जिद्द आणि चिकाटी असेल तर ठरवलेलं उद्दिष्ट साध्य करता येतंच. मग कितीही अडचणी आल्या तरीही त्यावर मात करता येते. अशाच प्रकारे सगळ्या अडचणींवर मात करून मध्य प्रदेशामधील नेहा मुजावदियाने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. मंदसौर जिल्ह्यातील मेलखेडा गावातील नेहा ही पहिली उच्चशिक्षित मुलगी आहे. तिचं फक्त शिक्षण घेण्यापुरती स्वप्न मर्यादित नव्हतं. तिला सामाजिक बंधनातून मुक्त होऊन एक दिवस स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता. पण खेडेगावातील एका तरुणीसाठी स्वतःचा व्यवसाय सुरू करून व्यावसायिका होणं हे एका कल्पनेप्रमाणे असतं. हे स्वप्न प्रत्यक्षात येण्याची शाश्वती फार कमी असते. पण नेहाने खेडेगावात राहून हे स्वप्न स्वःबळावर पूर्ण केलं. अनेक अडचणींचा सामना करून नेहाने फक्त उच्चशिक्षण घेतलं नाहीतर एक यशस्वी ‘ट्यूटर केबिन’ नावाचा स्टार्टअप सुरू केला; जे आज अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. नेहाचा हा स्टार्टअप नेमका काय आहे? तिने कसा उभा केला? याविषयी जाणून घेऊया…
मेलखेडा गावात सुरुवातीला संसाधनांच्या कमतरतेमुळे आणि निरक्षरतेमुळे विद्यार्थांना विशेषत: मुलींना क्वचितच पदवी शिक्षण घेण्याची परवानगी दिली जात असे. उच्च शिक्षणाचा तर विचारच सोडा. पण अशाच परिस्थितही उज्जैनच्या विक्रम विद्यापीठातून नेहाने बीए (अर्थशास्त्र) पूर्ण केलं. त्यानंतर तिला एमबीएची पदवी घेण्यासाठी इंदौरला जायचं होतं. पण आई-वडिलांनी थेट नकार दिला. कारण गावात शिक्षणाला जास्त प्राधान्य दिलं जात नव्हतं. आता गोष्टी बदलत असल्यातरी त्यावेळेस नेहाला खूप संघर्ष करावा लागला. नेहाने हार मानली नाही. तिने इंदौरमध्ये शिक्षणासाठी जाण्याकरिता पालकांची कशीबशी समजूत काढली. पण यामुळे नेहाच्या पालकांना गावातल्या लोकांचा सामना करावा लागला. मुलीला शहरात शिक्षणासाठी एकटीला पाठवून तिच्या लग्नाची पर्वा न केल्याने लोक टीका करून लागले होते. पण नेहाच्या आई-वडिलांनी याकडे जास्त लक्ष दिलं नाही. तसंच त्यानंतर नेहाने मागे वळून पाहिलं नाही.
शिक्षणानिमित्ताने नेहाला मोठ्या शहरात राहण्याची संधी मिळाली. तिला शक्य तितकं ज्ञान आणि अनुभव घ्यायचा होता. मात्र हे सर्व तिच्यासाठी आर्थिकदृष्ट्या कठीण होतं. यामुळे पालकांवर याचं ओझ होऊ नये म्हणून नेहाने प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन शिकवायला सुरुवात केली. यातून मिळणाऱ्या पैशांमध्ये तिने स्वतःचा खर्च भागवत बचतही केली. सकाळी लवकर उठून एमबीएच्या क्लासला जायचं. त्यानंतर घरोघरी शिकवायला जायचं. मग घरातली कामं सांभळून अभ्यास करायचा, अशी दिनचर्या नेहाची सुरू झाली. कधीकधी नेहाने दिवसांतून १७ तास काम केलं आहे. यादरम्यान तिला एक गोष्ट समजली, ती म्हणजे अधिकचे पैसे घेऊन विद्यार्थ्यांना नीट शिकवलं जात नाहीये. त्यामुळे यातच तिने व्यवसाय करण्याचा विचार केला. पण मास्टर्स पूर्ण झाल्यानंतर पालकांनी नेहावर पुन्हा गावी परतण्यासाठी दबाव टाकला. यावेळी नेहाने पालकांकडे आणखी एक वर्षाची मुभा मागितली. कारण तिला स्वतःची ओळख निर्माण करायची होती. त्यानंतर नेहाने जिद्दीने एका वर्षात स्वतःचं एडटेक स्टार्टअप सुरू केलं.
२०१८साली नेहाने ‘ट्यूटर केबिन’ स्टार्टअपची स्थापना केली. गावातल्या मुलांच्या स्किल डेव्हलपमेंट, क्वालिटी एज्युकेशनबरोबर क्रिएटिव्हिटीला वाव देण्यासाठी नेहाने ‘ट्यूटर केबिन’ सुरू केलं. यामध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन स्तरावरील सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक आणि वर्ग स्वरुपात शिकवलं जातं. आज या प्लॅटफॉर्मवर १ हजार शिक्षक आहेत. एवढंच नव्हे तर दिल्ली, आगरा, मुंबई, भोपाळ अशा काही ठिकाणांपर्यंत आपली ऑनलाइन सुविधा ‘ट्यूटर केबिन’ने पोहोचवली आहे.
हेही वाचा – डॉक्टरकी एक व्रत मानणाऱ्या डॉ. मधुबेन पटेल…
‘ट्यूटर केबिन’ची स्थापना करण्यापूर्वी नेहाने आधी स्वतःचं एक कार्यालय घेतलं. मग वेबसाइट तयार केली. त्यानंतर शिक्षकांना नियुक्त केलं. मुलाखत घेणे आणि प्रशिक्षण देणं सुरू केलं. त्यानंतरच ‘ट्यूटर केबिन’ सुरू केलं. १०-१५ शिक्षकांपासून याची सुरुवात केली. नर्सरी स्तरापासून ते महाविद्यापर्यंतचे वर्ग चालू केले. सुरुवातीला १४ ते १५ विद्यार्थी असणाऱ्या या ‘ट्यूटर केबिन’चे आता लाखो विद्यार्थी आहेत.
‘ट्यूटर केबिन’ म्हणजे नेमकं काय?
‘ट्यूटर केबिन’च्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण प्रदान केलं जात आहे. देशातीलच नव्हे तर जगभरातील मुलांना माफक दरात सर्व प्रकारचे शिक्षण देण्याबरोबरच एक मार्गदर्शक म्हणून नेहा स्वत: तरुणांमधील नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रयत्न करत असते. येथे केवळ नर्सरीपासून ते पदव्युत्तरपर्यंतच नव्हे तर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठीही मार्गदर्शन केलं जातं. येथील शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिलं गेलं आहे. ‘ट्यूटर केबिन’ला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे.