Nirmala shekhawat Success Story: कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशाला अनेक प्रकारच्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागला होता. या काळाने संपूर्ण जगावर केलेल्या जखमा कधीही न पुसल्या जाण्यासारख्या आहेत. याच काळात जोधपूरमधील निर्मला शेखावत यांना त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर आणि लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. या काळात त्यांनी स्वतःबरोबर त्यांच्या कुटुंबाचीही काळजी घेतली आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कष्ट करीत स्वतःचा व्यवसाय उभारला. आज त्या स्वतःच्या कुटुंबासह ३० महिलांना रोजगार देऊन, त्यांचीही कुटुंबे सांभाळत आहेत.

पतीचा मृत्यू आणि लॉकडाऊन

फेब्रुवारी २०२० मध्ये निर्मला यांचे पती करणसिंग शेखावत यांचे मेंदूतील रक्तस्रावामुळे निधन झाले. पतीच्या मृत्यूनंतर त्यांच्या तिन्ही मुलांसह घरचीही जबाबदारी त्यांच्यावर आली. या दुःखातून त्या स्वतःसह कुटुंबाला सावरणार इतक्यात कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाले आणि आर्थिक समस्या उद्भवली. कोणतीही व्यावसायिक पदवी किंवा जास्त शिक्षण नसल्यामुळे निर्मला यांना नोकरी शोधण्यात अडचणी आल्या.

पण, म्हणतात ना जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण; त्याप्रमाणेच समोर कठीण आव्हाने उभी ठाकलेली असतानाही निर्मला यांनी हार मानली नाही. एका वृत्तपत्राशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, आपल्या कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी उभारी मिळाली. केवळ १२ वी पर्यंतचे शिक्षण झालेल्या निर्मला स्थानिक महिलांसाठी एक आदर्श बनल्या आहेत. त्यांनी स्वतःचा पारंपरिक राजस्थानी स्नॅक्स बनविण्याचा व्यवसाय सुरू केला.

आर्थिक अडचणींदरम्यान, निर्मला यांनी त्यांचा ‘मारवाडी मनवर’ हा उपक्रम सुरू केला; ज्यात त्या राजस्थानी नाश्त्याचे विविध पदार्थ तयार करून विकत होत्या. या व्यवसायाच्या सुरुवातीला त्यांना अनेकांच्या टीकांचे घाव सोसावे लागले; पण त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. त्यांची पहिली ऑर्डर फक्त १५० रुपयांची होती; पण हळूहळू लोकांना त्यांचे पदार्थ आवडू लागले.

३० महिलांना दिला रोजगार

आज निर्मला यांचा ​​व्यवसाय वेगाने फोफावला आहे. आता त्या घरगुती लोणची, पापड एवढेच नव्हे, तर १५० हून अधिक प्रकारचे घरगुती राजस्थानी स्नॅक्स विकतात. त्यांचा हा व्यवसाय आता सुमारे ३० महिलांना रोजगार देतो. खरे तर, निर्मला यांच्या आईचा राजस्थानी पदार्थ तयार करण्यात हातखंडा आहे. त्यांनी हा पाककलेचा वारसा जतन केला आणि त्या वारशाने आता त्यांच्या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात हातभार लावला आहे.

हेही वाचा: The Sky Queen: कॅन्सरवर मात करून सुरू केला स्वतःचा व्यवसाय अन् झाली करोडो रुपयांची मालकीण

पारंपरिक पद्धतीने तयार केले जातात पदार्थ

यंत्र, कृत्रिम घटक किंवा रसायनांचा वापर न करता, सर्व खाद्योत्पादने हाताने तयार करणे हे निर्मला यांच्या उद्योगाचे वैशिष्ट्य आहे. निर्मला आणि त्यांच्या टीममधील कुशल महिला कारखान्याऐवजी घरून काम करतात. त्या प्रत्येक पदार्थ तयार करण्यासाठी पारंपरिक पद्धतीचा वापर करतात. तसेच व्यवसायापलीकडे पाहताना महिलांना स्वावलंबी करण्याचा निर्मला यांचा निर्धार आहे. स्त्रियांनी इतरांवर अवलंबून न राहता, स्वतंत्रपणे संकटांना सामोरे जावे, असे त्यांचे मत आहे आणि त्यांना आधार देण्यासाठी त्या सतत नवीन संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.