‘नायका’ हे ई-कॉमर्स क्षेत्रातील विश्वसनीय आणि प्रसिद्ध नाव आहे. या ‘नायका’ची स्थापना पन्नास वर्षीय एका आईने केली आहे आणि तिला तिच्या मुलीने यासाठी पूर्ण पाठिंबा दिला. आज त्यांची संपत्ती २०,७०० कोटींच्या घरात आहेत. जाणून घेऊया ‘नायका’च्या स्थापनेबद्दल…
अद्वैता नायर ही भारतातील सर्वात तरुण आणि प्रतिभावान व्यावसायिकांपैकी एक आहे. २०१२ पर्यंत ती आणि तिची आई फाल्गुनी नायर या स्वतःचा व्यवसाय सुरू करतील आणि त्याची उलाढाल कोट्यवधी असेल, असे कोणालाच वाटले नव्हते. फाल्गुनी नायर या २०२३ वर्षातील सर्वात श्रीमंत स्वनिर्मित व्यावसायिक महिला आहेत. परंतु, हे सर्व घडण्यासाठी २०१२ हे वर्ष त्यांच्यासाठी ‘टर्निंग पॉईंट’ ठरले.
कोण आहे अद्वैता नायर…
अद्वैता नायर हिचे शिक्षण मुंबई येथील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कुलमधून पूर्ण झाले. त्यानंतर येल विद्यापीठातून अप्लाइड मॅथेमॅटिक्समध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स (बीए) पूर्ण केले. नंतर तिने हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि एमबीए पूर्ण केले आहे. ती युनायटेड स्टेट्समधील बेन आणि कंपनीसाठी काम करत होती ती Nykaa Fashion मध्ये फॅशन विभाग सांभाळते आहे. अद्वैता नायर हिचा जुळा भाऊ अंचित नायर हादेखील नायकामध्ये कार्यरत आहे.
हेही वाचा : नागपंचमीला भावासाठी उपवास का करतात ? सापांची उत्पत्ती कशी झाली ? काय आहेत आख्यायिका…
कथा ‘नायका’ची…
‘नायका’ची स्थापना होण्यास मुख्य कारण अद्वैता नायर यांच्या आईची व्यवसाय करण्याची इच्छा हे ठरले. फाल्गुनी नायर यांना वयाच्या पन्नाशीला असताना स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, असे वाटत होते. त्यांनी ही इच्छा अद्वैताला सांगितली. अद्वैता अमेरिकेमधील बेन कंपनीमध्ये काम करत होती. आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती अमेरिकेमधील मोठ्या पगाराची नोकरी सोडून मुंबईमध्ये आली. फाल्गुनी नायर यांनी ‘नायका’ या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची स्थापना केली. अद्वैता याची सह-संस्थापक बनली. युअर ब्युटी अवर पॅशन’ हे त्यांनी आपले ब्रीद ठरवले. सौंदर्य, वस्त्रे, सेल्फ केअर, फॅशन अशा विविध विभागांमध्ये ‘नायका’ने आपला ठसा उमटवला आहे. २०२३ पर्यंत, फाल्गुनी नायर या भारतातील सर्वात श्रीमंत स्वनिर्मित व्यावसायिक महिला आहेत. ‘नायका’ कंपनी कोट्यवधी डॉलर्सची उलाढाल करत आहे. फाल्गुनी नायर यांची संपत्ती २०,७०० कोटी आहे.
हेही वाचा : काही घरांमध्ये झाले गणपतीचे आगमन! टिळक पंचांगानुसार सुरू झाला गणेशोत्सव, जाणून घ्या टिळक पंचांगाविषयी…
अद्वैता हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, तिचा शिक्षणाचा गणित हा विषय पूर्ण उद्योग उभारताना अत्यंत महत्त्वाचा ठरला. १० सदस्यांच्या टीमपासून ‘नायका’ची सुरूवात झालेली. आता ३००० हून अधिक लोक या कंपनीचे सदस्य आहेत. हा स्टार्ट-अप होता. याची पूर्ण मालकी फाल्गुनी नायर आणि अद्वैता त्यांची होती. त्यामुळे आई-मुलीने उभा केलेला ‘नायका’ सारखा मोठा उद्योग सगळ्यांसाठी प्रेरणादायक ठरेल.
“मी आमची सुरुवातीची वर्षे निधी उभारणी, विपणन, ग्राहक सेवा आणि भौतिक किरकोळ विक्रीच्या गुंतागुंतींना सामोरे जाण्यात घालवली. आज ३५ हून अधिक मुख्य स्टोअर्स आहेत. मी ई-कॉमर्स व्यवसायाच्या ऑपरेशन्स, तंत्रज्ञान आणि विपणनासाठी मुख्य जबाबदारी घेतली. नवीन तंत्रज्ञान आणि विपणन यांची सांगड घालत ही कंपनी उभारली, ” असे ती मुलाखतीत पुढे म्हणाली.
तिची आई फाल्गुनी नायर या कंपनीच्या कार्यकारी अध्यक्षा, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्या वयाच्या ५०व्या वर्षी एक व्यावसायिक महिला झाल्या. फाल्गुनी नायर यांनी आयआयएम अहमदाबादमधून एमबीए केले आहे. त्या २० वर्षांहून अधिक काळ गुंतवणूक बँकिंग क्षेत्रात काम करत होत्या. त्यांनी कोटक महिंद्रा कॅपिटलच्या एमडी पदावर असताना राजीनामा दिला. कंपनी उघडल्याच्या पहिल्या वर्षातच त्यांची एकूण संपत्ती ३४५ टक्क्यांनी वाढली. कंपनीचे मार्केट कॅपिटल ३७,६६४ कोटी रुपये आहे.
सर्वांना माहीत असणारा ‘नायका’ प्लॅटफॉर्म एका आई आणि मुलीने स्थापन केलेला आहे. केवळ ११ वर्षांत त्यांची कोट्यवधींची उलाढाल झाली आहे.