लग्नानंतर मुलीने नाव बदलावं ही पारंपरिक प्रथा आहे. लग्नाआधी मुलीने स्वतःचं कितीही नाव कमावलं असेल, कितीही किर्ती गाजवली असेल तरीही तिला लग्नानंतर तिची ओळख बदलावीच लागत असे. परंतु, गेल्या काही वर्षांपासून हे ओळख बदलण्याचं प्रमाण कमी झालंय. अनेक महिला माहेरचं आणि सासरचं दोन्ही आडनाव लावतात तर काहीजणी फक्त माहेरच्याच आडनावाने आपली ओळख जपतात. या सगळ्यात दाक्षिणात्य अभिनेत्री वरलक्ष्मी सरथकुमारचा पती निकोलाई सचदेव याने वेगळाच निर्णय घेतला आहे. पत्नीचा माहेरचा वारसा जपला जावा याकरता निकोलाई सचदेवनेच त्याचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, या अशा निर्णयामुळे लग्नानंतर ओळख बदलावी लागते ही धारणा अधिक अधोरेखित होत जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री वरलक्ष्मी सरथकुमार ही व्यवसायिक निकोलाई सचदेव याच्याशी विवाहबद्ध झाली. निकोलाईने लग्नानंतर अभिनेत्रीला तिचं नाव बदलण्याची सक्ती न करता निकोलाईनेच नाव बदलण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच, निकोलाई लग्नानंतर वरलक्ष्मी सरथकुमारचं नाव लावणार आहे. याबाबत तो म्हणाला, लग्नानंतर वरलक्ष्मीने नाव बदलण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण तिला तिच्या नावातून सरथकुमार काढून टाकायचं नव्हतं. तसंच, तिच्या नावात तिला सचदेव लावायचं होतं. त्यामुळे तिचं नाव वरलक्ष्मी सरथकुमार असंच राहील. मी माझं नाव बदललं आहे. आता मी निकोलाई वरलक्ष्मी सरथकुमार सचदेव या नावाने ओळखला जाईन. तसंच, माझ्या पहिल्या पत्नीपासून झालेली माझी मुलगी देखील हेच नाव लावणार आहे. यामुळे वरलक्ष्मी आणि अभिनेते सरथकुमार यांचा वारसा कायम राहील. हे मी माझ्या पत्नीसाठी करत आहे”, असं निकोलाई म्हणाला.

हेही वाचा >> प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीचा मोठा निर्णय, पत्नी अन् सासऱ्यांचं नाव लावणार; काही दिवसांपूर्वीच झालंय लग्न

निकोलाई सचदेवचा हा निर्णय अत्यंत स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे. परंपरेला छेद देऊन त्यांनी नवा प्रयोग करायचा ठरवलं आहे. आपली ओळख बदलावी की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक मुद्दा. स्वखुशीने आणि पूर्ण जबाबदारीने त्याने हे पाऊल उचललेलं असेल. त्यामुळे त्याच्या निर्णयाचं कौतुक व्हायलाच हवं. पण या निर्णयामुळे कदाचित लग्नानंतर ओळख बदलावीच लागते ही धारणा अधिक गडद होत जाईल. त्यामुळे समाजात क्रांतीकारक निर्णय घेताना त्याचे दूरगामी परिणाम काय होऊ शकतात, याचाही विचार व्हायला हवा. निकोलाई सचदेव यांनी घेतलेला निर्णय नक्कीच कौतुकास्पद असला तरीही त्यामुळे समाजात कदाचित वेगळा संदेश पोहोचू शकतो.

अभिनेत्री वरलक्ष्मी सरथकुमार आणि निकोलाई सचदेव

लग्नानंतर नाव बदलल्याने फक्त महिलेची ओळखच नाही तर सर्वस्व बदललं जातं. मुलींना सासरच्या आडनावाशी हरकत नसते, पण एवढी वर्षे एका नावाने वावरताना अचानक दुसरं नाव लावणं आणि त्याच नावाने संपूर्ण आयुष्य काढणं हे वाटतं तितकं सोपं नसतं. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून महिलांनी स्वतःचं नाव बदलणं सोडून दिलंय.

निकोलाई सचदेवचा निर्णय उत्तमच

ज्या नावाने आपण आपल्या जोडीदाराला निवडतो, त्याच नावाने त्याने किंवा तिने आपली ओळख जपावी आणि आपल्याबरोबर कायम राहावं इतकी समज प्रत्येकात यायला हवी. पूर्वी आपल्या अनेक प्रथा परंपरांचा पगडा कायद्यांवरही दिसून येत असे. परंतु, गेल्या काही वर्षांत अनेक कायद्यात सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महिलेला लग्नानंतर तिचं नाव, तिची ओळख न बदलताही व्यवहार करता येतो. लग्नाचं प्रमाणपत्र असलं की तुम्हाला कोणत्याही कागदपत्रावरचं नाव बदलण्याची गरज भासत नाही. सरकारी आणि व्यवाहारिक कागदपत्रातही लग्नाचं प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जातं. त्यामुळे कायद्यातच तरतुदी करून दिल्या असतील तर लग्नानंतर नाव बदलण्याची सक्ती कोणीही करू शकत नाही. बाकी निकोलाई सचदेव यांचा निर्णय उत्तमच!

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nicholai sachadev husaband of varlakshmi sarathkumar has decided to changes his name is this good decision chdc sgk
Show comments