फोर्ब्सने जगातील सर्वात शक्तिशाली महिलांची (World’s Most Powerful Women 2023) यादी जाहीर केली आहे. १०० महिलांच्या या यादीमध्ये चार भारतीय महिलांचा समावेश आहे. यातील एक नाव हे राजकीय क्षेत्रातील असून बाकीचे तीन नावे हे उद्योग क्षेत्रातील आहेत. कोण आहेत या महिला जाणून घेऊया…
१ निर्मला सीतारामन
फोर्ब्सच्या जगातील सर्वांत शक्तिशाली महिलांच्या यादीत निर्मला सीतारामन यांना ३२ वे स्थान देण्यात आले आहे. निर्मला सीतारामन मे २०१९ मध्ये भारताच्या अर्थमंत्री बनल्या. त्याचबरोबर त्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचीही जबाबदारीही सांभाळत आहेत. त्याशिवाय त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्याही होत्या. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी यूके असोसिएशन ऑफ अॅग्रीकल्चरल इंजिनियर्स आणि बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. या यादीत निर्मला सीतारामन यांनी सलग पाचव्यांदा स्थान मिळवले आहे. गेल्या वर्षी या यादीत त्या ३६ व्या स्थानावर होत्या. म्हणजेच यावेळी त्या चार स्थानांनी वर आहेत. तर, २०२१ मध्ये त्यांना या यादीत ३७ वे स्थान मिळाले होते.
२ रोशनी नादर
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह सर्वांत शक्तिशाली महिलांच्या यादीत रोशनी नादर यांचाही समावेश आहे. रोशनी नादर एचसीएलचे संस्थापक आणि उद्योगपती शिव नाडर यांच्या मुलगी आहेत. रोशनी एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या सीईओपदी कार्यरत आहेत. २०२० मध्ये त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. उद्योग क्षेत्राबरोबरच रोशनी यांचे समाजकार्यातही मोठे योगदान आहे. रोशनी यांचा ‘शिव नादर फाऊंडेशन’च्या शैक्षणिक उपक्रमात मोठा सहभाग असतो.
३ सोमा मंडल
सोमा मंडल या सरकारी मालकीच्या स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (सेल) पहिल्या महिला अध्यक्षा आहेत. २०२१ मध्ये त्यांना ही जबाबदारी देण्यात आली. सोमा मंडल यांच्या नेतृत्वाखाली सेल कंपनीची मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्याच वर्षात त्यांनी कंपनीचा नफा तीन पटींनी वाढवला. फोर्ब्सच्या यादीत त्या ७० व्या स्थानावर आहेत.
४ मजुमदार-शॉ
फोर्ब्सच्या जगातील सर्वांत शक्तिशाली महिलांच्या यादीत मजुमदार-शॉ यांचा ७६ वा नंबर आहे. मजुमदार-शॉ यांनी १९७८ मध्ये बायो फार्मास्युटिकल फर्म बायोकॉनची स्थापना केली, त्यांचा मलेशियाच्या जोहोर भागात आशियातील सर्वांत मोठा इन्सुलिनचा कारखाना आहे.