पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या की कधी एकदा गावाला जातो असं होऊन जायचं. सुट्टीचा एक म्हणजे एक ही दिवस आम्हाला वाया घालवायचा नसे. आजोळच्या ओढीने, मोठ्ठं घर, माडी, मजबूत खांब, रूंद कोनाडे, मागच पुढचं अंगण भोवती नारळी पोफळीच्या बागा, अशा त्या निसर्गरम्य परिसराकडे मनओढलं जाई.

आज एवढं संपन्न आजोळ मिळत नसलं तरी माणसाचं निसर्गाकडे ओढ घेणारं मन काही बदलेल नाही. सुटीत आजही एखादं होम स्टे, ॲग्रो वनाकडे पाय आपसूक वळतातच. काही दिवसांपूर्वी अशाच एका, गावाचा फील देणाऱ्या ॲग्रो वनात गेले होते. राहाण्यासाठी मातीचा वापर करून तयार केलेल्या खोल्या. गच्च हिरवळ, मोठे वृक्ष जोडीला मातीकाम, सुतारकाम, रंगकाम, जात्यावर धान्य दळणं अशा बऱ्याच गोष्टी ज्यात पर्यटक सहज रमून जावा.

तिथे फेरफटका मारताना माझं लक्ष वेधून घेतलं ते एका मंडपाने. भूगोलाच्या पुस्तकातील एस्किमोंची घरं असावीत तसं एक घर ,पण तारांनी विणलेले असं. त्यावर सुरेख वेली सोडलेल्या. त्याही तऱ्हतऱ्हेच्या. कुठे गारवेल तर कुठे नाजूक गणेश वेल. एका जागी बोगनवेल तर एकीकडे मोगऱ्याची वेल. रंगसंगती तरी किती मोहक. मोगऱ्याच्या गच्च फुलांनी बहरलेला पांढरा पट्टा त्या शेजारी गणेश वेलीच्या नाजूक फुलांचा बहर त्याला जोडून बोगन वेली चे प्रसन्न रंग तर पुढच्या भागात ह्दयाकार पानांची जांभळी गारवेल आणि या सगळ्यांचा एकत्रित मेळ साधणारी नाजूक गुलाबी निळसर झाक मिरवणारी, आईस्क्रीम क्रीपर. एकात एक मिसळलेल्या पाना-फुलांची ती अनवट वीण अक्षरशः थक्क करतं होती. या लता मंडपामध्ये सुरेख बाकडी होती जिथे लोक मजेत बसले होते. सभोवती आकर्षक दिव्यांची रचना होती जी अतिशय साधी, पण तरीही कमालीची सुंदर, त्या परिसराचा नूरच पालटून टाकणारी.

वेल या वनस्पतीच्या एका प्रकाराने केवढा कलात्मक परिणाम साधला होता. गावाकडच्या कुडाच्या भिंती त्याला बांबूचे टेकू आणि छत म्हणून वापरलेल्या कामट्या यांना सांधणारे ते दुधी भोपळा, तोंडलीचे वेल. अंगणाच्या कमानीला लगटून वाढणारी सुगंधी जाई तर मेंदीच्या कुंपणाच्या आधाराने पसरलेला कुंदा.नारळी पोफळी वर चढवलेले मिरीचे वेल त्यांना लगडलेले हिरवेगार मिरीचे दाणे. घराच्या मागील दारी आधाराने चढत जातं कौलांवर पसरलेला पावटा, चवळी आणि घोसाळी. पावट्याची निळी फुलं, घोसाळ्याच्या पिवळ्या धम्मक फुलांचे तुरे, चवळीची लहानशी फुलं हे स्मृतीतलं निसर्गचित्र क्षणार्धात डोळ्यांसमोर तरळून गेलं.

हे सगळं जेव्हा सहज स्वाभाविकपणे दिसत होतं तेव्हा त्याचं महत्त्व जाणवलं नव्हतं, आज हेच पाहायला अनुभवायला किंमत मोजावी लागतेय तेव्हा ते उमगतंय. दुबईला जाऊन आपण जी मिरॅकल गार्डन बघतो ती जवळ जवळ सगळी मॉर्निंग ग्लोरी किंवा स्थानिक भाषेत जिला गारवेल म्हणतो तिनेच तर सजलेली असते. तिथे ही लता – वेलींचा अतिशय कल्पक उपयोग केलाय. झोपाळ्यावर, बागेतील आरामदायी आसनांवर उभारलेलं छत, ठिकठिकाणी असलेले कॅफे, तिथली वेलींच्या रचनांनी सुशोभित केलेली बैठक व्यवस्था. हे सगळं जणू नजरबंदी करतं.

बाग तयार करणं हे शास्त्र आहे खरं, पण मला वाटतं खरी बाग आधी आपल्या मनात तयार झालेली असते. मग नकळत आपण ती जमेल तशी जमेल त्या पद्धतीने प्रत्यक्षात साकारतो. त्यावेळी हे झुडूप आहे, ही वेल आहे, याचा वृक्ष होईल ही वर्षायू रोपांची जागा तर ही दीर्घायू रोपांची, अशी कोणतीच गणितं, कोणताच आराखडा आपल्या मनात नसतो. आपण आपल्या मनातल्या अज्ञात बागेच्या चित्रांशी मिळती जुळती आकृती साकारत जातो. आपल्या बाल्कनीत लावलेली, किचनच्या खिडकीत वाढणारी, उन्हाच्या कोनाचा अंदाज घेत फुलणारी वऱ्हाड्यातील, अशी कुठलीही बाग निरखून पाहा आपल्याच मनात रेंगाळणारं एक निसर्गचित्र आपण रेखलेलं असतं.

थोडक्यात काय, निसर्ग असा बाहेर शोधायला निघालेलो असताना आपल्या आत झिरपलेला तो आपल्या सगळ्या कृतीतून डोकावत राहतो. लहानपणी किंवा एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यावर जे जे म्हणून आपण आपल्या नकळत टिपलेले असतं ते -ते बाग तयार करताना समोर उभं ठाकतं, पण आपण काही यातले तज्ज्ञ नाही, असं म्हणतं ती सगळी चित्रं दूर सारली जातात. आत खोलवर रूजलेली ही निसर्गचित्रं प्रत्यक्ष साकारणं म्हणजेच. खऱ्या अर्थानं आपली बाग तयार करणं आहे, नाही का?

mythreye.kjkelkar@gmail.com