परवा घरातील पुस्तकाच्या कपाटाची आवराआवर करताना दुर्गाबाईंचं ‘ऋतुचक्र’ हातात आलं. नकळतच त्यावरून हळूवार हात फिरवला. परत एकदा पहिलं पान उघडलं, वाचायला सुरुवात केली.
जयवंत दळवींनी बाईंची एक मुलाखत घेतली होती त्यात ते लिहितात की, रूग्णावस्थेत असताना ज्या खिडकीजवळ बसून बाईंनी लेखन केलं त्या खिडकीतून फारशी सृष्टी दिसत नव्हती. मग हे ओजस्वी लेखन झालं कसं ? याला कारण एकच देता येईल ते म्हणजे बाईंच्या आत खोलवर उतरलेला निसर्ग, त्यांच अफाट निरीक्षण आणि ते सगळं हळूवार टिपून घेणारी त्यांची प्रतिभा. ‘ऋतूचक्र’ वाचताना जाणवलं की, क्षणभर थांबून आपणही निरखलं तर सृष्टी आपल्यालाही अशीच अनेक अंगाने भेटत असते. प्रत्येक ऋतूत होणारे छोटे बदल आपल्याला सुखावतात. नवी उमेद देतात. नुकतीच वसंताला सुरुवात झाली आहे. हवेतला गारवा कमी झालाय. थंडीत पानं गळून ओकीबोकी झालेली झाडं आता नव्याने उमलू लागली आहेत.
सातवणींचा फुलांचा बहर ओसरून आता पुन्हा एकदा तिला कोवळी पालवी धरलीय. नीट निरखलं तर हा बदल लगेच कळून येईल. हिरवी जून पानं आणि त्या फांद्यांच्या शिरोभागी नुकतीच उगवलेली नवी मुलायम पालवी. हिरव्या रंगाच्या या दोन छटा वेगळ्या समजून येतील अशा. जांभळाची झाडं, नवी पालवी लेऊन वसंताच्या स्वागताला सज्ज आहेत. शेवग्याच्या झाडांचे शेंडे फुलांच्या पांढऱ्याशुभ्र घोसांनी बहरलेत, तर फायकस कुळातला हलक्या पारंब्यांचं जाळं खोडा भोवती लपेटून पिंपळसुद्धा पानांच्या मऊ कळ्यांनी अंगभर उमललाय.
निबर हिरव्या निस्तेज पानांशेजारी उमललेली तांबूस लालसर पिंपळपान अगदी सहज आपलं अस्तित्व जाणवून देतायत. किती छोटे, पण मनोहारी बदल आहेत हे… प्रत्येक निसर्ग प्रेमीव्यक्तीने टिपावे असं आहे हे ऋतू वसंत आगमनाचं वैभव. ऋतूमानाप्रमाणे निसर्गात जसे बदल होतात, तसे माझ्या छोट्या बागेतही अनेक छोटे बदल झाले होते.
हिवाळ्यात शीत निद्रेत गेलेली कमळं आता जोमाने वाढू लागली होती. जास्तीचं तापमान म्हणजे कमळांचा आनंद. आता भरपूर उभी अशी पानं वाढतील मुळांचा पसारा विस्तारेल. पानांचा आकार लांब रूंद होईल. या पानांचा वापर करून बरेचसे पदार्थ वाफवता येतील. या दिवसांत हळदीची पानं फारशी मिळत नाहीत, कारण हळद नव्याने लावलेली असते. अशा वेळेस ती कसर कमळपानाने भरून निघते.
कारल्याचं बी कुठे मातीत पडून राहिलं असेल तर ते अचानक रूजून वर येतं. त्याचं अस्तित्व जाणवायच्या आतच त्याला फुलंही यायला लागतात. हिवाळी रोपांची बिया तयार करण्याची प्रक्रिया सुरू होते. अळू आणि रताळूला एक नवा बहर यायला सुरुवात होते. मायाळू, अंबाडीची रोपं जीव धरायला लागतात. गुलबाक्षीच्या जोडीला कोरांटीही फुलते. गोकर्णीला नवी राजस पालवी धरते.
आता उन्हाळी भाजीपाला लावायला हवा. त्यासाठी जमवाजमव करावी तर निसर्गाने तेही काम आधीच केलेलं असतं. एक जीवनचक्र पूर्ण करून बिया तयार करून विसावलेला हिरवा माठ आता आपसूकच रूजलेला असतो. मायाळूच्या लाल देठांना हिरवी पानं आणि पांढरीशुभ्र फुलं बहरलेली असतात. घोसाळ्याच्या सुस्तावलेल्या वेलींवर चुकून वेलीवरच राहिलेल्या फळांचे खुळखुळे वाजू लागतात. त्यांच्या आत लागवडीसाठी नवीन बी तयार झालेलं असतं. आता पूर्ण उन्हाळा आणि येणारा पावसाळा कारली आणि घोसाळी मिळणार असतात. लाल भोपळ्याचे वेल असेच आपसूक उगवून आलेले दिसतात. रूंदसर पिवळी फुलं त्यावर लगडलेली. शेवग्याच्या फुलांबरोबर आता भोपळ्याच्या फुलांची भाजी किंवा भजी करता येतील याची खात्री पटते.
आपण नव्याने काही लावावं म्हणून बागेत डोकावावं तर अर्धी अधिक कामं आपसूकच उरकली गेलेली असतात. खत, माती आणि पाण्याच्या नियोजनाचा प्रश्न सोडवणं एवढचं उरलेलं असतं. मग यावर्षी नव्याने काय लावायचा यांचे आडाखे मी बांधते. त्यासाठीची जमवाजमव करते. दुधी, काकडी यांच्या नवीन जाती लावायच्या ठरवते. काही फुलझाडांचं आणि फळझाडांचं नियोजन करते, पण आतून नक्की खात्री असते की पुढच्या वर्षी या ऋतूत हे सगळे नवीन पाहुणे आमंत्रणाशिवायच हजेरी लावणार आहेत आणि माझी बाग निसर्गाच्या साथीने अधिकच समृद्ध होणार आहे.
mythreye.kjkelkar@gmail.com