Navratri : नवरात्री हा नऊ दिवसांचा सण असतो. या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गेच्या नऊ रुपांची आराधना केली जाते. दुर्गेच्या या नऊ रुपांना एक विशेष महत्त्व आहे. यामध्ये शैलपुत्री, ब्रम्हचारिणी,चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री या देवींचा समावेश आहे.
असं म्हणतात प्रत्येक स्त्री हे देवीचं रुप आहे. भारतीय संस्कृतीत स्त्रिला देवी समजले जाते. त्यामुळेच नवरात्रीनिमित्त नऊ कन्या किंवा नऊ सुहासिनी महिलांची पूजा केली जाते. आजही समाजात महिला स्वत:चं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी लढत आहेत. स्त्री-पुरुष असमानता असो, स्त्रियांवरील अत्याचार असो, किंवा स्त्रियांना दिली जाणारी तुच्छतेची वागणूक असो, यासाठी स्त्रिया आजही आवाज उठवण्याचा प्रयत्न करतात.
खरं तर स्त्रीमध्ये प्रचंड शक्ती आहे. तिने एखादी गोष्ट ठरवली तर ती गोष्ट पुर्णत्वास नेण्याची ताकद तिच्यामध्ये आहे. जग बदलण्याची क्षमता तिच्यात आहे. तीच जन्मदाता आहे, तिने ही सृष्टी रचली आहे. अशा स्त्रिला तिच्यातल्या अस्तित्वाची जाणीव असणेही तितकेच महत्वाचे आहे. ही जाणीव देवी दुर्गेच्या नऊ रुपांमधून स्त्रियांना होऊ शकते. ही नऊ रुपे स्त्रियांची ताकद, अस्तित्व आणि स्वभावाविषयी बरंच काही सांगतात. आज आपण या नऊ रुपांविषयी सविस्तर जाणून घेऊ या.
शैलपुत्री
शैलपुत्री म्हणजे शक्तीचा प्रवाह. स्त्रीमध्ये प्रचंड शक्ती आहे. तिने एखादे कार्य पूर्ण करण्याचे ठरवले तर कितीही अडचण येऊ द्या ती पूर्ण करेल. तिच्यामध्ये असणारी शक्ती इतकी प्रबळ आहे की ती जगाचा कायापालट करू शकते.
ब्रम्हचारिणी
ब्रम्ह म्हणजे अनंत आणि चारिणी म्हणजे चालणे. अनंतात चालणारी म्हणजे ब्रम्हचारीणी होय. स्त्रियांनी नेहमी ब्रम्हचारिणी असावे. त्यांचे स्वरुप विस्तृत असते. त्यांच्यात जग बदण्याची ताकद असते.
हेही वाचा : दागिने खरेदी : हौस, प्रतिष्ठा की आर्थिक गुंतवणूक? समजून घ्या नाण्याची दुसरी बाजू
चंद्रघंटा
चंद्राचा संबंध बुद्धिमत्तेशी आहे आणि घंटा हे सतर्कतेचे प्रतिक आहे. प्रत्येक स्त्री ही बुद्धीमान असते. असं म्हणतात चंद्राच्या हालचालीमुळे मन अस्थिर होतं अशावेळी स्त्रीने नेहमी सतर्क राहून
मनावर नियंत्रण ठेवावे.
कुष्मांडा
कुष्मांडा म्हणजे सीताफळ. ज्याप्रमाणे सीताफळामध्ये अनेक बिया असतात त्याचप्रमाणे कुष्मांडाच्या रुपात सर्व सृष्टी सामावली आहे. स्त्री हे कुष्मांडाचे रुप आहे. ती जन्मदाता आहे आणि सृष्टीच्या शक्तीचे प्रतिक आहे.
स्कंद
स्कंद देवाची आई असल्याने देवीला स्कंद माता म्हणतात. देवी स्कंद या आपल्या मुलाला मांडीवर घेऊन सिंहावर बसताना दाखवले आहे. देवीच्या या रुपातून तुम्हाला देवीच्या धैर्याची जाणीव होईल. स्त्री ही धैर्यवान असते. तिच्यात प्रेम, वात्सल्यसह प्रचंड धैर्य असते.
कात्यायनी
कात्यायनी हे अन्यायाविरुद्ध लढणारी देवी आहे.कात्यायनी म्हणजे एखाद्या चुकीच्या गोष्टीविरुद्ध राग व्यक्त करणारी होय. स्त्रिने सुद्धा अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. महिलांनी आजुबाजूची नकारात्मता नष्ट करण्यासाठी चांगल्या हेतूने राग व्यक्त करणे, गरजेचे आहे.
हेही वाचा : महिला लढताहेत महिलांच्या सुरक्षेसाठी; जाणून घ्या महिला पीसीआर पथकाविषयी..
कालरात्री
काल म्हणजे काळ किंवा वेळ आणि रात्री हे शांततेचं आणि विश्रांतीचं प्रतिक आहे. स्त्रियांनी कालरात्री सारखे राहावे. शरीर आणि मनाला विश्रांती द्यावी.कालरात्री बुद्धी आणि तटस्थेचे प्रतिक आहे. स्त्रियांमध्ये असणाऱ्या बुद्धी आणि तटस्थेची जाणीव त्यांनी व्हावी.
महागौरी
महागौरी ही ज्ञान, मोक्ष, आणि चळवळीचा संदेश देणारी देवी आहे. महागौरी ही बुद्धिमान आहे. ती प्रतिभावान आणि प्रामाणिक आहे. ती संपूर्ण सृष्टीला परमानंद आणि मोक्ष प्रदान करते. स्त्रियांमध्ये हे गुण असतात. तिला या गुणांची जाणीव होणे, गरजेचे आहे. स्त्री इतरांना आनंद प्रदान करणारी असते. ती बुद्धिमान, प्रामाणिक आणि प्रतिभावान असते.
सिद्धिदात्री
सिद्धिदात्री म्हणजे सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी होय. स्त्री मध्ये सिद्धिदात्री देवीचे रुप असते. जग जिंकण्याची क्षमता आणि ताकद स्त्रीमध्ये असते. तिने स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवावा.
खरं तर स्त्रियांनी देवीच्या या नऊ रुपांचा स्वभाव आणि शक्ती ओळखावी आणि स्वाभिमानाने जगावे. मला वाटतं, प्रत्येक उत्सवामागे एक मुलमंत्र लपलेला आहे. त्याचप्रमाणे नवरात्रोत्सव सुद्धा हा स्त्रियांचे अस्तित्व आणि शक्तीचे महत्त्व सांगणारा उत्सव आहे.