Inspiring Success Story: शिक्षण ही अनंत काळ चालणारी गोष्ट आहे असं म्हटलं जातं. केरळमध्ये राहणार्या बिंदू यांनी हे साध्यही करून दाखवलंय. असं काय केलं बिंदू यांनी, तर केरळच्या मलप्पूरम इथल्या ४२ वर्षीय बिंदू आणि त्यांचा २४ वर्षांचा मुलगा विवेक यांनी केरळ लोकसेवा आयोगाची परीक्षा एकाच वेळी दिली आणि दोघेही त्यात पास झाले आहेत. बिंदू या परिक्षेत ९२वा रँक मिळवत लास्ट ग्रेड सर्वंटची परीक्षा पास झाल्या आहेत, तर त्यांचा २४ वर्षीय मुलगा ३८वा रँक मिळवत अप्पर श्रेणी लिपिक (एलडीसी) परीक्षा पास झाला आहे. आता मायलेक दोघेही सरकारी नोकरीत कार्यरत आहेत. दरम्यान, बिंदू यांचा हा प्रवास सोपा नव्हता, त्यांच्या या प्रवासाला नेमकी का आणि कशी सुरुवात झाली हे पाहूयात…
मुलाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरुवात केली अन्…
केरळमध्ये राहणार्या बिंदू यांनी आपल्या मुलाला दहावीत असताना अभ्यास करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी स्वत: पुस्तके वाचण्यास सुरुवात केली. परंतु, यामुळे त्यांच्यातील वाचनाची आवड वाढत गेली आणि त्या केरळ लोकसेवा आयोग (पीएससी) परीक्षेची तयारी करण्यास प्रेरित झाल्या.
स्पर्धा परीक्षेत तीन वेळा अपयश…
बिंदू सांगतात, ‘पीएससी उमेदवारासाठी तुमच्याकडे काय असावे आणि काय नसावे याचे मी उत्तम उदाहरण आहे. मी परीक्षेत पास झाले, याचा अर्थ मी सतत अभ्यास केला असे नाही. परीक्षेच्या सहा महिने आधीच मी अभ्यासाची तयारी सुरू केली. मग पुढच्या परीक्षेपर्यंत ब्रेक घेतला. या स्पर्धा परीक्षा असल्यामुळे प्रत्येक पुढच्या परीक्षांमध्ये मोठं अंतर असतं, त्या सांगतात, पहिल्या परीक्षेनंतर दुसऱ्या परीक्षेची पुढील फेरी तीन वर्षांनी जाहीर केली जाते. त्यामुळे या परीक्षेतील अंतरामुळे किंवा फोकस ठेवून अभ्यास न केल्यामुळे त्या या पीएससी परीक्षेत तीन वेळा उत्तीर्ण होऊ शकल्या नाही. यानंतर मात्र त्यांनी पूर्ण वेळ अभ्यासासाठी द्यायचं असं ठरवलं. अडथळ्यांना न जुमानता ध्येय कायम ठेवले आणि चौथ्या प्रयत्नात त्यांनी पोस्ट काढली. संबंधित वृत्त zeenews संकेतस्थळाने दिले आहे.
घर, नोकरी सांभाळून केला अभ्यास
ही परीक्षा देण्याआधी १० वर्ष बिंदू यांनी अंगणवाडी शिक्षिका म्हणून काम केलं. यावेळी बिंदू सांगतात, माझ्या या परीक्षेच्या अभ्यासामध्ये शिक्षकांनी, मित्रांनी आणि मुलाने खूप मदत, मार्गदर्शन केले. दुसरीकडे बिंदू यांचा मुलगा विवेक सांगतो, आई आणि मी परीक्षा एकत्र दिली. मात्र, आम्ही एकत्र पास होऊ असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. तसेच या परीक्षेदरम्यान आम्ही कधीच एकत्र अभ्यास केला नाही असंही तो सांगतो. कारण मला एकट्याला अभ्यास करायला आवडायचं, तर आईला घरातली कामं, अंगणवाडीच्या कामातून वेळ मिळेल तसा ती अभ्यास करायची. आम्ही काहीवेळा फक्त एकत्र काही विषयांवर चर्चा करायचो, असं विवेक सांगतो.
मायलेकाच्या या यशाची चर्चा सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात झाली. लोकांनी बिंदू यांच्या मेहनत आणि यशाचे भरभरून कौतुक केले. इच्छाशक्ती आणि निश्चय असेल तर कोणतीच अडचण तुम्हाला रोखू शकत नाही. चिकाटी ही खरोखरच यशाची गुरुकिल्ली आहे हे बिंदू यांनी सिद्ध केलं. एकीकडे घरच्या जबाबदाऱ्यांचं कारण सांगून अनेक महिला त्यांच्या करिअरमध्ये ब्रेक घेताना दिसतात, तेच दुसरीकडे बिंदू यांनी घर, नोकरी सांभाळून यश खेचून आणलं.
हेही वाचा >> शाब्बास पोरी! मातृभाषेत शिक्षण, मायक्रोसॉफ्टमध्ये इंटर्नशीप अन् आता ५० लाखांचं पॅकेज
यशाला वय माहीत नसते आणि दृढनिश्चयाला सीमा नसते…
कौटुंबिक परिस्थिती आणि लग्नामुळे शिक्षण सोडणाऱ्या मुलींची संख्या कमी नाही. संसाराचा आनंद लुटत आणि मुलांच्या शिक्षणासाठी धडपडत दिवस निघून जातात. मात्र, जिद्दीने अपूर्ण शिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांची संख्याही कमी नाही. बिंदू या त्यापैकीच एक. बिंदू यांचा प्रवास असंख्य महिलांना त्यांची अर्धवट राहिलेली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देईल.