आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची बैठक अहमदाबाद या ठिकाणी पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तसेच काही नवीन नियमसुद्धा सांगण्यात आले आहेत. तसेच या सगळ्यात आयसीसीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आयसीसीने (ICC) मंगळवारी (२१ नोव्हेंबर) ट्रान्सजेंडर खेळाडूंना महिला क्रिकेटमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयाला प्रतिबंध केला आहे. नऊ महिन्यांच्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
नवीन धोरण काही तत्त्वांवर आधारित आहे. नवीन नियमांनुसार कोणत्याही ट्रान्सजेंडर (ट्रान्सजेंडर महिला खेळाडू किंवा पुरुष लिंग बदलणारा पुरुष खेळाडू) खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थान देण्यात येणार नाही. कोणतीही शस्त्रक्रिया किंवा उपचार करण्यात आलेले खेळाडू महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळू शकणार नाहीत. महिलांच्या संरक्षण, सुरक्षितता व जागरूकता आदी गोष्टी लक्षात ठेवून आयसीसीकडून यावेळी महिला क्रिकेटसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
आयसीसीच्या या नियमाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. तसेच या नवीन नियमाचा अर्थ असा आहे की, पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेटर बनलेली डॅनियल मॅकगहे (Danielle Mcgahey) यापुढे महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भाग घेऊ शकणार नाही. २९ वर्षीय डॅनियल मॅकगहेची टी-20 वर्ल्ड कपच्या क्वालिफाईंग राउंडसाठी कॅनडाच्या महिला संघात निवड करण्यात आली होती. कॅनडाची डॅनियल मॅकगहे पहिली आंतरराष्ट्रीय ट्रान्सजेंडर क्रिकेटर ठरली. तिने पुरुष-ते-महिला ट्रान्सजेंडर खेळाडू म्हणून आवश्यक असणाऱ्या आयसीसीच्या सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली आहे. आतापर्यंत तिने सहा टी-२० (T-20)मध्ये ९५.९३ च्या स्ट्राईक रेटने ११८ धावा केल्या होत्या. मात्र, नवीन नियमांमुळे ती आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही.
मंगळवारी आयसीसीच्या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा डॅनियल मॅकगहे निर्णय घेतला. कारण ; तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता ; असे सोशल मीडियावर एका भावनिक पोस्टमध्ये तिने म्हंटले आहे.तसेच खेळात आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूंच्या सुरक्षिततेचे रक्षण करणे हे आमचे पहिले प्राधान्य आहे, असे आयसीसीचे मुख्य कार्यकारी ज्योफ ॲलार्डिस यांनी सांगितले आहे. एकंदरीतच आयसीसीने बैठकीत नवीन नियमांना मंजुरी देताना हा निर्णय घेतला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ट्रान्सजेंडर खेळाडूंना यापुढे आंतरराष्ट्रीय महिला संघासोबत क्रिकेट खेळता येणार नाही.