आज राष्ट्रीय डॉक्टर दिन आहे. डॉक्टरांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आज अनेक शाखांमधील तज्ज्ञ डॉक्टर अविरत सेवा बजावत आहेत. परंतु, १८ व्या शतकात एखाद्या १८ वर्षीय मुलीने परदेशात जाऊन वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेणे, ते यशस्वीरीत्या पूर्ण करून भारतात येणे हा प्रवास साधा-सोपा नव्हता. डॉ. आनंदीबाई जोशी यांनी तो यशस्वीपणे पूर्ण केला आणि भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मानही त्यांना मिळाला. आनंदीबाई जोशी कोण होत्या आणि त्यांचा संघर्षमय जीवनप्रवास नक्कीच प्रेरणादायक ठरेल…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. आनंदीबाई जोशी डॉक्टर का झाल्या ?

आनंदीबाई जोशी यांचा जन्म दि. ३१ मार्च, १८६५ रोजी पुण्यात त्यांच्या आजोळी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. जुन्या कल्याण परिसरातील पारनाका येथे राहणाऱ्या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांच्या त्या ज्येष्ठ कन्या होत्या. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह वयाने त्यांच्याहून २० वर्षांनी मोठे असणाऱ्या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. गोपाळराव जोशी हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील रहिवासी होते. लग्नानंतर गोपाळरावांनी आपल्या पत्‍नीचे यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले. वयाच्या चौदाव्या वर्षी आनंदीबाईंना अपत्यप्राप्तीही झाली. परंतु, वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे ते लहान बाळ फक्त दहा दिवस जगले. आनंदीबाईंच्या जीवनात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. हे ओढवलेले संकट त्यांना सकारात्मक प्रेरणा देणारे ठरले. या घटनेनंतर त्यांनी डॉक्टर होण्याचे ठरविले.
गोपाळराव कल्याणला पोस्ट ऑफिसमध्ये कारकून होते. नंतर त्यांची अलिबाग येथे आणि नंतर कोलकाता येथे बदली झाली. ते पुरोगामी विचारसरणीचे होते. १८ व्या शतकातही त्यांचा महिला शिक्षणाला पाठिंबा होता. आपल्या पत्नीने चूल-मूल यामध्ये न अडकता शिक्षण घ्यावे, असा त्यांचा अट्टाहास होता. ते स्वतः लोकहितवादींची शतपत्रे वाचत. आपल्या पत्‍नीला शिक्षणात रस आहे, हे गोपाळरावांनी कळल्यावर लोकहितवादींच्या शतपत्रांमुळे ते प्रेरित झाले आणि आपल्या पत्‍नीस इंग्रजी शिकविण्याचे ठरविले. त्यासाठी मिशनरींच्या शाळेमध्ये त्यांनी आनंदीबाईंना प्रवेश मिळवून दिला.
सुरुवातीला तत्कालीन भारतीय समाजाकडून आनंदीबाईंच्या डाॅक्टर होण्याला खूप विरोध झाला. त्यावेळी आनंदीबाईंनी कोलकाता येथे एक भाषण केले. तेव्हा त्यांनी भारतामध्ये महिला डॉक्टरांची किती आवश्यकता आहे, याचे प्रतिपादन केले. त्या म्हणाल्या, मला डॉक्टर होण्यासाठी धर्मांतर करण्याची काही गरज नाही. मी माझा हिंदू धर्म व संस्कृती यांचा कदापि त्याग करणार नाही. मला माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात येऊन महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे आहे. आनंदीबाईंचे हे भाषण लोकांना खूप आवडले. त्यामुळे त्यांना होणारा विरोध तर कमी झालाच पण त्यांना या कार्यात हातभार म्हणून सबंध भारतातून आर्थिक मदत जमा झाली. भारताचे तत्कालीन व्हाइसरॉय यांनीसुद्धा २०० रुपयांचा निधी

जाहीर केला.

हेही वाचा : विश्लेषण : विठ्ठल देवतेचे मूळ स्वरूप कोणते ? काय आहे विठ्ठल देवतेचा इतिहास

डॉ. आनंदीबाईंचे वैद्यकीय शिक्षण

आनंदीबाईंच्या वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत गोपाळरावांनी अमेरिकेत काही पत्रव्यवहार केला. परंतु, हे शिक्षण घेण्यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची अट होती आणि धर्मांतर करणे तर यांना मान्य नव्हते. पुढे गोपाळरावांच्या चिकाटीमुळे आनंदीबाईंना ख्रिस्ती धर्म न स्वीकारता १८८३मध्ये, वयाच्या एकोणिसाव्या वर्षी विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनियामध्ये प्रवेश मिळाला. तेथे गेल्यानंतर अमेरिकेतील नवीन वातावरण आणि प्रवासातील दगदग यामुळे आनंदीबाईंची प्रकृती खूप ढासळली होती. शाकाहारी अन्नही त्यांना पुरेसे मिळत नव्हते. कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर वैद्यकीय अभ्यासक्रम दोनच वर्षांत पूर्ण करून मार्च इ.स. १८८६ मध्ये आनंदीबाईनी एम.डी.ची पदवी मिळवली. एम.डी.साठी त्यांनी ‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र’ या विषयावर प्रबंध लिहिला. एम.डी. झाल्यावर व्हिक्टोरिया राणीने त्यांचे अभिनंदनही केले होते. हा प्रवास करताना त्यांना गोपाळरावांनी खंबीरपणे त्यांना पाठिंबा होता. त्यांच्या पदवीदान समारंभाला गोपाळराव स्वतः अमेरिकेत गेले होते. पंडिता रमाबाई यांनीसुद्धा या समारंभात भाग घेतला. एम.डी. झाल्यावर भारतात आल्यावर त्यांना कोल्हापूरमधील अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमधील स्त्री-कक्षाचा ताबा देण्यात आला.

हेही वाचा : जुलै आणि ऑगस्ट हे सलग ३१ दिवसांचे महिने का येतात ? पूर्वी का होती १० महिन्यांची दिनदर्शिका…

भारतीय इतिहासातील डॉ. आनंदीबाई यांचे महत्त्व

डॉ. आनंदीबाई जोशी या भारतातील प्रथम महिला डॉक्टर ठरल्या. १८८३ मध्ये डॉक्टर झाल्यावर त्यांनी भारतात येऊन वैद्यकीय सेवा देण्यास सुरुवात केली. परंतु, त्यांना क्षयरोग झाला आणि २६ फेब्रुवारी, १८८७ रोजी त्यांचा पुण्यात मृत्यू झाला.
केवळ २१ वर्षाच्या जीवनयात्रेत आनंदीबाईंनी भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणादायी जीवनादर्श उभा केला. दुदैवाने आनंदीबाईंच्या बुद्धिमत्तेचा आणि ज्ञानाचा फायदा जनतेला होऊ शकला नाही. मात्र ‘चूल आणि मूल’ म्हणजेच आयुष्य असे समजणाऱ्या महिलांना त्या काळात आनंदीबाई जोशी यांनी आदर्श व मानदंड घालून दिला. एकीकडे सावित्रीबाई व ज्योतिबा फुले स्त्रीशिक्षणासाठी प्रयत्न करत असतानाच आनंदी-गोपाळ हे जोडपे आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी झटत होते. जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही मोठे काम अशक्य नाही हे या जोडप्याने समाजाला सिद्ध करून दाखवले.

आज राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या निमित्ताने पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे कार्य सर्वांनाच प्रेरणादायी आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National doctors day who was the first indian woman doctor vvk
Show comments