नोकरदार क्षेत्रामध्ये काही वर्षांपासून स्पर्धा इतकी वाढली आहे, की आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठीच प्रत्येक जण प्रयत्न करताना दिसत आहे. कामाचे आठ तास कधी १२, १५ होतात हे कळतच नाही. अशातच इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील नावाजलेले उद्योजक नारायण मूर्ती यांनी एक वक्तव्य केलं होतं. जागतिक स्तरावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल, तर सध्याच्या युवावर्गानं आठवड्यातून ७० तास काम करण्यासाठी तयार राहावं, असं ते म्हणाले. यावर एडलवाइस म्यूचुअल फंडच्या एमडी आणि सीईओ राधिका गुप्ता यांनी भाष्य केलं आहे.
महिला उद्योजिका राधिका गुप्ता यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या म्हणतात, “वर्षानुवर्षे भारतीय महिला घर आणि ऑफिस सांभाळून ७० तासांहून अधिक वेळ काम करीत आहेत. नवी पिढीसुद्धा घडवतायत, तेसुद्धा हसतमुखपणे कोणत्याही ओव्हर टाइमची अपेक्षा न ठेवता हे करतायत, गंमत म्हणजे, ट्विटरवर आमच्यासाठी कोणीही वाद घातला नाही.” ही पोस्ट २९ ऑक्टोबरला शेअर करण्यात आली होती. अनेक लोकांनी पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हेही वाचा >> शेवटी लेक महत्त्वाची… सासरच्या जाचाला कंटाळलेल्या लेकीसाठी माहेरच्यांनी परतीची दारे उघडी ठेवायलाच हवीत!
या सगळ्या चर्चांनंतरही एक प्रश्न कायम राहतो तो म्हणजे महिला कितीही मोठ्या पदावर पोहोचल्या तरी त्यांना घर, कुटुंब सुटत नाहीच. घरापासून ते देशाच्या विकासामध्ये महिलांचे मोठे योगदान पाहायला मिळते; मात्र तरीही त्याची विशेष दखल घेतलेली पाहायला मिळत नाही.