रोहित पाटील

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समाजमाध्यमांवर सध्या एका तरूण स्त्रीचा एका देशाच्या संसदेत तडफेनं गाणं गात असतानाचा व्हिडीओ खूप फिरतो आहे. ही तरूणी म्हणजे न्यूझीलंडची २१ वर्षीय खासदार हाना-रावती मायपी-क्लार्क आणि त्या सादर करत असलेलं स्फूर्तीगीत म्हणजे न्यूझीलंडमधील माओरी समाजातल्या लोकांचं ‘हाका’ हे पारंपरिक गीत.

न्यूझीलंड हा एकमेव देश आहे, जिथे महिलांना प्रथमच मतदानाचा हक्क मिळाला. त्याआधी कोणत्याही देशात महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. त्यानंतर तब्बल १०० वर्षांनी जैनी शिप्ले या न्यूझीलंडच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. न्यूझीलंडच्या संसदीय इतिहासात पहिल्यांदाच १७० वर्षांनी हाना-रावती मायपी-क्लार्क यांच्या रूपानं २१ वर्षांच्या तरुण-तडफदार खासदार लाभल्या आहेत. सध्या सोशल मिडियावर हाना-रावती मायपी-क्लार्क यांचा गाणं गातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

हेही वाचा… तुमचं मूल लठ्ठ आहे? या आरोग्यदायी गोष्टी लक्षात घ्या-

हाना माओरी समाजातल्या आहेत. त्यांनी आपल्या माओरी समाजाच्या समस्या मांडताना माओरी समाजाचं पारंपरिक हाका गीत सादर केलं. हे गाणं माओरी भाषेत असल्यानं ते आपल्याला समजत नाही त्यामुळे माहितीच्या अभावातून आपल्याकडे त्यावर काही ‘मीम’सुद्धा तयार झाले आहेत. पण हे गाणं न्यूझीलंडमधील माओरी समाजाचं- जे न्यूझीलंडचे मूळ निवासी आहेत, त्यांचं पारंपरिक गीत आहे. हे गीत आणि त्यासोबत केला जाणारा नृत्यप्रकार काही साधासुधा नाही. हे न्यूझीलंडमधील प्राचीन संस्कृती- माओरी संस्कृतीचं प्राचीन ‘युद्धनृत्य’ आहे. जे पूर्ण ताकदीनं, हातवारे करून, गर्वानं म्हटलं जातं. ते पिढ्यानपिढ्या आजही चालू आहे. न्यूझीलंडच्या रग्बी या राष्ट्रीय खेळाच्या सुरुवातीलासुद्धा न्यूझीलंडचे खेळाडू हे माओरी हाका गीत नृत्यासह सादर करताना दिसतात.

कोण आहेत हाना?

हाना या न्यूझीलंडमधील हंटली शहरातील माओरी समाजातील आहेत. त्या माओरी समाजाच्या हक्कांसाठी आणि अधिकारासाठी लढतात. तसंच माओरी संस्कृती मारामतक्कानुसार शेती करण्यास प्रोत्साहन देतात. त्या न्यूझीलंडच्या मूळ निवासींच्या हक्कांबद्दल वेळोवेळी आवाज उठवत असतात. मागील वर्षी झालेल्या निवडणुकांमध्ये त्या नैना महुता यांचा पराभव करत मोठ्या मताधिक्यानं निवडून आल्या.

‘माओरी हाका’ म्हणजे काय?

माओरी हा एक आदिवासी समाज असून ‘हाका’ हा त्यांचा पारंपारिक नृत्यप्रकार आहे. त्याला ‘वॉर क्राय’सुद्धा म्हटलं जातं. हे गाणं म्हणताना जमिनीवर जोरात पाय आपटला जातो आणि छातीवर हात मारून मोठ्या गर्वानं चेहऱ्यावर विशिष्ट हावभाव आणले जातात. हे गीत राष्ट्रीय खेळांच्या स्पर्धा, लग्नसमारंभ, इतर मनोरंजन कार्यक्रमांतसुद्धा मोठ्या अभिमानानं म्हटलं जातं. कारण या गाण्यामध्ये न्यूझीलंडचा इतिहास, संस्कृती, शूरता आहे असं म्हटलं जातं. जवळपास १०० वर्षांहून अधिक काळ न्यूझीलंडचा राष्ट्रीय खेळ रग्बीमध्ये खेळाच्या सुरुवातीला हे गाणं म्हटलं जातं. अर्थातच या गाण्याला न्यूझीलंडमध्ये राष्ट्रगानाएवढं महत्त्व आहे.

माओरी जमात ही मूळची कुठली आणि न्यूझीलंडमध्ये कशी आली?

माओरी जमात ही मूळची प्रशांत महासागरातील ओशियानिया बेटावरील आदिवासी जमात आहे. या बेटाचा शोध एक कुपेनामक मच्छीमारानं लावला आहे आणि हा शोध कसा लागला याची कथादेखील तितकीच मनोरंजक आहे. माओरी समाजाच्या पौराणिक कथांनुसार कुपे हा एक मच्छीमार होता. तो मासे पकडण्यासाठी जिथे जिथे मासे पकडायला जात असे तिथे ऑक्टोपस मासा यायचा आणि कुपेनं मासे पकडण्यासाठी टाकलेलं अन्न तो बड्या शिताफीनं खाऊन पळायचा. एक दिवस कुपेला संशय आला की हा ऑक्टोपस दुसऱ्या आदिवासी जमातीतील मुख्याधिकारी मुतुरांगीचा आहे. त्यामुळे तो ऑक्टोपसला संपवण्यासाठी समुद्राच्या दिशेनं निघाला. ऑक्टोपसच्या शोधात तो या नवीन ठिकाणी म्हणजे न्यूझीलंड बेटावर पोहोचला व इथे पोहोचल्यावरही त्याचा सामना एका ऑक्टोपसशी झाला. कुपेनं कसाबसा, बहादुरीनं त्या ऑक्टोपसचा खात्मा केला. नंतर बेटावर फिरताना कुपेनं त्याला आवडलेल्या काही ठिकाणांचं माओरी भाषेत नामकरण केलं. अशा प्रकारे न्यूझीलंडमध्ये मानवी वस्ती निर्माण झाल्यानं माओरी समाज हा तेथील मूळ समाज आहे असं मानतात.

या बेटाला न्यूझीलंड हे नाव कसं पडलं?

जेव्हा सर्वप्रथम माओरी जमातीचे लोक या बेटावर आले तेव्हा त्यांच्या कुपे या मुख्याधिकाऱ्यानं त्यांच्या बोलीभाषेत ओटेरोआ हे नामकरण केलं. कुपेनं हे नाव फक्त त्या ठिकाणच्या उत्तर बेटासाठी ठेवलं होतं. संपूर्ण बेटाला Aotearoa me Te Waipounamu हे नाव दिलं. तद्नंतर काही शतकांनी नेदरलँडचा शोध डच खलाशी कार्टोग्राफर एबेल टास्मान तिथे आला. नंतर डच इस्ट इंडिया कंपनीचा विस्तार या नवीन ठिकाणी करतेवेळी नेदरलँडमधील आवडतं ठिकाण झीलँड या डच प्रांतावरून न्यूझीलंड हे नाव ठेवण्यात आलं.
rohit.patil@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New zealand mp hana rawhiti maipi clarke viral video of haka traditional song in her countrys parliament raising issues of her community dvr