वॉटर लिली वाढत होत्या, फुलत होत्या. त्यामुळे प्रत्येक सकाळ अधिकच प्रसन्न होत होती. पहिल्यांदा इतरांसारखंच हे कमळ आहे असं मला वाटे, पण जसजशी मी या विषयाची माहिती मिळवू लागले तसतसं मला कमळं आणि वॉटर लिली यातला फरक कळू लागला. एकाच कुळात वाढणाऱ्या या दोन्ही वनस्पतींमध्ये बराच फरक आहे. दोघांची सौंदर्य स्थळे वेगवेगळी आहेत. कुमुदिनीची पानं गडद हिरवी, तर काही जातींमध्ये किंचित पोपटी रंगाकडे झुकणारी असतात. तर कमळाची पानं मात्र हिरव्या रंगातील थोडी फिक्कट छटा लेऊन असतात. कुमुदिनीचा पर्णपसारा पाण्यावर तरंगत पसरतो तर कमळाची पानं ही लांब देठाच्या आधारे पाण्याच्या वर येऊन डोलतात. कुमुद फुलांच्या पाकळ्या नाजूक, निमुळत्या आणि टोकदार तर कमळाच्या पाकळ्या रूंद आणि गोलाई असलेल्या.
वरवर या गोष्टी निरखल्या तरीसुद्धा या दोन्ही वनस्पतींंमधला फरक सहज समजून येतो. कुमुदिनी ही कमळापेक्षा लागवडीसाठी आणि जोपासण्यासाठी सोपी अशी वनस्पती आहे. चिखल मातीचा गारा करून यांचे कंद लावले की झालं. पुरेसा सूर्यप्रकाश आणि ऊन मिळत राहिलं की याला भरपूर फुलं येतात. काही जाती वर्षांतून एकदाच फुलतात तर काही अगदी बारा महिने सातत्याने फुलत राहतात. सूर्यविकसी कुमुद फुलं सूर्योदयाला उमलतात आणि सूर्य मावळायला मिटून जातात. चंद्रविकसिनी कुमुद फुलं ही चंद्रोदयाला उमलून सुर्योदयापर्यंत आपला मंद गंध वाऱ्यावर पसरवत डोलत राहतात. कुमुदिनीमध्ये असंख्य रंग आणि प्रकार पाहायला मिळतात. आजकाल नवनवीन प्रयोग करत नवीन बऱ्याच जाती विकसित केल्या गेल्या आहेत. कुमुदिनी या मोठ्या कुंडामध्ये उत्तम वाढतात, पण जर जागा छोटी असेल, कुंड किंवा टब आकाराने लहान असेल तरी यांच्या वाढीत अडथळा येत नाही, फक्त फुलांचा आकार थोडा छोटा होतो.
कमोदिनी सातत्याने फुलत असल्यामुळे बाग नेहमी बहरलेली राहते. हार्डी लिली आणि ट्रॉपिकल लिली असे यात दोन प्रकार आढळतात. हार्डी लिलींची पानं वरच्या बाजूला गडद हिरवी असतात, तर खालच्या बाजूला जांभळट, मातकट छटा असलेली असतात. यांना वर्षभर पानांचा बहर असतो, पण फुलं मात्र वर्षांच्या ठरावीक कालावधीमध्ये येतात. यांचे रंग मात्र अतिशय मोहक असतात. जॉर्जिया पीच, कोलो रॅडो या जातींना अतिशय मोहक पीच रंग असतो तर लेमन शिफॉन, इनर लाईट या जातींना मोहक पिवळ्या रंगाची फुलं देतात. मून डान्स, एसॉर्टेड व्हाईट या पांढऱ्या रंगाच्या जाती आहेत. ब्लॅक प्रिन्सेस ही गर्द लाल रंगातल्याप लिलीला तर खरोखर राणीचं म्हणाव लागेल. या व्यतिरिक्त लाल आणि पिवळा किंवा पांढरा असे एकत्र रंग असलेल्या लिली उपलब्ध असतात.
हार्डी लिलींची लागवड रायझोम म्हणजेच प्रकंदांपासून केली जाते. लिलींना अगदी लहान अशा बियासुद्धा येतात. फूल उमलून गेल्यावर त्याचा देठ हा पाण्यात बुडतो, फुलांमध्ये फलन झालेलं असेल तर मोहरी पेक्षाही खूप लहान आकाराच्या बिया तयार होतात आणि मग या बियांपासून अनेक लहान रोपे वाढीला लागतात. ही पाण्यावर तरंगणारी बाळ रोपं मोठी सुंदर दिसतात. विविपेसरस किंवा पिंडज पद्धतीनेही लिली आपली नवीन रोपं तयार करतात. खरं तर जरायु ही पद्धत पुनरूत्पादनासाठी प्राण्यांमध्ये आढळते. पण गंमत म्हणजे काही वनस्पतीसुद्धा या पद्धतीने पुनरूत्पादन करतात. यात काही मॅन ग्रुव्हज् म्हणजेच कांदळवनातील जातींचा समावेश होतोच, पण पाणलिलींचाही समावेश होतो.
पाण्यावर तरंगणाऱ्या या लिलीच्या पानांच्या बेचक्यात नवीन रोप तयार होते. कालांतराने ते पान गळून जाते व त्यावर वाढलेले हे रोप स्वतंत्र वनस्पती म्हणून वाढीस लागते. लिलीच्या वाढीतील हे टप्पे बघणं हा एक वेगळाच आनंद आहे. निसर्गाचे हे छोटे चमत्कार आपल्याला मोहात पाडतात. आपण नकळतपणे आपल्या झाडांच्यात गुंतत जातो. आजच्या लेखात बरीच नावं आणि थोडी शास्त्रीय माहिती दिली आहे याचं कारण असं की जर रोपांची मागणी करायची असेल किंवा माहिती घ्यायची असेल तर उपयोग होईल. फेसबुकवरील अनेक समुहातून, पुष्पप्रदर्शनांतून तसेच ऑनलाइन पद्धतीने ही आपण वॉटर लिलींची रोपं खरेदी करू शकतो. पुढील लेखात आपण ट्रॉपिकल लिली आणि वॉटर लिलींचे इतर प्रकार कोणते आहेत ते जाणून घेणार आहोत.
mythreye.kjkelkar@gmail.com
© The Indian Express (P) Ltd