किचन गार्डनमध्ये आपण लावलेली रोपे ही कमी जागेत वाढत असतात. सहाजिकच त्यांना लागणाऱ्या अन्नद्रव्यांची गरज ओळखून ती पुरवणे हे कौशल्याचं काम असतं. सातत्याने निरीक्षण आणि प्रयोग करणं हे यासाठी आवश्यक असतं. परंतु यासाठी प्रत्येकाजवळ एवढा वेळ असेलच असं नाही. यावर सोपा उपाय म्हणजे कंपोस्टचा वापर करणं. कंपोस्ट खतामधून झाडांना आवश्यक अशा अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो. नर्सरीमध्ये तयार कंपोस्ट मिळतेच, पण घरच्या घरी कंपोस्ट तयार करणेसुद्धा सोपे आहे. जागा जरा जास्त असेल तर एखाद्या मोठ्या ड्रममध्ये आपण विघटनशील कचरा जमा करू शकतो. ड्रमला तळाशी तसेच वरही भरपूर छिद्र पाडून घ्यायची. यात तळाला वाळलेला पालापाचोळा भरायचा. एक मोठा थर पालापाचोळ्याचा दिला की त्यावर घरातील ओला कचरा टाकत जायचं. आपल्या बागेतील वाळलेली पाने, देवपुजेसाठी वापरलेली निर्माल्याची फुलं, जुनी पिठे, आंबट ताक असं जे जे विघटनशील घटक या सदरात मोडतं ते सगळं घालतं राहायचं. तेलकट पदार्थ मात्र टाळायचे. वाया गेलेली भाजी असेल तर ती धुवून तिचा तेलाचा अंश जाईल असं पाहून मग ती यात घालायची. तेलामुळे उंदरांचा त्रास वाढतो.
कंपोस्ट जलद व्हावे म्हणून काहीजण नर्सरीतून विरजण आणतात. खरं तर याची गरज नसते. आंबट ताक आणि वाळलेला पालापाचोळा यातूनच ही प्रक्रिया पुरेशी वाढीला लागते. वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. घरातल्या ओल्या काचऱ्याचा उपयोग खत तयार करण्यासाठी करायला सुरुवात झाल्यानंतर उरतो तो सुका अविघटनशील कचरा. त्याचं व्यवस्थापन मग सोपं होतं.
आणखी वाचा-‘क्लॉडिया शेनबॉम’ पहिली महिला राष्ट्राध्यक्ष बनून घडवला इतिहास! कोण आहेत क्लॉडिया शेनबॉम जाणून घ्या
मी जेव्हा हा ड्रमचा प्रयोग केला त्यावेळी भाज्यांची सालं, देठं उचलून काचऱ्याच्या, प्लास्टिकच्या पिशवीत टाकण्याचा त्रास वाचला. भाज्या चिरल्या की उरलेले घटक गच्चीवर जाऊन ड्रममध्ये टाकणं खूपच सोयीचं वाटू लागलं. पहिल्यांदा असं वाटलं होतं की, आठ ते दहा दिवसांतच ड्रम भरेल, पणविघटनाची प्रक्रिया जसं जशी वाढू लागली तसतशी थरांची जाडी कमी होऊ लागली आणि आपसूकच नवीन घटक टाकण्यासाठी जागा उपलब्ध होत राहिली. साधारण संपूर्ण ड्रम भरायला तीन ते चार महिने लागले. पावसाळ्यात आणि एरवीही ड्रमच्या तळाकडच्या छिद्रातून पाणी येत असे ते मी एका टबमध्ये जमवून बाटलीत भरून ठेवत असे. या लिक्वीड मॅन्युअरचा उपयोग ऑर्किड आणि कमळांसाठी करता येई. ऑर्किडला यांच्या वापराने चांगली फुलं आली. लक्ष्मी कमळाची फुलंही चांगली मोठी आणि संख्येने भरपूर येऊ लागली.
तीन महिन्यानंतर या ड्रममधील कचरा गच्चीवर एका कोपऱ्यात पसरला, जेणेकरून तो चांगला वाळवा. या दरम्यान अनेक पक्षी गच्चीवर यायचे. यात ड्रॉंगो म्हणजे कोतवाल पक्षी आघाडीवर होते. शेपटी दुभंगलेले काळेभोर कोतवाल या पसरलेल्या काचऱ्यात निवांत शोध मोहीम राबवत असतं. आपलं खाद्य वेचून वेचून खातं. पसरलेला कचरा चांगला वाळल्यावर तो थोडा कुटून, चाळून घेतला. बारीक पूड वजा कंपोस्ट वेगळं करून जाडे भरडे घटक नवीन कुंडी भरण्यासाठी वेगळे ठेवले. साधारण तीन-चार प्रकारात कंपोस्ट वेगळं करून साठवून ठेवलं. जेणेकरून आवश्यकतेनुसार त्याचा वापर करता यावा. अर्धवट विघटित झालेले घटक परत ड्रममध्ये घातले. अशारीतीने तयार केलेल्या कंपोस्टमुळे मला कृत्रिम अन्नद्रव्ये देण्याची गरज पडली नाही. तसेच कमतरतेमुळे होणारे रोगही टाळता आले.
आणखी वाचा-World No Tobacco Day 2024: धूम्रपानाचा गर्भवती महिलांवर कसा परिणाम होतो? जाणून घ्या…
कचरा पसरणे, वाळवणे अशी थोडी खटपट करावी लागली खरी, पण मिळणारा आनंद त्यापेक्षा अधिक होता. कंपोस्ट करण्याच्या या पद्धतीत कधीही या काचऱ्याला दुर्गंधी आली किंवा भरमसाठ अळ्या झाल्या, असा कोणताही त्रास झाला नाही. कारण वाळलेला पालापाचोळा आणि घरातला कचरा यांच्या एकावर एक दिलेल्या थरांमुळे आवश्यक तेवढी ओल राखली जायची आणि विघटनाची क्रिया उत्तम व्हायची. नेहमी हाताशी असावा म्हणून वाळलेला पालापाचोळा साधारण एक दोन पोती जमा करून ठेवलेलाच असे, ज्यामुळे हवा तेव्हा तो वापरता येई.
घरी कंपोस्ट करण्याचा प्रयत्न सफल झाल्यावर मग मी सोसायटीतील समारंभात जमणारा विघटनशील कचरा मागवून घेऊ लागले. ओणम् या सणाला ‘पुक्ललम्’ म्हणजे फुलांची रांगोळी काढतात. सणाच्या दुसऱ्या दिवशी ही सगळी वाळलेली पानं, फुलं, पाकळ्या माझ्याकडे पोहचत होतं. मग एकदोन दिवस त्यांना उन दाखविल्यावर त्यांची रवानगी ड्रममध्ये होई. गणपती, दिवाळी या सणाला वाळलेली फुलं मोठ्या प्रमाणात मिळत.
या सगळ्याचा खतांसाठी उपयोग करताना मला विलक्षण समाधान मिळत असे. व्यवस्थेवरचा ताण कमी करण्याचा हा माझा छोटा प्रयत्न होता. या सगळ्या प्रक्रियेत तयार झालेले कंपोस्ट खत सगळ्यांना भरभरून वाटता येई. एकंदर आनंदाचं हे गणित उत्तम जमलं होतं. घरी कंपोस्ट तयार करणं हा एक वेगळा आणि समृद्ध करणारा अनुभव होता. हे सगळं वाचताना सहाजिकच काहींच्या मनात येईल, की मोठी जागा नसेल तर काय? कंपोस्ट कसं करायचं? मंडळी कमी जागेतही हा प्रयोग करता येतो आणि शंभर टक्के यशस्वी होतो. नेमकं हेच जाणून घेऊया पुढच्या लेखात.
mythreye.kjkelkar@gmail.com