ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हा सणावारांचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात लोकं खरेदीकडे वळतात. सण, उत्सव आला की कपड्यांची आणि दागिन्यांची खरेदी आवर्जून केली जाते. अनेक नवनवीन ब्रॅण्ड्स जाहिरातीद्वारे ग्राहकांना आपल्याकडे आकर्षिक करण्याचा प्रयत्न करतात. या सणावारांच्या दिवसांमध्ये विविध ब्रॅण्डस् मध्ये स्पर्धा रंगलेली असते. अशात ज्या ब्रॅण्डची जाहिरात ग्राहकांच्या पसंतीस उतरते त्या ब्रॅण्डच्या वस्तूंचा जास्त खप होतो.
या सणावारांचे औचित्य साधून प्रसिद्ध ब्रॅण्ड नल्ली सिल्कने एका जाहिरातीच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी नवीन डिझाइन्स सादर केल्या होत्या. मात्र या जाहिरातीला टीकेचा सामना करावा लागला. या जाहिरातीमधील मॉडेलने खूप सुंदर साडी नेसली होती पण तिने कपाळावर टिकली लावलेली नव्हती. मग काय… मॉडेलने टिकली लावली नाही म्हणून सोशल मीडियावर #NoBindiNoBusiness असा हॅशटॅग वापरुन टीका सुरू झाली. अखेर नल्ली सिल्क या ब्रॅण्डला जुनी जाहिरात मागे घेऊन नवीन जाहिरात करावी लागली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पण प्रश्न असा पडतो की टिकली आडवी येते की, लोकांची मागासलेली मानसिकता, याचा विचार करणे खूप जास्त गरजेचे आहे. हे पहिल्यांदा घडलेले नाही तर यापूर्वीही महिलांनी टिकली लावावी, यावर अनेकदा दबाव टाकण्यात आला आहे. याची अनेक ताजी उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेत. वारंवार टिकली लावण्याबाबत महिलांवर असा दबाव टाकला जात असेल तर समाजाची दिशा कुठे तरी भरकटतेय, हे खरं आहे.

हेही वाचा : “आपण सहन केलेली पीडा इतरांच्या वाटेला येऊ नये…” महिलांच्या ‘पंखां’त बळ देणाऱ्या प्रमिला गुप्तांचा संघर्ष वाचाच!

एखाद्या कपड्याच्या ब्रॅण्डचा टिकलीशी किंवा धर्माशी काय संबंध? त्यांच्या दुकानात येणारा ग्राहक हा टिकली लावणाराच असतो, असे तर अजिबात नाही. तुम्ही टिकलीचा संबंध हिंदू धर्माशी जोडत असाल तर दुकानात नल्ली सिल्क साडी खरेदी करायला फक्त हिंदू धर्माचेच लोक येत नाहीत. ब्रॅण्ड हा न्युट्रल आहे. सर्व धर्मीयांसाठी समान आहे. मग हा अट्टहास कशाला?

मुळात टिकली लावणे किंवा न लावणे, हा आवडीचा प्रश्न आहे. टिकली लावण्यावरुन ती हिंदू किंवा ती मुस्लीम असं तुम्ही परिक्षण करू शकत नाही. एखाद्या हिंदू मुलीला टिकली लावणे आवडू शकत नाही किंवा एखाद्या मुस्लिम मुलीला टिकली लावायला आवडू शकते. पण याचा अर्थ हा नाही की ती तिच्या धर्मावर प्रेम करत नाही. त्यामुळे टिकली हा श्रृंगाराचा भाग समजावा. त्याला धर्माशी जोडू नये.

कुंकू- टिकली हा कायमच वादग्रस्त विषय म्हणून पाहला जातो. कुंकू किंवा टिकली लावणे हा स्त्रियांचा आवडीचा आणि स्वातंत्र्याचा विषय आहे. तिच्या मागे सतत टिकली लावण्याचा अट्टहास धरुन तुम्ही स्त्रियांना बंधनात टाकण्याचा प्रयत्न करता आहात, हे आपल्याला कळत नाही.
काही महिनयांपूर्वी भिडे गुरुजींनी एका महिला पत्रकाराला आधी कुंकू लाव मग तुझ्याशी बोलतो असं म्हणत हाकलून दिलं होतं म्हणजे एवढीशी टिकली स्त्रियांच्या व्यक्तिमत्त्वापेक्षा महत्त्वाची कशी का असू शकते? या टिकलीसमोर स्त्रियांचे अस्तित्व काहीच नाही? आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जाताहेत तरीसुद्धा तिला टिकलीसारख्या क्षुल्लक विषयावरुन डावलले जात असेल तर समाज आजही असंस्कृतच आहे, असं मान्य करावं लागेल.

हेही वाचा : स्त्रियांनो, जागे व्हा अन् ओळखा तुमच्यात दडलेली देवीची नऊ रुपे

खरं तर ही मानसिकता बदलणे, खूप आवश्यक आहे. टिकलीसारख्या क्षुल्लक विषयामुळे एखाद्या ब्रॅण्डला नवी जाहिरात करावी लागत असेल तर ती ब्रॅण्डची समस्या नाही तर आपल्या दुर्बल मानसिकतेचे ते द्योतक आहे. आणि आपण कितीही आधुनिकतेविषयी बोलत असलो तरी याच कारणामुळे आपली दुर्बल मानसिकता आपल्याला पुढे जाऊ देणार नाही.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nalli silks brand trolled for its latest advertisement featuring model without bindi nobindinobusiness hashtag goes viral on social media do you agree with that mentality ndj