एका कामानिमित्त कोकणातील माझ्या सासरी (माणगावं) जाण्यासाठी खासगी बसने आमचा प्रवास सुरु झाला. बस जवळपास तीन ते चार तास सुसाट वेगाने धावत रस्ता कापत होती. पण बसमधील प्रवासी मात्र बाथरुमला जाण्यासाठीही ड्रायव्हरने १० मिनिटेही बस न थांबल्याने त्याच्या नावाने खडे फोडत होते. अखेर ४ तासांच्या प्रवासानंतर बस (वडखळ) येथील एका हॉटेलबाहेर येऊन थांबली, बस थांबल्या- थांबल्या उतरुन अनेक प्रवासी बाथरुमच्या दिशेने गेले. गणपतीचा सण असल्याने आमच्या बसप्रमाणे तिथे प्रवासांनी गच्च भरलेल्या १० -१२ बस आधीच उभ्या होत्या. त्यामुळे साहजिक होते की, बाथरुमध्ये जाण्यासाठी गर्दी असणारच. तरीही तिथे जाणे गरजेचेच असल्याने मी रांगेत उभी राहिली. रांग जस जशी पुढे सरकत होती, तसा तसा अतिशय घाणेरडा वास नाकात शिरत होता, यामुळे अनेक महिला नाकावर रुमाल, ओढणी, स्कार्फ, पदर जे काही मिळेत ते बांधून आत शिरत होत्या.
…बाहेर आल्यानंतर प्रत्येकीच्या तोंडून एकच वाक्य ऐकायला मिळत होते, खूप घाण आहे, डोकं उठल वासाने… अशाप्रकारे बाथरुममधून येणाऱ्या प्रत्येकीच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहताना माझा नंबर आला, मी स्कार्फ किंवा काहीच न नेल्याने मला तो वास सहन करत आत शिरावे लागले. यावेळी आत गेल्यानंतर जे दिसले ते दृश्य पाहून मला धक्का बसला. महिला इतक्या घाणेरड्या पद्धतीने कशा काय वागू शकतात? असा प्रश्न मला पडला. परिस्थिती अशी होती की, त्या बाथरुममधील प्रत्येक कोपऱ्यात वापरलेल्या सॅनिटरी पॅडचा खच पडला होता, ज्यामुळे संपूर्ण बाथरुममध्ये इतक्या वाईट प्रकारची दुर्गंधी पसरली होती की, ज्याचा तुम्ही विचार करुही शकत नाही.
बाथरुमच्या आतील खिडकीवर, नळाजवळ, पाहू त्या ठिकाणी वापरलेले सॅनिटरी पॅड अत्यंत वाईट पद्धतीने फेकले होते. जे पाहून खरचं खूप संताप होत होता. नेहमी स्वच्छता, साफसफाईच्या गोष्टीवरून चार- चौघीत मिरवणाऱ्या या महिलांना सार्वजनिक ठिकाणी आपणं वापरलेले सॅनिटरी पॅड कशापद्धतीने कचऱ्याच्या डब्यात फेकले पाहिजे याचीही अक्कल नसावी का? असेच उघड्यावर फेकलेल्या आपल्या सॅनिटरी पॅडमुळे इतरांना संसर्ग होऊ शकेल, याचाही विचार या महिलांच्या डोक्यात येत नसेल का? या महिला आपल्या घरातील बाथरुमध्ये अशाप्रकारे सॅनिटरी फेकून देतात का? असे चीड आणणारे प्रश्न मला यावेळी पडले. आज दुकानातूनही सॅनिटरी पॅड विकत घेताना काही महिलांना अवघडल्यासारखे होते, मग वापरलेले सॅनिटरी पॅड उघड्यावर टाकताना अवघडल्या सारखे होत नाही का? एकंदरीत ही परिस्थिती खूपच भयावह होती. तुम्ही वापरलेल्या सॅनिटरी पॅडची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे हीदेखील तुमची जबाबदारी नाही का?
लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान रस्त्यावरील सार्वजनिक शौचालयांमधील स्वच्छता आणि तिथे महिलांसाठी असणाऱ्या अपुऱ्या सोयी पाहून सरकारच्या नावाने आरडाओरडा करतो, पण ज्याठिकाणी खरचं महिलांसाठी बाथरुमची सुविधा आहे, तिथे आपण स्वच्छता ठेवणे आपली जबाबदारी नाही का? ही परिस्थिती कोकणात जाणाऱ्या एका हॉटेलच्या बाथरुम पुरती मर्यादित नाही तर तुम्हाला जाताना अशी अनेक हॉटेल्स दिसतील, जिथे महिलांच्या बाथरुममध्ये अशीच परिस्थिती असते.
एखाद्या महिलेला प्रवासादरम्यान अचानक पाळी आली तर तिची परिस्थिती आपण समजून घेऊ शकतो. पण ज्या महिलांना प्रवासाआधीच पाळी आली आहे, त्या महिलांनी वापरलेले सॅनिटरी पॅड योग्यपद्धतीने डिस्पोस करुन किंवा उघड्यावर न टाकता ते व्यवस्थित रॅप करुन टाकण्यासाठी आधीच तयारी ठेवायला हवी. इतक्या गलिच्छपणा अशाप्रकारे वागणाऱ्या महिला आपल्या घरात अशाच वागतील का?
दुसरी गोष्ट म्हणजे, देशात महिलांच्या सॅनिटरी पॅडच्या वापराबद्दल जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम राबवले गेले, अनेक चित्रपट रिलीज झाले, जाहिराती प्रसिद्ध झाल्या. पण सॅनिटरी पॅडचा वापर करुन झाल्यानंतर ते कशाप्रकारे डिस्पोस करायचे या बद्दल तितकेसे ठळक ज्ञान देण्यात आलेले नाही हे मलाच प्रकर्षाने जाणवले. माझ्या माहितीत अशा अनेक महिला आहेत, ज्यांना सॅनिटरी पॅड वापरल्यानंतर ते कसे डिस्पोज करायचे हे नीट माहीत नाही. त्यामुळे आपल्या पद्धतीने त्या सॅनिटरी पॅडची विल्हेवाट लावतात. यात अनेक ठिकाणी सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीन्स दिसतील पण त्या मशीनमध्येही पॅड कसे डिस्पोज करायचे याची माहिती नाही. त्यामुळे त्या उघड्यावर पॅड टाकून जाण्यात धन्यता मानतात. पण अशाप्रकारे एक- एक करुन जमा झालेल्या पॅड्समधून येणाऱ्या दुर्गंधीचा इतर महिलांना सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत आजारी महिलांनी वॉशरुमसाठी कुठे जायचे असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य समजून तरी प्रत्येकीने प्रवासादरम्यान वापरलेले सॅनिटरी पॅड नीट व्यवस्थित पॅक करून कचऱ्याच्या डब्यात टाकावे, आपण करोना काळात ज्याप्रमाणे माझा मास्क, माझी जबाबदारी समजून तो नीट कचऱ्याच्या डब्यात टाकत होतो, त्याचप्रमाणे तुम्ही वापरलेले सॅनिटरी पॅड हे माझे सॅनिटर पॅड, माझी जबाबदारी समजून कचऱ्याच्या डब्यात टाकायला हवे!