ती फक्त १८ वर्षांची… उत्साही, तरुण, साधारणपणे या वयातल्या तरुणींना मोबाईल, फॅशन, फिल्म्स, सेल्फी, रील्स अशांचंच आकर्षण. पण तिच्या डोळ्यांत स्वप्नं होतं आपल्या देशासाठी पदक जिंकायचं. अचूक लक्ष्य साधून आपल्या देशासाठी सुवर्णपदक आणायचा विक्रम करायचा निर्धार तिच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होता. ते स्वप्नं आत्तातरी अपूर्ण राहिलं, पण तरीही ती लढली. तिचं नाव भजन कौर. आपल्या पहिल्याच ऑलिम्पिक स्पर्धेत तिरंदाजीत ती Round of 8 पर्यंत पोहोचली. कौशल्याला मेहनतीची जोड मिळाली तर काय होऊ शकतं हे भजन कौरनं दाखवून दिलं. हरियाणातल्या सिरसापासून जवळपास ४५ किलोमीटर दूर तिचं ढाणी बचन सिंह हे गाव आहे. भजन कौरची उंची, शरीरयष्टी पाहून तिच्या क्रीडा शिक्षकांनी शॉटपुटची प्रॅक्टीस करायला सांगितलं. शॉर्टपुटमध्ये जवळपास ४ किलोचा चेंडू हाताने उचलून उंच फेकावा लागतो. यात तिनं शालेय स्तरावर अनेक पदकं जिंकली. असंच त्यांनी तिच्या हातात तिरंदाजीचा धनुष्यबाण दिला आणि तोही तिनं अगदी सफाईदारपणे चालवून दाखवला. भजन कौरच्या कुटुंबाचा शेतीचा व्यवसाय आहे. ती राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खेळायला लागली आणि तिला नियमित सरावाची गरज आहे हे भजनचे वडील आणि तिच्या दोन भावांच्या लक्षात आलं. त्यांनी त्यांच्या शेताजवळच भजनसाठी आर्चरीची खास रेंज तयार करून घेतली. तिचं पाहून तिची छोटी बहीण आणि तिच्या गावातली मुलंही इथं सराव करतात. भजनला राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी चांगली किट मिळावी म्हणून तिच्या वडिलांनी कर्जही घेतलं होतं. तिरंदाजी ही आपल्या मुलीची सगळ्यात आवडती गोष्ट आहे. ते करताना ती भूक-तहान सगळं विसरते असं तिच्या आईचं म्हणणं आहे.

शाळेनंतर तिची टाटा तिरंदाजी अकादमीमध्ये निवड झाली. तिथं तिनं तीन वर्षांपेक्षा जास्त तिरंदाजीचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं. भारताच्या तिरंदाजीचे कोरियन कोच लिम चे वुंग यांच्या नजरेत तिचं कौशल्य आलं आणि त्यांनी तिला खेळाडू म्हणून घडवण्यास आणखी मदत केली. वुंग हे २०१३ मध्ये भारतीय महिला तिरंदाजी टीमचे प्रशिक्षक होते. २०२२ मध्ये तिनं आशियाई स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं, त्याच वर्षी आणि २०२४ मध्ये आशियाई ग्रँड प्रिक्स सर्किट सुवर्णपदक जिंकलं. पॅरीस ऑलिंपिकमध्ये पात्र होण्यासाठी तिला तुर्कस्तानात जाऊन पात्रता फेरीत स्वत:ला सिद्ध करावं लागलं. समर गेम्समध्ये तिला सुवर्णपदकही मिळालं. त्यामुळेच ऑलिम्पिकमध्ये तिच्याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं. क्वार्टर फायनलच्या आधीच तिचा ऑलिंपिकमधला प्रवास संपला. इंडोनेशियाच्या डायनाडा चोरुनिसाला तिनं शेवटच्या फेरीपर्यंत कडवी झुंज दिली.

हेही वाचा…Bangladesh PM Sheikh Hasina : २५ वर्षांपासून सत्तेवर, आर्थिक क्रांतीही घडवली; तडकाफडकी राजीनामा देणाऱ्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना कोण?

३० वर्षांच्या अंकिता भाकट हिचीही ही पहिली ऑलिम्पिक स्पर्धा होती. अंकिता मूळची कोलकत्याची आहे. कलकत्ता आर्चरी क्लबमधून तिनं प्रशिक्षण घेतलं आहे. अगदी १० वर्षांची असल्यापासून तिनं तिरंदाजीचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. तिच्या कुटुंबियांचा दुधाचा व्यवसाय आहे. घरची आर्थिक परिस्थिती फारशी बरी नसतानाही अंकितानं प्रशिक्षण आणि मेहनत दोन्ही सोडलं नाही. आधी स्थानिक क्लबमधून आणि २०१४ नंतर तिनं जमशेदपूरच्या टाटा तिरंदाजी अकादमीतून प्रशिक्षण घेतलं. २०१५ मध्ये तिनं पहिल्यांदा जागतिक तिरंदाजी युवा चँपियनशिपमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं. तेव्हा ती फक्त १८ वर्षांची होती. २०१७ मध्ये अर्जेंटिनात झालेल्या युवा तिरंदाजी विश्व चँपियनशिपमध्ये तिनं सुवर्णपदक जिंकलं. या ऑलिम्पिकमध्ये अंकिताची कामगिरी फारशी चांगली झाली नसली तरी तिचा तिथपर्यंतचा प्रवासच अत्यंत प्रेरणादायी होता.

या सगळ्यांत अनुभव आणि वयाने ज्येष्ठ असलेली दीपिका कुमारी हिनं आतापर्यंत चार वेळा भारताचं ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. यावेळेसही तिला पदक मिळवण्यात अपयश आलं असलं तरी जोपर्यंत ऑलिम्पिक पदक मिळत नाही तोपर्यंत खेळणं थांबवणार नाही असा निर्धार दीपिकानं केला आहे. प्रचंड संघर्ष करून दीपिका इथपर्यंत पोहोचली आहे. दीपिकाचे वडील रिक्षा चालवायचे. नेमबाजीसाठी लागणारी उपकरणं मिळवणं हेसुद्धा तिच्यासाठी एकेकाळी खूप अवघड होतं. सुरुवातीच्या काळात तर तिनं बांबूपासून बनलेल्या धनुष्यबाणानं सराव केला आहे, पण एक दिवस देशासाठी खेळायचं हे तिचं स्वप्नं होतं आणि कितीही अडचण आल्या तरी तिनं स्वप्नांचा पाठलाग करणं सोडलं नाही. तिनं आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला नेमबाजीत अनेक पदकं मिळवून दिली आहेत. टाटा अकादमीमध्ये तिला प्रवेश मिळाला त्यावेळेस तिला पहिल्यांदा खास तिरंदाजीची उपकरणं आणि योग्य ते डाएट मिळालं. मिळालेल्या प्रशिक्षणाचा फायदा घेत दीपिकानं तिरंदाजीत नाव कमावलं. २०१२ मध्ये तिला अर्जुन पुरस्कार आणि २०१६ मध्ये तिला पद्मश्री पुरस्कार मिळाला. २०२२ मध्ये दीपिकाच्या मुलीचा जन्म झाला. त्यानंतर काही काळ विश्रांती घेऊन ती पुन्हा ऑलिंपिकसाठी सज्ज झाली होती.

हेही वाचा…भारतात ‘या’ राज्यातील महिला करतात सर्वाधिक मद्यपान? का वाढले मद्यपानाचे प्रमाण? जाणून घ्या….

भजन, अंकिता आणि दीपिका या तिघींना या ऑलिम्पिकमध्ये यश मिळालं नाही. पण त्यांचा प्रवास जिद्दीने आणि जोमाने सुरू राहणार आहे. परिस्थिती कशीही असली तरी त्यावर मात करता येते आणि देशासाठी खेळण्याचं स्वप्नं पूर्ण करता येतं हे त्यांनी दाखवून दिलं आहे. तसंच देशासाठी ऑलिंपिक मिळवण्याचं स्वप्नंही त्या एक दिवस नक्कीच पूर्ण करतील.