रोजच्या भाजीला फोडणी देण्यासाठी व लोणच्यात मसाल्यासाठी आवश्यक असलेला मसाल्याचा रुचकर पदार्थ म्हणून मोहरीचा वापर केला जातो. भारतामध्ये मोहरी सर्वत्र पिकते आणि तिचा मसाला म्हणून वापर सर्व प्रदेशांमध्ये केला जातो. मराठीत ‘मोहरी’, संस्कृतमध्ये ‘राजिका’, इंग्रजीमध्ये ‘मस्टर्ड’, तर शास्त्रीय भाषेत ‘ब्रासिका जन्सीआ’ (Brassica Juncea) या नावाने ओळखली जाणारी मोहरी ही वनस्पती ‘क्रुसीफेरी’ या कुळातील आहे. मोहरीचे रोप हे हात ते दीड हात उंच असते. त्याची पाने हिरवी असून, त्याची भाजी केली जाते. या रोपाला पिवळी मोहक फुले येतात व नाजूकशा इंच-दीड इंच लांबीच्या शेंगा लागतात. या शेंगाच्या आतमध्येच खूप बारीक दाणे असतात.
पांढरी, काळी आणि लाल असे तीन प्रकार मोहरीचे आहेत. काही ठिकाणी मोहरीला राई या नावाने ओळखले जाते. प्रामुख्याने भाजी, आमटी, कढी, मठ्ठा, लोणचे यांना फोडणी देण्यासाठी मोहरीचा उपयोग केला जातो.
औषधी गुणधर्म
आयुर्वेदानुसार: मोहरी उष्ण, तीक्ष्ण, अग्निप्रदीपक, पित्तकारक, कृमीघ्न, वायू व कफनाशक आहे.
मोहरीची पाने वायुनाशक, कफनाशक, कंठरोगनाशक, पित्तकारक व कृमीघ्न आहेत. ही भाजी चवीला रुचकर लागत असली, तरी पित्तप्रकृतीच्या व्यक्तींनी उन्हाळ्यामध्ये हिचा वापर करणे टाळावे.
आधुनिक शास्त्रानुसार: मोहरीमध्ये उष्मांक, प्रथिने, मेद, खनिजे, तंतुमय पदार्थ, ‘अ’, ‘बी-६’, ‘सी’, ‘ई’, ‘क’ ही जीवनसत्त्वे, कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, फॉस्फरस, सोडिअम, झिंक ही पोषक घटक मूलद्रव्ये असतात.
उपयोग
१) संधिवातामध्ये एखादा सांधा किंवा स्नायू जखडला असेल, तर त्या अवयवांवर मोहरीचे पोटीस करून बांधल्यास सांध्यांची हालचाल व्यवस्थित होते.
२) वृद्धावस्थेत एखाद्या रुग्णाला अर्धांगवायूचा त्रास होत असेल, तर मोहरीच्या तेलाने मसाज केल्यास फायदा होतो.
३) संधिवात, आमवातामध्ये सांधेदुखीचा त्रास होऊन सूज आलेली असेल, तर सर्व अंगाला मोहरीच्या तेलाने मालीश करावे.
४) रुग्णांनी घेतलेले विष शरीराबाहेर काढण्यासाठी पाच ग्रॅम वाटलेली मोहरी आणि पाच ग्रॅम मीठ गरम पाण्यात घालून प्यायला दिल्यास उलट्या होऊन आतील विष बाहेर पडते.
५) थंडीताप या आजारामध्ये ताप जाऊन जेव्हा थंडी भरून येते, तेव्हा मोहरीच्या तेलाने हलकेसे मालीश करावे. किंवा मोहरीचा लेप शरीरावर लावल्यास लगेचच थंडी कमी होऊन रुग्णास आरामदायी वाटते.
६) संधिवात, स्नायूदुखी, अंगदुखी, पोटदुखी, सायटिका, कंबरदुखी, गुडघेदुखी, शीर आखडणे या विकारांवर मोहरीच्या तेलाने मसाज करावा. तसेच मोहरीच्या पानांची भाजी करून खावी.
७) भूक मंद झाली असेल व अपचनाची तक्रार जाणवत असेल, तर मोहरीच्या पानांचा रस दोन- दोन चमचे तीन वेळा घ्यावा.
८) मोहरीच्या पिठात तूप व मध मिसळून त्याचा लेप जखमेवर लावल्यास जखमेमधील जंतुसंसर्ग कमी होऊन जखम लवकर भरून येते.
९) मोहरीचे पीठ तुपात कालवून रांजणवाडीवर लेप लावल्यास रांजणवाडी त्वरित बरी होते. फक्त हा लेप लावताना तो डोळ्यांत जाणार नाही, याची काळजी घ्यावी.
१०) एखादा रुग्ण मूर्च्छेमध्ये, बेशुद्ध अवस्थेत असेल, तर मोहरीचे चिमूटभर पीठ नाकात फुंकरले असता रुग्ण शुद्धीवर येतो.
११) सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवत असेल, तर अर्धा चमचा मोहरी मधात कालवून सकाळ- संध्याकाळ चाटण केल्यास सर्दी बरी होऊन खोकला कमी होतो.
१२) उलट्या बंद होत नसतील, तर अशा वेळी मोहरी पाण्यात वाटून त्याचा लेप पोटावर लावावा. याने त्वरित उलट्या होणे बंद होते.
सावधानता
मोहरी गुणाने अतिशय उष्ण असल्याने तिचा अति प्रमाणात उपयोग केल्यास आमाशय व आतड्यांचे नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणून तिचा मसाल्यात वापर योग्य प्रमाणातच करावा. मोहरीचे तेल त्वचेवर लावल्यास काहीजणांना त्वचा लाल होऊन फोड येतात. म्हणून प्रथम वेळी मोहरीचे तेल शरीरावर लावताना सुरुवातीला थोड्याच भागावर लावून पाहावे. जर फोड आले, तर त्या तेलाने मसाज करू नये.