National Girl Child Day 24th January : गेल्या काही वर्षांत महिलांविरोधात असलेल्या अनेक वाईट रुढी-परंपरा संपुष्टात आल्या आहेत. परंतु, तरीही समाजात जगताान महिलांना त्यांचे अनेक अधिकार आणि हक्क नाकारले जातात. याची सुरुवात मुलींच्या लहान असल्यापासूनच होते. देशातील कित्येक भागत आजही शिक्षण आणि आरोग्य सेवा या मुलभूत गोष्टींपासूनही मुलींना वंचित ठेवलं जातं. मुलींना आजही चूल आणि मूलच्या पलिकडे जाता येत नाही. सुशिक्षित समाजात मुलींप्रती असलेली विषमता दूर करता यावी, मुलींना त्याच्या अधिकार आणि हक्कांविषयी माहिती मिळावी, याकरता दरवर्षी २४ जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो.
राष्ट्रीय बालिका दिनाची सुरुवात केव्हापासून झाली?
मुलींना समाजात भेडासवणाऱ्या समस्यांना वाचा फोडण्याकरता, त्यावर चर्चा करण्याकरता २००८ मध्ये देशाच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाने राष्ट्रीय बालिका दिन सुरू केला होता. यादिवशी विविध शाळा-महाविद्यालय, संस्थांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. तसंच, यादिवशी मुलींच्या संदर्भाने विविध जनजागृती केली जाते. भारत सरकारने प्रामुख्याने उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, बिहार आणि दिल्ली या राज्यांत हा दिन सुरू केला होता.
बेटी बचाओ, बेटी पढाओ (BBBP) योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी २४ जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. स्त्री-पुरुष असमानतेने ग्रासलेल्या समाजात मुलींना भेडसावणाऱ्या आव्हानांविरोधात आवाज उठवण्याकरता हा दिन साजरा केला जातो. शिक्षण आणि आरोग्यसेवेत समान संधी मिळणे, बालविवाह आणि लिंग-आधारित हिंसा यासारख्या समस्यांचं निराकरण करण्याच्या उद्दीष्ट्यासाठी हा दिन साजरा केला जातो.
राष्ट्रीय बालिका दिनाचे मुख्य उद्दिष्ट्य काय?
मुलींना समान संधी मिळणे आवश्यक
प्रत्येक मुलीला शिक्षण, आरोग्यसेवा आणि इतर आवश्यक गोष्टींचा अधिकार आहे. त्यामुळे या दिनी या अधिकारांची समाजात जनजागृती केली जाते. त्यामुळे मुलींचे अधिकार समाजात अधोरेखित करण्यात मदत होते.
मुलींचे सक्षमीकरण समाजाला सक्षम बनवते
जेव्हा मुली शिक्षित आणि सक्षम होतात तेव्हा त्या क्रांतीकारक बनतात. त्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीमध्ये योगदान देतात, गरिबीचे चक्र तोडतात आणि अधिक न्याय्य भविष्यासाठी मार्ग मोकळा करतात.
हेही वाचा >> ‘राष्ट्रीय युवक पुरस्कारा’नं गौरव झालेली विधी पळसापुरे
आव्हाने आहेत, पण आशाही आहेत
मुलींचे शिक्षण आणि आरोग्यसेवा यांसारख्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली असली तरी आव्हाने अजूनही आहेत. राष्ट्रीय बालिका दिन ही आव्हाने स्वीकारण्यासाठी आणि उपाय शोधण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करतो.
राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम, चर्चासत्रे आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातात. शाळा, महाविद्यालये आणि सामुदायिक संस्था अनेकदा मुलींचे हक्क, लैंगिक समानतेचे महत्त्व आणि मुलींवरील भेदभाव आणि हिंसा निर्मूलनाची गरज याविषयी लोकांना शिक्षित करण्यासाठी उपक्रम राबवतात.