केतकी जोशी
एरवी कुठेही विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले की सगळ्या देशाचं लक्ष त्या राज्याकडे जातं. पुण्याच्या पोटनिवडणुकीनंही लक्ष वेधून घेतलं होतं.पण ईशान्येकडील राज्यांच्या निवडणुका फारशा चर्चेत नसतात. मात्र या खेपेस ईशान्येकडील राज्यामध्ये- नागालँडमध्ये इतिहास घडला आहे. नागालँड (Nagaland) विधानसभा निवडणुकीमध्ये गेल्या ६० वर्षांमध्ये पहिल्यांदाच महिला आमदार निवडून आल्या आहेत. १९६३ मध्ये नागालँड राज्याची स्थापना झाली, तेव्हापासून ते आजपर्यंत नागालँडमध्ये विधानसभेच्या १४ निवडणुका झाल्या. पण एकदाही एकाही महिलेला प्रतिनिधित्व मिळू शकलं नव्हतं. आता नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नागालँडमध्ये पहिल्यांदाच दोन महिला आमदार निवडून आल्या आहेत. दीमापूर तृतीय मतदारसंघातून भाजप आणि एनडीपीपी युतीच्या उमेदवार हेकानी जखालू तर पश्चिम अंगानी मतदारसंघातून एनडीपीपी आणि भाजप युतीच्या सलहूतुनू क्रुसे या दोघींनी नागालँडच्या राजकारणात इतिहास घडवला आहे. हेकानीनं प्रतिस्पर्धी लोकजनशक्ती पार्टीचे (रामविलास) अजेतो जिमोमी यांचा १५३६ मतांनी तर क्रुसेने अपक्ष उमेदवार केनेजाखो नखरो यांचा १२ मतांनी पराभव केला आहे. या दोघींचाही विजय अत्यंत वेगळा आणि महत्त्वाचा आहे. जिथे आतापर्यंत महिला उमेदवारही नव्हत्या. तिथे या निवडणुकीत चार महिला उमेदवार होत्या. हेखानी जखालू,सलहूतु क्रुसे, हुकली सेमा आणि रोझी थॉम्पसन या चारजणींनी निवडणूक लढवली. त्यातल्या जखालू आणि क्रुसे या दोघी जिंकल्या.आणि आता त्या त्यांच्या मतदारसंघाचं नागालँड विधानसभेत प्रतिनिधीत्व करतील, याला खूप वेगळा अर्थ आहे.
हेकानी जाखलू ही तोलुवी गावाची रहिवासी आहे. समाजकारणात ती गेली अनेक वर्षे सक्रिय आहे. व्यवसायानं ती वकील आहे. वंचित घटकांसाठी ती सातत्यानं काम करत आहे. तिच्या याच कार्याबद्दल २०१८ मध्ये तिला नारी शक्ती पुरस्काराने सन्मानितही करण्यात आलं होतं. हेकानीचं सुरुवातीचं शिक्षण बंगळुरुच्या बिशप कॉटन गर्ल्स स्कूलमध्ये झालं आहे. त्यानंतर तिनं दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदवी घेतली आणि दिल्ली विद्यापीठातून एलएलबी केलं,त्यानंतर एलएलएम करण्यासाठी ती सॅनफ्रॅन्सिस्कोला गेली. यूएनमध्ये इंटर्नशिप केल्यानंतर ती भारतात परत आली. दिल्लीत काही काळ तिनं वकिलीही केली आहे. नागालँडमधून अनेक तरुण दिल्लीला पळून जात आहेत असं तिच्या लक्षात आलं आणि त्यांच्या मदतीसाठी ती परत नागालँडमध्ये परतली. तिथं तिनं यूथ नेट नावाची संस्था सुरु केली. या संस्थेअंतर्गत तिनं अनेक युवकांना त्यांच्याच शहरात रोजगार मिळवून देण्यासाठी मदत केली. तिच्या घरातलं कुणीही राजकारणात नाही. पण हेकानी मात्र सक्रिय राजकारणात आली. नागलँडमध्ये महिलांना मालमत्तेचा अधिकारच नाही. त्यामुळे इच्छा आणि क्षमता असूनही अनेक महिला राजकारणात पुढे येऊ शकत नाहीत. कारण राजकारणात पैसा हा घटक खूप महत्त्वाचा ठरतो, असं तिला वाटतं. नागालँडच्या पंचायत संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांना आरक्षण दिलं गेलं होतं. पण त्यालाही विरध झाला,काही ठिकाणी तर हिंसाचाराही झाला. महिलांसाठी, युवकांसाठी यापुढही काम करण्याची हेकानीची इच्छा आहे.
पश्चिम अंगानीमधून निवडून आलेली सलहुतूनू क्रुसे हीदेखील गेली काही वर्षे समाजकारणात सक्रिय आहे. ती अंगामी महिले संघटनेची अध्यक्ष होती आणि आता सल्लागार म्हणून काम करते. ती कोट्यधीश आहे. नागालँडमधील श्रीमंत लोकांमध्ये तिच्या कुटुंबाची गणना होते. क्रुसे १२ वी पास आहे. ती एक शाळा चालवते आणि त्याची संचालकही आहे. तिचे दिवंगत पती २०१८ मध्ये पश्चिम अंगामी मतदारसंघातून एनडीपीपीचे उमेदवार होते. मात्र त्यांचा पराभव झाला होता. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आणि नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांनी क्रूसेसाठी प्रचार केला होता.
हा ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर साहजिकच या दोघींनाही प्रचंड़ आनंद झाला आहे. क्रुसेनं ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, ”आज आम्ही इतिहास घडवला आहे. हा महत्त्वाचा विजय आमचा आहे. या विजयाचं श्रेय मी सर्वशक्तीमान ईश्वर आणि माझ्या परिसरातील सर्व नागरिकांचे मी आभार मानते. मला तुमची सेवा करायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद!”
नागालँडमध्ये २७ फेब्रुवारी रोजी विधानसभेच्या ५९ जागांसाठी मतदान झालं होतं. या दोघी जिंकून आलेल्या महिला उमेदवार कोणत्याही पक्षाच्या, जाती-धर्माच्या असोत पण त्या निवडून आल्या हे महत्त्वाचं. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. महिला राजकारणी या आपल्या राजकीय व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहेत. देशातील निम्मी लोकसंख्या असलेल्या महिलांना राजकारणात पुरेसं प्रतिनिधित्व मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. ग्रामपंचायत स्तरापासून ते लोकसभेपर्यंत महिला प्रतिनिधी असणं ही काळाची गरज आहे. महिला प्रतिनिधी असल्या की धोरणं, योजना या सगळ्यांमध्येच त्याचं प्रतिबिंब पडतं.महिला प्रतिनिधींची राजकारणातली संख्या वाढली की दबाव गटही तयार होतो. ज्याचा अर्थातच महिलांसाठीचे निर्णय घेण्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच महिला राजकारणात येणं, त्या निवडणुकीत जिंकून येणं आणि निर्णयप्रक्रियेत सहभागी होणं हे खूप महत्त्वाचं आहे.
पुरुषसत्ताक पध्दतीत जिथं महिलांना अगदी मुलभूत हक्कही नाकारले जातात, तिथे राजकारणात उभं राहण्याचं धाडस दाखवणं आणि टिकून राहणं यासाठी धाडस लागतं. अनेक पूर्वग्रह, गैरसमज दूर सारुन जखालू आणि क्रुसे या दोघींवर लोकांनी पहिल्यांदाच विश्वास दाखवला आहे. हा विजय फक्त या दोघींसाठीच नाही तर नागालँडमधील अनेक महिलांसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. कदाचित पुढच्या विधानसभा निवडणुकीत महिला उमेदवारांची संख्या ४० झालेली असेल…