बाळंतपण हा बाईचा पुनर्जन्म असतो असं म्हटलं जातं. गर्भावस्थेचे नऊ महिने आणि त्यानंतरचे निदान काही महिने तरी स्त्री एका संक्रमणावस्थेतून जात असते. हे बदल शारीरिक आणि त्याचबरोबर मानसिकही असतात आणि त्यामुळे तिचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. पूर्वी आपल्या घरांतल्या आज्या, पणज्या अगदी डोळ्यांत तेल घालून बाळ आणि विशेषत: बाळंतिणीकडे लक्ष द्यायच्या. बाळंतपणाच्या काळात योग्य आणि पुरेशी काळजी घेतली गेली नाही तर नंतर आयुष्यभर त्या स्त्रीला वेगवेगळ्या प्रकारची दुखणी मागे लागू शकतात. त्यामुळे या काळात नवमातेला पुरेशी विश्रांती देणं, योग्य आहार देणं, तिची काळजी घेणं महत्त्वाचं ठरतं. पण याकडे सध्या तरी अजिबात गांभीर्यानं बघितलं जात नाहीये, असं एक सर्वेक्षण समोर आलंय. ‘लॅन्सेंट’ नियतकालिकाच्या या अहवालास ‘जागतिक आरोग्य संघटने’नंही प्रसिद्धी दिली आहे. जगातील जवळपास ४ कोटी स्त्रियांना बाळंतपणानंतर दीर्घकालीन आजार भेडसावतात, असं या अहवालातून स्पष्ट झालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केवळ बाळंतपणातील काळजी इतक्या गोष्टीपुरतंच हे संशोधन सीमित नाही. तर अधिक चांगल्या आणि व्यापक आरोग्य व्यवस्थेची गरज असल्याचा इशाराही या अभ्यासात सहभागी झालेल्यांनी दिला आहे. गर्भावस्था आणि बाळंतपणात स्त्रीची चांगली काळजी घेणं हा तिला होऊ शकणारे आजार रोखण्यासाठीचा उत्तम प्रतिबंधात्मक उपाय आहे, असं या अभ्यासात म्हटलंय.

खरंतर बाळाचा जन्म ही सहसा स्त्रीच्या आयुष्यातील अतिशय आनंदाची घटना असते. पण त्या वेळेस आरोग्य सांभाळलं गेलं नाही, तर त्याचा तिच्या रोजच्या आयुष्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. तिचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडू शकतं. पण तरीही त्याकडे गांभीर्यानं बघितलं जात नाहीये, अशी खंत जागतिक आरोग्य संघटनेच्या लैंगिक व प्रजननात्मक आरोग्य व संशोधन विभागाचे संचालक डॉ. पास्कल एलोटी यांनी व्यक्त केली. ‘फक्त आई होण्याच्या काळापुरतंच नाहीतर संपूर्ण आयुष्यभरच स्त्रियांना चांगल्या आरोग्य व्यवस्थेची गरज असते. त्यांच्यासाठी अशी व्यवस्था आवश्यक आहे, जिथे त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या जातील आणि त्यांच्या गरजा पूर्ण होतील,’ असं मत त्यांनी मांडलं आहे. बाईच्या आरोग्यावर परिणाम करणारे अनेक घटक आहेत. तिची परिस्थिती, सभोवतालचं सामाजिक, राजकीय वातावरण, आर्थिक व्यवस्था, तिला मिळणारं पोषक अन्न, योग्य औषधं, मानसिक ताणात आधार देणाऱ्या व्यक्ती, असे अनेक घटक उत्तम आरोग्यदायी गर्भावस्थेसाठी कारणीभूत ठरतात, असं मत तज्ञांनी मांडलं आहे.

हेही वाचा… नातेसंबंध: तिच्या पगारावर अधिकार कुणाचा?

बाळंतपणानंतर जवळपास ३५ टक्के स्त्रियांना शरीरसंबंधांच्या वेळेस वेदना (dyspareunia) होतात असं आकडेवारी सांगते. तर पाठीच्या खालच्या भागात दुखण्याचा त्रास होत असल्याची ३२ टक्के स्त्रियांची तक्रार आहे. बाळंतपणानंतर मूत्रविसर्जनावर ताबा न राहण्याबाबत ८ ते ३१ टक्के स्त्रियांना त्रास होतो. तर ९ ते २४ टक्के महिला सतत चिंताग्रस्त असतात, असं या अहवालातून समोर आलंय. त्याशिवाय बाळाला जन्म देण्याबद्दलची भीतीही अनेक स्त्रियांना सतावते.

आर्थिक परिस्थिती आणि स्त्रियांचं आरोग्य हे एकमेकांशी जोडलेलं आहे. आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्या गर्भवती स्त्रियांची पुरेशी काळजी घेतली जात नाही. योग्य तो आहार, विश्रांती मिळत नाही. आपल्याकडेच किती तरी मजूर स्त्रिया गर्भारपणातही अवजड कामं करत असतात, त्या तुलनेनं त्यांना पुरेसा पोषक आहार मिळत नाही. मध्यमवर्गीय घरांतील स्त्रियाही बाळंतपणानंतर पुरेशी विश्रांती न घेता लगेच कामाला, नोकरीला लागतात. मुंबईसारख्या शहरांत रोजची प्रवासाची दगदग, प्रवासासाठी लागणारा वेळ, खाण्यापिण्याची आबाळ या सगळ्याचा नवमातांच्या आरोग्यावर परिणाम होतो. चांगली अर्थव्यवस्था, चांगलं उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ही परिस्थिती थोडीशी बरी आहे.

मात्र गरीब देशांमध्ये बाळंतपणानंतर स्त्रियांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणं अगदी सर्रास आहे. आईचं आरोग्य चांगलं असेल तरच जन्माला येणारं बाळही शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी होऊ शकतं. स्त्रियांच्या आरोग्यासाठी विविध योजना राबवून त्या अंमलात आणणं, वंचित स्त्रियांपर्यंत त्या पोहोचवणं, त्याचा प्रत्यक्ष लाभ देणं, या शासकीय-प्रशासकीय स्तरावरील उपाययोजना आहेतच. पण त्याशिवाय स्त्रीच्या आरोग्याविषयी काळजी घेणं महत्त्वाचं आहे हे लहानपणापासून मुलांना घरांमधूनच शिकवलं गेलं पाहिजे. समाजमाध्यमांसारख्या प्रभावी व्यासपीठांचा वापर करुन स्त्रीच्या आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करणंही गरजेचं आहे. तरच यापुढच्या काळात बाळंतपणानंतरच्या आरोग्याच्या समस्या भेडसावणाऱ्या स्त्रियांची संख्या कमी होऊ शकेल.

lokwomen.online@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nearly 4 crore women in the world have chronic diseases according to lancet report dvr
Show comments