भारतातील ख्यातनाम धावपटू नयना जैस्वाल हिने वयाच्या २२ व्या वर्षी देशातील सर्वांत तरुण डॉक्टरेट पदवी (पीएच.डी.)धारक बनून नवा विक्रम तयार केला आहे. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी नयनाने पीएच.डी. पदवी मिळवली आहे. तेलगंणातील मेहबूबनगरमधील रहिवासी असलेली नयना लहापणापासूनच हुशार आहे. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी नयनाने पीएच.डी.चा अभ्यास सुरू केला होता. नयनाने महिला सक्षमीकरणासाठी मायक्रो फायनान्सचे योगदान किती आहे या विषयात आपली पीएच.डी. पूर्ण केली आहे.
नयनाने वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी दहावी आणि अवघ्या दहाव्या वर्षी इंटरमिजिएटचे शिक्षण पूर्ण केले होते. त्याशिवाय तिने वयाच्या १३ व्या वर्षी पत्रकारिता व जनसंवादाची पदवी मिळवली होती. त्यानंतर तिने वयाच्या १५ व्या वर्षी उस्मानिया विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यानंतर ती आशियातील सर्वांत तरुण पदव्युत्तर पदवीधर बनली. त्याशिवाय नयनाने काद्याची पदवीही प्राप्त केली आहे.
अभ्यासाबरोबर नयना खेळातही निपुण आहे. टेबल टेनिस खेळात नयनाने राष्ट्रीय व दक्षिण आशिया चॅम्पियनचा किताब पटकवला आहे. तिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक सुवर्ण, रौप्य व कास्यपदके जिंकली आहेत. नयना ही एक आंतरराष्ट्रीय प्रेरक वक्ताही आहे. तिने जगभरातील अनेक कार्यक्रम आणि चर्चासत्रांमध्ये भाग घेतला आहे.
हेही वाचा- एकीकडे पतीचा मृतदेह दुसरीकडे पोस्टमॉर्टम, २२ हजार मृतदेहांचं पोस्टमॉर्टम करणाऱ्या मंजू देवीची कहाणी
नयनाने होम स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. होम स्कूलमुळेच नयनाला आभ्यास आणि खेळ यांची सांगड घालता आली. शैक्षणिक आणि अॅथलेटिक्स या दोन्ही क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याचे श्रेय नयना तिच्या पालकांना देते. नयनाच्या या कामगिरीने असंख्य लोकांना त्यांची आवड जोपासण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.