,मुस्लीम महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इस्लाममध्ये पवित्र मानल्या जाणाऱ्या हज यात्रेबाबत एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता हज किंवा उमराह करण्यासाठी जाणाऱ्या स्त्रियांना त्यांच्यासोबत मेहरम किंवा पुरुष गार्डियनची सक्ती नसेल. इस्लाम धर्मात हज यात्रेला अत्यंत महत्त्व आहे. आयुष्यात एकदातरी हजची यात्रा झाली पाहिजे, अशी बहुसंख्य इस्लामधर्मियांची श्रध्दा आहे. याला महिलाही अपवाद नाहीत. पण महिलांना हज यात्रेसाठी जाणं फारसं सोपं नव्हतं. ‘हज’ला जाण्यासाठी त्यांच्यासोबत कुणीतरी ‘मेहरम’ म्हणजेच जवळचा पुरुष नातेवाईक असणं आवश्यक होतं. जर ‘मेहरम’ची सोबत नसेल तर चार महिलांच्या ग्रुपनेच हज यात्रेसाठीचा प्रस्ताव द्यावा लागत असे. म्हणजेच एकट्या महिलेला हज यात्रा करता येत नसे. पण आता केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. २०२३ च्या हज धोरणानुसार हजची पवित्र यात्रा करण्यामुिलसाठी ४५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या एकट्या महिलेनं सोबत मेहरम नसतानाही अर्ज केला तरी तो आता फेटाळला जाणार नाही. आता भारत सरकारची हज कमिटी अशा एकट्या महिलांचा गट तयार करून त्यानुसार नियोजन करणार आहे. मुस्लीम महिलांसाठी ही नक्कीच दिलासा देणारी बातमी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : सॅलीला सॅल्यूट! …एक धाव मदतकार्यासाठी!

खरं तर प्रत्येक धर्मात महिलांवर अधिक बंधने आहेत हे आपल्याला माहीत आहे. देवाचं दर्शन घेण्यापासून ते अगदी पोथ्या वाचण्यापर्यंत ही बंधने अनेक स्वरुपांमध्ये आहेत. देव सगळ्यांसाठी सारखाच आहे आणि त्यामुळे त्याचं दर्शन घेण्याचा अधिकारही सगळ्यांना सारखाच असला पाहिजे. पण हे तत्व प्रत्यक्षात किती पाळलं जातं, हा वादाचा विषय ठरू शकतो.  इस्लाम धर्मामधील तत्त्वांमध्ये ‘हज’ यात्रेचा समावेश करण्यात आला आहे. स्त्री जगभरात कुठेही एकटी फिरली तरी तिला हज यात्रेला मात्र एकटीला जाण्याची परवानगी नव्हती. तिच्यासोबत जवळचा पुरुष नातेवाईक असणं आवश्यकच होतं. किंवा मग चार जणींचा गट करून अर्ज करावा लागत असे. अर्थातच यामुळे कितीही इच्छा असली आणि सोबत नसली तर एकटं जाऊ शकणाऱ्या महिलांना हज यात्रेला जाता येत नसे. तसंच चार जणींच्या गटामधील एका महिलेनं अर्ज मागे घेतला तर उर्वरित महिलांचा अर्जही रद्द होत असे. तसंच मेहरम पूर्णवेळ या महिलेसोबत राहत असल्याने त्याचा खर्चही करावा लागत असे. आता हा खर्चही कमी होऊ शकेल.

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : जबाबदार लैंगिक संबंधांचं वय कोणतं?

४५ वर्षांवरील महिला आता एकट्याही हज यात्रेसाठी अर्ज करु शकतात. यासाठी ४५ ते ६५ वयोमर्यादा आहे. तसंच गर्भवती महिलांना यात्रा करण्यासाठी परवानगी नाही. भारतीय हज कमिटी अशा महिलांचे गट तयार करेल आणि ते ‘हज’च्या नियमांमध्ये बसवेल. यामुळे ‘हज’ला जाणाऱ्या मुस्लीम स्त्रियांची संख्या वाढेल असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. इस्लाम धर्मात स्त्रियांवर अनेक सामाजिक बंधने आहेत.त्यावरून जगभरात टीकाही होत असते. हा निर्णय म्हणजे ती प्रतिमा बदलण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. महिला हज यात्रेकरुंसंदर्भात सुविधा उपलब्ध करून देणे आणि यात्रेसंबंधीच्या तक्रार निवारणासाठी आता महिलांची समितीच स्थापन करण्यात येईल. ही महिला संपूर्ण यात्रेदरम्यान महिला यात्रेकरुंची मदत करेल.

आणखी वाचा : स्पेनचा ऐतिहासिक निर्णय! मासिक पाळीच्या काळात सुट्टी देणारा ठरला पहिला युरोपियन देश

हज म्हणजे काय?
सौदी अरेबियातील मक्का इथं हज यात्रा दरवर्षी संपन्न होते. जगभरातून लाखो मुस्लिम भाविक या यात्रेसाठी हजला जमा होतात. इस्लाम धर्माच्या पाच तत्त्वांपैकी हज यात्रा एक तत्व आहे. शारीरिक आणि आर्थिकरित्या सक्षम असणाऱ्या मुस्लिमांनी आयुष्यात एकदा तरी हज यात्रा केली पाहिजे असं म्हटलं जातं. हज यात्रेच्या दरम्यान भाविक सात वेळा काबाची प्रदक्षिणा करतात. आतापर्यंत केलेल्या चुकांसाठी अल्लाहकडे माफी मागितली जाते. हज यात्रा एकता, समानता आणि ईश्वराप्रति समर्पणाचं प्रतिक मानली जाते. हज यात्रेचा संपूर्ण कालावधी ३६ ते ४२ दिवस असतो.

आणखी वाचा : शी इज अनस्टॉपेबल : भारतीय नौदलातील महिलांची अनोखी जनजागृती मोहीम

यावर्षी भारत सरकारनंही हजच्या धोरणात अनेक बदल केले आहेत. त्यामुळे ही यात्रा अधिक चांगली आणि कमी खर्चात होऊ शकेल असा अंदाज आहे. यावेळेस ‘हज’ला जाण्यासाठी २५ प्रारंभ बिंदू म्हणजेच एम्बार्केशन पॉइंटस् असतील. यामध्ये त्रिपुराची राजधानी आगरतळासारख्या दूरच्या ठिकाणाहून येणाऱ्या यात्रेकरुंनाही जोडलं जाईल. अर्थातच त्यामुळे यात्रेकरुंच्या संख्येत वाढ होईल असा अंदाज आहे. त्याचबरोबर व्हीआयपी कल्चर रद्द करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता यापुढे हज यात्रेसाठीचा विशेष कोटा रद्द करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ७० पेक्षा अधिक वय असलेल्या यात्रेकरूंसोबत कोणीतरी असणं बंधनकारक आहे. जर पती-पत्नी हे दोघेही ७० पेक्षा जास्त वयाचे असतील तर त्यांना दोघांना सोबत ठेवता येईल. मात्र हे सहयात्रेकरू रक्ताच्या नात्यातले असावेत असाही नियम आहे. करोना काळात हज यात्रा बंद ठेवण्यात आली होती. आताही यात्रेला जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी कोविड लसीकरणाचे दोन डोस झाल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोणे अनिवार्य आहे. इच्छा, आर्थिक आणि शारीरिक परिस्थिती असूनही केवळ सामाजिक बंधनांमुळे ज्यांना हज यात्रेसाठी जाता येत नव्हतं अशा कित्येक स्त्रियांना आता दिलासा मिळाला आहे. मुस्लिम महिला सशक्तीकरणाच्या दिशेनं हे एक पाऊल आहे अशा प्रतिक्रिया मुस्लिम स्त्रियांनी व्यक्त केल्या आहेत.

(शब्दांकन : केतकी जाशी)

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now single muslim woman also can go for haj yatra mahram male accompanying not required vp