‘बायको नामधारी, नवरा कारभारी’ ही म्हण लोकप्रतिनिधी स्त्रियांबद्दल हेटाळणीनं वापरली जाते. ग्रामीण भागातील पदांबाबत- विशेषत: महिला सरपंचपदाबाबत त्याचा आजवर अनेकदा उल्लेख झालेला दिसतो. काही ठिकाणी तो खरा असल्याचंही आढळलं आहे. पण जसजशा स्त्रिया सजग होऊ लागल्या, आपली मत मांडण्याचं धाडस दाखवू लागल्या, जिद्दीनं शिक्षण घेऊ लागल्या, तसे याला अपवादही निर्माण झाले. असंच एक सकारात्मक उदाहरण आहे एका ‘हॉकीवाल्या’ सरपंचबाईंचं! या सरपंच बाईंनी त्यांच्या गावात अनेक सुधारणा केल्याच, पण त्यांनी आपल्या गावाची राष्ट्रीय पातळीवर दखल घ्यायला भाग पाडलं. राजस्थानमधील झुनझुनू जिल्ह्यातील लांबी आहिर गावातल्या नीरु यादव या त्या सरपंच. त्यांनी गावात घडवलेली क्रीडा क्रांती जाणून घ्यावी अशीच.
नीरु यादव यांनी आपल्या गावातील मुलींना हॉकी खेळायला प्रोत्साहन दिलं, त्यांची एक टीम तयार केली. आता या टीममधल्या काहीजणी जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय खेळल्या आहेत. राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची स्वप्नं पाहात आहेत. मूळच्या हरियाणाच्या असलेल्या नीरु यादव यांना खरंतर हॉकीची अगदी लहानपणापासून आवड होती. त्यांना त्यातच करिअरही करायचं होतं. पण त्यांच्या कुटुंबानं शिक्षणावर भर देण्याचा आग्रह केला. त्यामुळे देशासाठी हॉकी खेळण्याचं त्यांचं स्वप्न मागे पडलं.
हेही वाचा… आत्या, मामा, काका, ही नाती गायब होतील का?
नीरु यादव या ऑक्टोबर २०२० मध्ये गावच्या पहिल्या महिला सरपंच म्हणून निवडून आल्या. त्यानंतर त्यांनी गावात अन्य सुधारणा करण्याबरोबरच मुलींना खेळात सक्षम करण्याचा निश्चय केला. या मुलींना खेळू द्यावं यासाठी नीरु यांनी त्यांच्या पालकांना तयार केलं. पण मुलींना प्रशिक्षण द्यायचं तर गावात चांगलं मैदान नव्हतं. मग गावाजवळ असलेल्या एका खासगी विद्यापीठाच्या मैदानावर त्यांचा सराव सुरु झाला. मुलींच्या प्रशिक्षकांना देण्यासाठी नीरु यादव यांनी स्वत:च्या पगारातूनही पैसे दिले. अथक प्रयत्नांनंतर गावातल्या मुलींना खेळण्यासाठी गावातच चांगलं मैदान मिळालं. सध्या या मैदानावर २०-२५ मुली नियमितपणे हॉकीचा सराव करतात. त्यांच्यापैकी काहीजणी जिल्हा, राज्य स्तरावरही खेळायला गेल्या आहेत. आता या मुलींची राष्ट्रीय स्तरावर निवड व्हावी यादृष्टीने त्यांच्याकडून सराव करुन घेतला जातो. त्यांना सर्वोत्तम प्रशिक्षण मिळावं यासाठी नीरु यादव जीवाचं रान करताहेत.
हेही वाचा… गच्चीवरची बाग: घरच्या घरी ओला मसाला
नीरु यादव यांनी गणितात एमएस्सी पदवी घेतली आहे. त्याचबरोबर बी.एड आणि एम.एड केलं आहे. आता त्या पीएचडीसाठी तयारी करत आहेत. त्यामुळे गावातल्या मुलांनी उच्चशिक्षण घेण्याचाही त्यांचा आग्रह असतो. त्यांच्या गावात सरपंचपद महिलांसाठी आरक्षित झालं, तेव्हा नीरु गृहिणी म्हणून आयुष्य जगत होत्या. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ सामाजिक कार्य करण्याच्या प्रबळ इच्छेनं त्यांनी निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर त्यांनी गावातील शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी विविध योजना राबवल्या. अनेक महिलांना रोजगार मिळवून दिला, आर्थिक सहाय्य केलं. गावातून प्लॅस्टिक हद्दपार करण्यासाठी त्यांनी ‘भांड्यांची बँक’ सुरु केली आणि गावात काही कार्यक्रम असेल तर प्लॅस्टिकच्या ‘यूज अँड थ्रो’ ताटल्या, ग्लास वापरण्यापेक्षा भांड्यांच्या बँकेंतून स्टीलची भांडी उपलब्ध करुन दिली. अनेक सरकारी योजना गावात पोहोचवल्या.
हेही वाचा… समुपदेशन: शरीरसंबंधांचं वय असतं का?
महिला सरपंच म्हणून त्यांच्यापुढे अनेक आव्हानं होती. सुरुवातीला त्यांच्या कामाकडे फारसं गांभीर्याने पाहिलं जायचं नाही.त्यात हॉकी खेळायला मुलींना प्रोत्साहन देणं म्हणजे अतीच होतंय, असं वाटणारे अनेकजण होते. पण नीरु यांनी त्यांच्या कामातून प्रत्येकाला उत्तर दिलं. आरक्षणातून महिला सरपंच निवडून आली तरी ती फक्त नामधारी नसते, हे त्यांनी दाखवून दिलं. आपल्या कामातून विश्वास निर्माण केला.
आपल्या गावात रस्ते, पाणी हे तर हवंच, पण गावातल्या मुलांना स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करण्यासाठी एखादी चांगली अभ्यासिका, ग्रंथालय असावं असंही त्यांना वाटतं. गावात चांगल्या सुविधा असलेलं उत्तम स्टेडियम बांधण्याचं त्यांचं स्वप्न आहे. गावातल्या मुलींनी हॉकी खेळणं सोडू नये यासाठी त्या अविरत प्रयत्न करत आहेत. कारण या मुली फक्त खेळ खेळत नाहीत, तर अनेक जुन्या चौकटी मोडून काहीतरी नवीन करु पाहत आहेत, त्यांचं अस्तित्व निर्माण करण्याची संधी या निमित्तानं त्यांना मिळतेय, हे या ‘हॉकीवाल्या सरपंच’बाईंना चांगलंच माहिती आहे!
lokwomen.online@gmail.com