मागील लेखात हंडीतील बागेसाठी माती कशी तयार करायची त्याची थोडी माहिती आपण घेतली. टेरारियमसाठी लागणारे सगळे घटक एकत्र केले की मग प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करायची. सर्वात प्रथम छोटे दगड काच पात्राच्या तळाशी घालायचे. त्यावर एक बारीक जाळीचा तुकडा ठेवायचा. हा तुकडा साधारण पात्राच्या तळाच्या आकाराचा हवा. यावर मग कोळशाचे तुकडे किंवा चुरा घालायचा. कोळसा वापरल्यामुळे रोपांना बुरशी लागत नाही. रोपांची मुळं कुजून बुरशी लागणं ही क्रिया होत नाही. आता पुढचा थर झाडाची वाळलेली बारीक साल किंवा वाळलेल्या पानांपासून केलेल्या कंपोस्टचा द्यायचा. एक लक्षात घ्यायचं की, आपण वापरणार असलेला प्रत्येक घटक काय काम करणार आहे हे नीट माहीत हवं. ते एकदा स्पष्ट झालं की तो विशिष्ट घटक उपलब्ध नसेल तर त्याला पर्याय म्हणून काय वापरता येईल ते ठरवता येतं.
झाडाची साल हे एक उत्तम खत आहे. साल आणि बारीक काड्या यातून लिग्नीनचा पुरवठा रोपांना होतो, ज्याची वाढीसाठी आवश्यकता असते. त्याबरोबर इतर पोषक घटकही मिळतात तेसुद्धा अतिशय संथ गतीने. त्यामुळे टेरारियम तयार होऊन आतील रोपं स्थिरस्थावर झाल्यावर जेव्हा त्यांना पोषक घटकांची खरी गरज असते, त्यावेळी काड्या आणि सालींच्या चुऱ्यामुळे त्यांची खताची गरज भागते. यानंतरचा थर द्यायचा तो बारीक रेतीचा. अर्थात समुद्री पुळण नको. आपल्याला खाडीतील ओबडधोबड तुकडे असलेली बारीक रेती वापरायची आहे हे लक्षात घ्यायचं.
आणखी वाचा-तू मात्र या फुकट योजनांच्या अमिषाला बळी पडू नकोस…
आता सगळ्यात शेवटचा थर म्हणजे कोकोपीट किंवा बागेतील माती. एकदा या रितीने थर देऊन माती तयार झाली की रोपं लावायला घ्यायची. आपल्या सभोवताली असणारी झाडं जर आपण वापरणार असू तर मग नेप्रोलेफिस म्हणजे साधे नेचे या झाडाची निवड करावी. याला सिंपल फर्न असंही म्हणतात. फर्न किंवा नेचे वर्गातील झाडं ही ओलसर जागी, कमी प्रकाशात वाढणारी असतात. शिवाय त्यांच्या रंग आणि आकारात पुष्कळ वैविध्यही मिळतं. त्यामुळे टेरारियम अधिक आकर्षक दिसतं. शिवाय यांच्यामुळे एक झुडपाचा किंवा घनदाट जंगलाचा लूकसुद्धा टेरारियमला देता येतो.
फर्नमध्ये नेप्रोलेपीस, मेडन हेअर फर्न, बोस्टन फर्न, होली फर्न, बटन फर्न या अशा काही जाती टेरारियमसाठी चांगल्या आहेत. फर्नमध्ये अनेक जाती रूंद पानांच्या आणि अधिक मोठ्या आकाराच्या ही असतात. उदाहरणार्थ, स्टेग हॉर्न, बर्ड नेस्ट फर्न यांचा वापर टाळावा, कारण टेरारियम करताना आकाराची मर्यादा पाळावी लागते.
नर्सरीमध्ये जाऊन शोध घेतला तर फर्नच्या अनेक जाती सहज मिळतील, पण तसं करायचं नसेल तर एखाद्या बागेत, सावलीच्या ठिकाणी शोधलं किंवा विहिरींच्या आतील भिंती, सोसायटीतील मोठी झाडे ज्यांच्या तळाशी थोडीफार ओलं येते तिथे शोधल्यास फर्नच्या अनेक जाती मिळतील.
आणखी वाचा-अंधत्वावर मात करून यशशिखर गाठणारी बुद्धीबळपटू संस्कृती मोरे
फर्नव्यतिरिक्त पेप्रोमिया ही साधारण ह्रदयाकार पानांची छोटी वनस्पती आपल्याला वापरता येईल. ही आपल्या घरातील कुंड्यांमध्ये ही सहज वाढताना आढळते. दिसायला अतिशय आकर्षक आणि स्वतःला टिकवून ठेवण्याची भरपूर क्षमता असलेली अशी ही वनस्पती आहे.
पिलीयाच्या सगळ्या जाती, बेबी, टियर्सही याच प्रकारातील अजून काही झाडं- जी या रचनेसाठी अतिशय उपयुक्त ठरतात. सक्युंलंटस् जर वापरायची असतील तर त्यात जेड म्हणजे फॉर्च्यून प्लांट एलोवेरा म्हणजे आपली कोरफड, इचिंवेरा, हॅवर्थिया, स्टींग ऑफ पर्ल्स आणि कलेनच्यू यांचा वापर करता येईल. यातील कलेनच्यू हे सक्युलंट इतकं सुंदर असतं की याला हिरवीगार पानं तर असतातच, पण फार सुरेख फुलंही येतात. झुडपासदृश वाढणारं अनेक रंगात उपलब्ध असणारं, कमीत कमी पाणी आणि अगदी नगण्य देखभालीत वाढणारं कलेनच्यू हे एरवीसुद्धा इनडोअर प्लांट म्हणून सहज वापरता येतं. जर आपण कॅक्टस प्रकारातील झाडं वापरणार असू तर अरीझेनो, फीश बोन, बनी इयर एप्पल कॅक्टस अशा काहींचा उपयोग करता येईल. एकाच वेळी फर्न, कॅक्टस आणि सक्यूलंट सोबतच आपली नेहमीची झाडं वापरून एकत्रित असं टेरारियमसुद्धा बनवता येतं. थोडासा शोध घेतला आणि कल्पकता वापरली की हे सहज साधता येईल. या लेखासोबत मी फर्न, कॅक्टस आणि सक्यूलंटचे फोटो देतेय जेणेकरून ही रोपं तुम्हाला सहज ओळखता येतील.
mythreye.kjkelkar@gmail.com