-सुरेश वांदिले
विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांनाही देशापरदेशातील शिक्षण घेण्यासाठी ‘नरोत्तम सेखसरिया फाऊंडेशन’मार्फत शिष्यवृत्ती दिली जाते. नरोत्तम सेखसरिया हे एक महत्वाचे उद्योजक आहेत. अम्बुजा सिमेंट उद्योगाची त्यांनी स्थापना केली. या कंपनीला देशातील आघाडीची सिमेंट कंपनी बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. २००२ मध्ये त्यांनी विविध प्रकारच्या सामाजिक कार्यासाठी नरोत्तम सेखसरिया फाऊंडेशनची स्थापना केली. त्यामार्फत देशातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या परदेशातील आणि देशातील उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य केले जाते.
अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंग्लंड यांसारख्या परदेशातील आणि देशातील नामवंत विद्यापीठांमध्ये सामाजिक शास्त्रे, उपयोजित शास्त्रे, विज्ञान, विधी, स्थापत्यकला, व्यवस्थापन या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी आणि ‘पीएच.डी.’ अभ्यासक्रम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मिळू शकते.
परदेशातील विद्यापीठांमध्ये स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, बर्कले युनिव्हर्सिटी, व्हिस्कॉन्सिन युनिव्हर्सिटी, एमआयटी, मिनिसोटा युनिव्हर्सिटी, पेन युनिव्हर्सिटी, इलिनॉइस युनिव्हर्सिटी, जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी, हार्वर्ड युनिव्हर्सिटी, मिशिगन युनिव्हर्सिटी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ॲण्ड पोलिटिकल सायन्स, केंब्रिज युनिव्हर्सिटी, नॉर्थ इस्टर्न युनिव्हर्सिटी इत्यादींचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत २० लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य केलं जातं. ते व्याजमुक्त (इंटरेस्ट फ्री लोन) कर्ज स्वरुपातील आहे.
शिष्यवृत्तीसाठीच्या अटी आणि शर्ती
(१) उमेदवार भारतात राहाणारा भारतीय नागरिक असावा/ असावी.
(२) संबंधित उमेदवाराचे वय ३० वर्षांपेक्षा कमी असावे.
(३) विद्यापीठ अनुदान आयोग अथवा शासन मान्यतप्राप्त विद्यापीठ अथवा शैक्षणिक संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असावी.
(४) परदेशातील दर्जेदार विद्यापीठामध्ये पदव्युत्तर पदवी/ पीएचडीसाठी प्रवेश मिळालेला असावा.
(५) ज्या विद्यार्थिनी/विद्यार्थ्यांनी परदेशातील अभ्यासक्रमासाठी अर्ज केला असेल व ज्यांना अद्याप संबंधित विद्यापीठ/ शैक्षणिक संस्थेचे स्वीकृती/ प्रवेश प्रत्र आले नसेल, असेही उमेदवार शिष्यवृत्तीसाठी अर्ज करु शकतात. मात्र संबंधित विद्यापीठात प्रवेश मिळाल्याचं अंतिम स्वीकृतीपत्र आल्यावरच त्यांचा शिष्यवृत्तीसाठी विचार केला जातो.
या शिष्यवृत्तीसाठी केवळ ऑनलाइन पध्दतीनेच अर्ज करता येतो. यासाठी संस्थेच्या संकेतस्थळावर जाऊन ‘लॉगइन’ करावं लागतं.
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करुन त्यातील निवडक विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावलं जातं.
अर्जाबरोबर जोडावयाची कागदपत्रे
(१) पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व वर्षांच्या स्वाक्षरांकित गुणपत्रिका,
(२) गेट-ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग, कॅट-कॉमन ॲडमिशन टेस्ट, जीआरई- ग्रॅज्युएट रिकॉर्ड एक्झामिनेशन, जीमॅट- ग्रॅज्युएट मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट अशा पात्रता परीक्षांच्या स्वाक्षरांकित प्रती,
(३) स्वीकृतीपत्र आणि शैक्षणिक शुल्काची माहिती,
(४) प्रतिष्ठित व्यक्तींचे संदर्भ पत्र,
(५) (असल्यास)- इतर दुसरी शिष्यवृत्ती, अर्थसहाय्य, शुल्कातून सूट आदींची कागदपत्रे,
(६) सर्वाधिक नजिकच्या काळातील पालकांचे आयकर प्रमाणपत्र,
(७) नजिकच्या काळातील स्वाक्षरांकित पासपोर्ट आकाराचे छायाचित्र.
या अर्थसहाय्याच्या माध्यमातून आतापावेतो ३०० हून अधिक विद्यार्थिनी/ विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेणं शक्य झालं आहे. या सर्वांची उत्तम संपर्कसाखळी या फाऊंडेशनने तयार केली असून त्यांच्यामार्फत नव्या शिष्यवृत्तीधारकांना करिअरसंदर्भात सर्वतोपरी सहाय्य केले जाते. जुने शिष्यवृत्तीधारक नव्यांसाठी मार्गदर्शक (मेंटॉर) म्हणून भूमिका बजावतात.
संपर्क – नरोत्तम शेखसारिया फांऊडेशन,पहिला माळा, निर्मल बिल्डिंग ,नरिमन पाईंट, मुंबई- 400021,
संकेतस्थळ – pg.nsfoundation.co.in