प्रिय लेकरा..
कदाचित हे पत्र तुझ्या हातात पडायला खूप उशिरा झालेला असेल. परवा गावात डॉक्टर आला होता, मला काहीतरी आजार झालाय म्हणे, तू काय काळजी नको करू हे उगीच घाबरवतात बाया-बापड्यांना. मला ना खोकला, ना सर्दी, ना ताप, पाय पण दणकट आहेत बघ. पण काय तो बोलतो ना विसरायचा आजार झालाय म्हणे. डॉक्टर मला म्हणाला, “माय, तुला तुझ्या आठवणी जेवढ्या लक्षात असतील ना तेवढ्या लिहून काढ बघ..” मी सांगितलं त्याला मला कुठं लिहायला येतंय. पण तो म्हणाला कोणाची तरी मदत घे. खरं सांगू त्याने ‘माय’ म्हणून केलेला हट्ट तुझी माय नाही नाकारू शकली. गावाकडे अंगणवाडीत ललिता बाई आहेत त्यांच्याकडूनच लिहून घ्यायचं ठरवलं. माझ्या आठवणी लिहायच्या तर त्यात तू नाहीस असं कसं असेल. म्हणून ललिताबाईंना म्हटलं माझ्या लेकराला पत्र लिहा..
आठवण पहिली
तुझी चाहूल.. लेकरा मी तुझ्या बापाशी लग्न करून आले ना तेव्हा १५ वर्षाची होते. २० व्या वर्षी मला तुझ्या येण्याची चाहूल लागली. पाच वर्ष पोर नाही म्हणून टोमणे ऐकले होते त्यात तुझ्या चाहुलीने मला घरात मान मिळवून दिला. आया-बाया मला प्रेमाने गोंजारु लागल्या. घरात परिस्थिती बेताची होती पण तुझ्या बापानं लै लाड पुरवले. चिंचा म्हणू नको, बोरं म्हणू नको लागेल ते आणून द्यायचे. एकदा शेतात काम करताना तुझा बाबा पाय घसरून पडला आणि मणक्याला खूप मार लागला त्यांनी अंथरुणच धरलं. तेव्हा पुन्हा मलाच साऱ्यांनी दोष लावला. मायेने गोंजारणारी सासू मला डोळ्यासमोर पण उभं करेना. बरोबर आहे म्हणा शेवटी तिच्या काळजाचा तुकडाच होता ना तुझा बा. मग काय कोणी माझ्याशी बोलेना, पण त्यातही मला तुझी साथ व्हायची, पोटात असणाऱ्या तुझ्याशी बोलत बसायचे मी. लोकांनी येडी म्हणायची वेळ आली होती. तुझ्या जन्माच्या वेळेला पण घरीच सुईण बाय आली होती. रडत- पडत- ओरडत- किंचाळत तुला जन्म दिला. तुझा तो चेहरा मी कधीच विसरायची नाही बघ..
आठवण दुसरी
पोरगा झाला म्हणून सासूबाई निवळल्या पुढची पाच वर्ष खूप सुखात गेली पण तुझ्या बा ला अंथरूण काही सुटेना, शेतात राबलेला रांगडा गडी तो त्याला त्याचीच लाज वाटायची एक दिवस त्या शरमेनंच त्याने जीव सोडला. आणि पुन्हा सारा खेळ विस्कटला. तुझ्या बापाच्या धक्क्याने सासूने पण जीव सोडला आणि मी आणि तू एकटंच पडलो. त्या गावात राहूनच मजुरी करून तुला शिकवलं. तू एवढा हुशार होतास शाळेतल्या सगळ्या पोरांमध्ये तुझा पहिला नंबर असायचा.. शेतीला पण तुझी मदत व्हायची. मी माडाखालच्या सावंतांकडे भांडी घासायला जायचे तेव्हा त्यांच्या पडवीत बसून तू मोठमोठ्या बाप्यासारख्या गप्पा मारायचास, पुस्तकातल्या गोष्टी सांगायचास. माझ्या लेकराला सगळ्यांनी लई जीव लावला हे बघून मग मी पण सुखावायचे, तुझ्या गोष्टींमधला अर्थ नाही कळायचा पण डोळ्यातली माया मी कधीच विसरायची नाही बघ..
आठवण तिसरी
दहावीनंतर तुला शाळेनं मुंबईला पाठवणार सांगितलं. शिष्यवृत्ती दिली होती म्हणे. आईला पैशाचा पण त्रास दिला नाहीस लेका तुझ्या जीवावर, हुशारीवरच शिकलास. मुंबईला जाताना तुला भाकरी चटणी बांधून दिली होती तेवढीच काय ती तुझ्या शिक्षणाला माझी मदत बाकी माझा लेक स्वतःच्या हिमतीवर मोठा झालाय. आजही सगळ्यांना सांगताना तुझा खूप अभिमान वाटतो. तुझं शिक्षण झालं, नोकरी लागली, लग्न केलंस आणि आता तुला बाय पण झाली. नाही म्हणायला तू मला दोनदा मुंबईला बोलवलंस. एकदा लग्नाला आणि मग एक माझ्या नातीला सांभाळायला. १५ व्या वर्षापासून ज्या घरात होते ते घर सोडून पहिल्यांदा तुझ्याकडे येऊन राहिले होते, आपलं घर बंद ठेवून. पण, माझा लेक माझ्या जोडीला असताना घर काय कुठेही बनवलं असतं. सगळं नवीनच होतं पण मी चार वर्षात सगळं शिकून घेतलं, तुझा तो टीव्ही पण वापरायला यायचा मला. नंतर ‘बाय’ शाळेत जायची, मग क्लासला जायची आणि मग तुम्ही सगळे ९ वाजता घरी यायचात. माझी काहीच मदत व्हायची नाही कारण काम तरी काय उरायचं ना मला. उगाच माझ्यामुळे तुम्हाला उलट कुठे जायला, फिरायला मिळायचं नाही. त्यावेळी तू आणि तुझ्या बायकोने “आई तुम्हाला कंटाळा येत असेल तर गावी जाऊन का राहत नाही” असं विचारण्याच्या सुरात सांगितलंत . मी पण तयारी करायला घेतली होती. तेव्हा बॅग भरून निघताना माझा धक्का लागून तुझ्या घरातल्या आरशाची काच फुटली होती. त्या काचेत मी माझा आणि माझ्या मागे तुझा बघितलेला चेहरा कधीच विसरायची नाही बघ…
हे ही वाचा<< बाईपण भारी देवामध्ये ‘ती’ अंकुश चौधरीची पत्नी नव्हतीच…
गावी परतले, परत माझ्याच मातीत राहू लागले, दुःख नाही बघ कशाचं पण आता दमायला होतं, घर खायला उठतं, तुझा बा गेल्यावर पण एकटं वाटलं नाही कारण माझं लेकरू सोबत होतं. नाही तू येतोस गावी वर्षातून एकदा गणपतीला पण तू जाताना परत घर भकास होतंच ना. तू राहा मुंबईत, माझ्या लेकाने बनवलेला स्वर्ग काय मला बघवत नाही असं नाही ना? पण एखादा फोन करत जा ना तुझ्या मायला, तू काही बोलू पण नकोस वाटल्यास, मीच बोलेन एकटी. बाळा आपण बोलताना समोर एखादा तरी कान असला की कसं वाटतं हे विसरलेय बघ मी. तू पोटात असताना एकटीच बोलत बसायचे ना तशी आता एकटी बोलत बसते, म्हणूनच कदाचित त्या डॉक्टरला बोलावलं असेल गावात. तेव्हा पण लोकं मला येडी म्हणायचे आणि आता पण..