मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यातील अमलताज गावात राहणाऱ्या नेहा ठाकूरचं आज देशभरात कौतुक करण्यात येत आहे. यामागे एक खास कारण आहे ते म्हणजे, १७ वर्षीय नेहाने नौकानयन म्हणजेच सेलिंग क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करून आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक पटकावलं आहे. गेल्यावर्षी अबुधाबीमध्ये झालेल्या आशियाई सेलिंग चॅम्पियनशीपमध्ये तिने कांस्यपदक जिंकलं होतं. अवघ्या १७ व्या वर्षी जागतिक दर्जाच्या स्पर्धांमध्ये आपला दबदबा निर्माण करणारी नेहा ठाकूर कोण आहे? जाणून घेऊया…
हेही वाचा : महिला आरक्षण प्रथम कुठे लागू झाले? महिलांच्या सहभागामुळे काय फरक पडला? जाणून घ्या सविस्तर!
चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भोपाळच्या ‘नॅशनल सेलिंग स्कूल’च्या नेहा ठाकूरने एकूण ३२ गुण मिळवले आणि तिचा नेट स्कोअर २७ होता. सेलिंग (नौकानयन) स्पर्धेत खेळाडूंच्या एकूण धावसंख्येतून त्यांचा सर्वात वाईट स्कोअर वजा करून अंतिम नेट स्कोअर काढला जातो. एकूण ३२ गुणांमधून ५ गुण वजा केल्यावर नेहाचा अंतिम नेट स्कोअर २७ झाला. थायलंडच्या नोपासॉर्न खुनबुंजनने सुवर्णपदकावर, तर नेहा ठाकूरने रौप्य पदावर आपलं नाव कोरलं.
हेही वाचा : पीरियड्सवरून होतेय तुमची ऑफिसमध्ये टिंगल?
अवघ्या १७ वर्षीय नेहा ठाकूरच्या कामगिरीवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यातील अमलताज गावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात तिचा जन्म झाला. नेहाचे वडील मुकेश ठाकूर हे शेतीचा व्यवसाय करतात. तसेच तिची आई रीना ठाकूर ही गृहिणी आहे. नेहाने लहान वयातच भोपाळ येथील ‘नॅशनल सेलिंग स्कूल’मधून आपल्या नौकानयन प्रवासाला सुरुवात केली.
हेही वाचा : पतीने पत्नीच्या नावावर घेतलेली मालमत्ता पत्नीने विकणे क्रुरता नाही
नेहाचा आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी आणि तिची प्रतिभा ओळखून भोपाळच्या नॅशनल सेलिंग स्कूलमध्ये तिला देशपातळीवर खेळण्यासाठी तयार करण्यात आलं. गेल्या काही वर्षांत अनेक लहान-मोठ्या स्पर्धांमध्ये नेहाने लक्षवेधी कामगिरी केली होती. अबुधाबीमध्ये झालेल्या आशियाई सेलिंग चॅम्पियनशीपमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे ती आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरली. अखेर या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी रौप्य पदकावर नाव कोरत नेहाने इतिहास रचला. सध्या तिच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.