोणी काही संदेश घेऊन धावत होते, दिव्यांग लोकांनीही उत्साहाने भाग घेतला होता. तरुणांना लाजवेल एवढ्या एनर्जीने जेष्ठ नागरिक धावत होते. सगळं कसं मंतरलेलं, मोहून टाकणारं ..जिवंत. अचानक एक भला मोठा ताफा आला. तिने ओळखलं हा आंतरराष्ट्रीय धावपटूंचा ताफा असणार… कुरळे केस, उंच धिप्पाड, तगडा देह, मजबूत मांड्या, नसानसात प्रचंड ऊर्जा, नजर अंतिम ध्येयाकडे लागलेली… याला म्हणतात विनिंग स्पिरिट… एवढ फोकस्ड राहीलं तर काय कठीण आहे आयुष्यात? तिला आठवलं तीन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय धावपटूंना पाहूनच तिने ठरवलं होतं पुढच्या वेळी बघ्यांच्या घोळक्यात उभं न राहता थेट धावायचं.

आणखी वाचा : य़शस्विनी : २१ हजार फूट उंचीवर लिंगभेदाला मूठमाती… कशी, ते जाणून घ्या !

ती मरिन ड्राईव्हला आली. डावीकडे समुद्र आणि उजव्या बाजूला तिचं जुनं ऑफिस. जिथून कोरोनाच्या काळात तिला काढून टाकण्यात आलं होतं. त्यानंतर ती प्रेग्नन्ट राहिली. आता करिअरमध्ये केवढा मोठा गॅप. त्यावेळी तिला डिप्रेशन यायचच बाकी होतं. केवढी पुढे आले मी इथून! ती मनाशीच म्हणाली. ऑगस्टमध्ये डिलिव्हरी झाल्यावर १५ दिवसांनीच मॅरेथॉनची अॅड आल्यावर लगेच तिने ४२ किलोमीटर फूल मॅरेथॉनला नाव नोंदवलं. मूल तान्हं होतं त्यामुळे घरातून विरोध झाला, पण ही तिची जिद्द होती किंबहुना स्वतःच स्वतःला दिलेलं चॅलेंज होतं. स्वतःच्या इच्छाशक्तीला, मेहेनतीला, आत्मविश्वासाला, मनाच्या आणि शरीराच्या कणखरपणाला. जे तिने गेल्या काही वर्षात हरवलं होतं ते मिळवण्यासाठी हा टप्पा फार महत्वाचा होता. जिथे तिचा कस लागणार होता. तिने हे चॅलेंज घेतलं. डायटिशिअनकडून डाएट घेतलं. पर्सनल ट्रेनरकडून कोचिंग घेऊन कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अंतर कव्हर कसा करता येईल याचा विचार ती सतत करू लागली. हा सगळं प्रवास आठवत ती सीलिंकला पोचली. नव्या आयुष्याची उत्सुकता घेऊन परतीचा प्रवास आत्मविश्वासाने सुरु झाला. मनात आणलं तर काय शक्य नाही? एँण्ड पॉईंटला पोहोचल्यावर तिला वाटलं. तिने ३ तास ५२ मिनिटात फुल मॅरेथान पूर्ण केली. मेडल घेतलं. तेवढयात “काँग्रॅट्स” असा ओळखीचा आवाज आला. टियाने घामाने भिजलेल्या ओल्याचिंब अनुला घट्ट मिठी मारली.

आणखी वाचा : आरोग्य : थंडीत पांढरे तीळ खाल्ल्यानं स्रियांना मिळतील ‘हे’ फायदे

कॉफीशॉपमध्ये टिया तिला ओढत ओढतच घेऊन गेली. “काय चाललंय काय तुझं ? सहा महिन्याच्या बाळाला सोडून मॅरेथॉन काय धावतेस?” “१५ किलो वजन वाढलं अग.” “सो व्हॉट?” फ़्रेंच फ्राईज तोंडात कोंबत टियाने खांदे उडवले. “माझं वजन तर २० किलो वाढलं होतं. मस्तपैकी डिंकाचे, मेथीचे लाडू खायचे. मुलाला सांभाळायचं, जमेल तेवढा आराम करायचा ते सोडून हे काय? पहाटे उठायचं, धावून धावून जीव शिणवायचा आणि नंतर हे असं जीव मारत डाएट करायचं. कशासाठी तर या मेडलसाठी? जे सगळ्यांनाच मिळतं?” अनु एव्हाना शूजच्या लेस सैल करून मांडी ठोकून बसली. शांतपणे तिने सुरुवात केली. “ टिया तुला माहीत आहे? या वर्षी ‘हर दिल मुंबई’ हा नारा घेऊन ५५ हजार स्पर्धक मॅरेथॉनमध्ये सामील झाले होते, मुंबईसाठी. या मुंबईने काय नाही दिलं आपल्याला? स्वप्नं दिली, ती पूर्ण करण्याचा आत्मविश्वास दिला, परिस्थितीवर मात करण्याची जिद्द दिली. तगडी स्पर्धा दिली. आपल्याला जगायला कम्पॅटेबल बनवलं. त्या मुंबईसाठी एक दिवस धावायचं… तसं काय ग मी शिवाजी पार्कला धावूनसुद्धा वजन कमी करू शकले असते, पण मॅरेथॉनला धावण्यामुळे धावण्याला निश्चित ध्येय मिळाले. त्याच दिशेने मी सिस्टिमॅटिक प्रयत्न केले. फिटनेस पाहिला. सतत स्वतःच्या परफॉर्मन्स मध्ये सुधारणा कशी होईल याचा विचार केला आणि अंतिम लक्ष्य गाठले. माझ्या थांबलेल्या करिअरला याच आत्मविश्वासची आणि योग्य नियोजनाची गरज होती ती मला मुंबई मॅरेथॉनने दिली.”

आणखी वाचा : भोगीची आमटी : एक चवदार आठवण

टीया विचारात पडली की आता काय उत्तर द्यावे. अनुला समजलं की आपण इथेही जिंकलोय. तिने टीयाच्या खांद्यावर थोपटलं आणि म्हणाली, “आज संक्रांत. सकाळपासूनच शाळा घेतेस माझी. निदान आज तरी माझ्याशी गोड बोल. खरं सांगू का, मॅरेथॅान धावल्याशिवाय हे विनींग स्पिरीट नाही कळायचं तुला. आपण असं करू पुढच्या वर्षी सोबत धावू काय म्हणतेस?”

tanmayibehere@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai marathon runner women achievement and energy diet and exercise winning spirit vp